मुळा-मुठेवर मैलापाण्याचं संकट

मुळा-मुठेवर मैलापाण्याचं संकट

Published on

पांडुरंग सरोदे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २१ : शहराच्या वेगवेगळ्या भागात मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्प (एसटीपी) आहेत, मात्र संबंधित प्रकल्पांना जोडणाऱ्या वाहिन्यांची (मिसिंग लिंक) कामे पूर्ण झालेली नाहीत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मैलापाणी ओढ्यानाल्याच्या माध्यमातून मुळा-मुठा नदीमध्ये जात आहे. इतकेच नव्हे, सध्या एसटीपीच्या क्षमतेपेक्षा अतिरिक्त मैलापाणी व समाविष्ट गावांमधील शेकडो दशलक्ष लिटर (एमएलडी) मैलापाणी थेट मुळा-मुठा नदीत मिश्रीत होत आहे. त्यामुळे नदीच्या प्रदूषणात भर पडत आहे.

शहरात दररोज निर्माण होणाऱ्या मैलापाण्यावर प्रक्रिया करून हे पाणी नदीत सोडले जाते. महापालिकेच्या नऊ एसटीपी केंद्रांद्वारे मैलापाण्यावर प्रक्रिया केली जाते. प्रक्रिया केलेले पाणी शेतीसाठी नदीमध्ये सोडण्यात येते. महापालिकेचे एसटीपी केंद्र शहराच्या जुन्या हद्दीमध्ये आहेत. बहुतांश केंद्रांवर मोठमोठ्या वाहिन्यांद्वारे मैलापाणी पोहोचविले जाते. त्यानंतर त्यावर प्रक्रिया होते. असे असले तरीही, अनेक केंद्रांपर्यंत मैलापाणी पोहोचविणाऱ्या वाहिन्यांची कामे विविध कारणांमुळे अपूर्ण आहेत किंवा वेगवेगळ्या कारणांमुळे या वाहिन्या बदलण्याच्या स्थितीत आहेत.

१९ ठिकाणी मिसिंग लिंकची गरज
एसटीपी केंद्रांना जोडणाऱ्या वाहिन्या पावसामध्ये वाहून जाणे, बांधकाम क्षेत्र वाढल्याने उपलब्ध असलेल्या वाहिन्यांवर अतिरिक्त ताण येणे आणि मैलापाणी वाहिन्यांमध्ये एकसलगता नसणे अशा वेगवेगळ्या कारणांमुळे एसटीपी केंद्रांपर्यंत मैलापाणी पोहोचण्यात अडचण येते. त्यादृष्टीने महापालिकेने मिसिंग लिंक असलेली १९ ठिकाणे निश्‍चित केली आहेत. तेथे ५३ किलोमीटर लांबीच्या वाहिन्यांची कामे होणे अपेक्षित आहे. आत्तापर्यंत २० किलोमीटरची कामे झाली आहेत, मात्र अनेक महिने पावसामुळे ३३ किलोमीटर मैलापाणी वाहिन्यांची कामे झालेली नाहीत. त्यामुळे संबंधित एसटीपी केंद्रांपर्यंत मैलापाणी नेण्यास अडचण येत असल्याने ते ओढे व नाल्यांद्वारे मुळा-मुठा नदीत सोडले जात आहे. मिसिंग लिंकचे काम पूर्ण झाल्यानंतर या पाण्यावर प्रक्रिया करणे शक्‍य होणार आहे.

३२ गावांमध्ये वाहिन्यांचे जाळेच नाही
महापालिकेच्या नऊ एसटीपी केंद्रांमध्ये ४७७ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया होणे गरजेचे आहे. मात्र क्षमतेपेक्षा जास्त मैलापाणी संबंधित केंद्रांवर येते. हे अतिरिक्त मैलापाणी मुळा-मुठा नदीमध्ये जात आहे. शहराच्या नव्या हद्दीमध्ये, समाविष्ट झालेल्या ३२ गावांमध्ये मैलापाणी वाहिन्यांचे जाळे अस्तित्वात नाही. त्यामुळे शहराच्या जुन्या हद्दीतील अतिरिक्त मैलापाणी व समाविष्ट गावांमधील मैलापाणी मुळा-मुठेत मिसळून नदी प्रदूषित होत आहे.

१० वर्षांत एसटीपी प्रकल्पच नाही
महापालिकेचे अखेरचे एसटीपी केंद्र खराडी येथे २०१२ मध्ये झाले. त्यानंतर २०२२ मध्ये एसटीपी प्रकल्पाच्या कामांना सुरुवात केली. २०२१ ते २०२२ या कालावधीमध्ये महापालिकेने एकही एसटीपी प्रकल्प केला नाही. दहा वर्षांत शहराची वाढ वेगाने झाली, मात्र या काळात एकही प्रकल्प तयार होऊ शकला नाही.

महापालिकेच्या एसटीपी केंद्रांना जोडणाऱ्या २० किलोमीटरच्या मैलापाणी वाहिन्यांची कामे झाली आहेत. पाऊस थांबल्यामुळे उर्वरित कामे वेगाने केली जातील. ‘जायका’ अंतर्गत १० एसटीपी केंद्रांची कामे सुरू आहेत. तर केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत समाविष्ट गावांमधील एसटीपी, मैलापाणी वाहिन्यांची कामे करण्यावर भर दिला जात आहे.
- जगदीश खानोरे,
प्रमुख, मलनिस्सारण विभाग, महापालिका


शहरातील मैलापाणी व प्रक्रिया
७४४ एमएलडी
- दररोज निर्माण होणारे मैलापाणी

४७७ एमएलडी
- दररोज प्रक्रिया होणारे मैलापाणी

२६७ एमएलडी
- प्रक्रिया न होणारे मैलापाणी

१३९ एमएलडी
- समाविष्ट (२०१७) ११ गावांमधील मैलापाणी

९८ एमएलडी
- समाविष्ट (२०२१) २३ गावांमधील मैलापाणी


- जुने एसटीपी केंद्र

१०
- नव्याने होणारे एसटीपी केंद्र

तुमचे मत मांडा..
मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पांना जोडणाऱ्या वाहिन्यांची कामे अपूर्ण आहेत. त्यातच समाविष्ट गावांमधील मैलापाणी मुळा-मुठा नदीत मिश्रीत होत आहे. त्यामुळे प्रदूषणात भर पडत आहे. याबाबत तुमचे मत मांडा..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com