मतदार यादी मिळेना; काय करावे कळेना!
पुणे, ता. २१ ः ऑनलाइन मतदार यादी डाऊनलोड होताना अडचणी येत आहेत, मतदार यादीची प्रत मिळावी यासाठी पैसे भरले तर दोन दिवस थांबा असे सांगितले जात आहे. प्रारूप मतदार यादी तयार करताना मोठा घोळ झाल्याने इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढत चालली आहे. हरकती नोंदविण्यासाठी अवघे आठ दिवस असून त्यातील दोन दिवस तर वाया गेले. चूक प्रशासनाची असली तरी त्याची शिक्षा आम्हाला भोगावी लागणार आहे, अशा शब्दात राजकीय कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, आत्तापर्यंत ५२ हरकती आल्या आहेत.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी निवडणूक शाखेने प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. महापालिकेच्या संकेतस्थळावर ही यादी डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या वाढल्याने सर्व्हरवर ताण येऊन याद्या डाऊनलोड होण्यास उशीर होत आहे. तसेच डाऊनलोड केलेल्या अनेक याद्यांमध्ये मतदारांचे फोटो दिसत नाहीत. त्यामुळे या याद्या तपासणे अवघड झाले आहे. मतदार यादीची प्रत मिळावी यासाठी इच्छुक उमेदवारांनी गुरुवारी पैसे भरले आहेत. तरीही त्यांना शुक्रवार संध्याकाळपर्यंत याद्या ताब्यात मिळालेल्या नाहीत.
काय आहेत अडचणी?
- निवडणूक आयोगाकडून मतदार यादीवर हरकत घेण्यासाठी २७ नोव्हेंबरपर्यंत मुदत
- मतदारयादी तपासणे, त्यात काही हरकती असतील, चुकीचे मतदार आलेले बाहेर काढणे, मूळ मतदार प्रभागात पुन्हा समाविष्ट करून घेण्याची प्रक्रिया किचकट
- राजकीय कार्यकर्त्यांना एकगठ्ठा हरकती नोंदविता येणार नाहीत
- त्यासाठी वैयक्तिक किंवा सोसायटीच्या अध्यक्षाने, सचिवाने तक्रार करणे आवश्यक
- त्यांच्याकडून ही सर्व प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी इच्छुक उमेदवाराला परिश्रम घ्यावे लागणार
- त्यातच निवडणूक शाखेकडून मतदार यादीची प्रत देण्यासाठी उशीर
कोण काय म्हणाले?
१) माजी नगरसेवक संजय बालगुडे म्हणाले, ‘‘माझ्या प्रभागाची यादी मिळावी म्हणून अर्ज केला, पैसे भरले आहेत. पण यादी मिळण्यास दोन दिवस लागणार असे सांगत आहेत. प्रशासन मुद्दाम यादी देण्यास उशीर करत आहे. याचा लाभ सत्ताधाऱ्यांना होत आहे.’’
२) माजी नगरसेवक आदित्य माळवे म्हणाले, ‘‘आमच्या प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात गेले आहेत. त्यांना पुन्हा प्रभागात आणण्यासाठी वैयक्तिक अर्ज भरून घ्यावे लागणार आहेत. चूक प्रशासनाने केली असली तरी त्याची शिक्षा कार्यकर्त्यांना होणार आहे.’’
३) ‘‘पैसे भरल्यानंतर प्रिंट काढून दुसऱ्या दिवशी मतदार यादी दिली जात आहे. मतदारांचा प्रभाग बदलला असे वाटत असले तरी निवडणूक आयोगाने जवळची प्रमुख खूण ठरवून त्यावरून पत्ते दिले आहेत. त्यामुळे मतदार दुसऱ्या प्रभागात गेले असल्याचे वाटत आहे. पण मतदार यादीच्या खोलात गेल्यानंतर त्यात गडबड नसल्याचे लक्षात येत आहे. ज्या त्रुटी आहेत त्याबाबत निवडणूक आयोगाला कळविल्या जाणार आहेत.’’, असा दावा उपायुक्त प्रसाद काटकर यांनी केला आहे.
३० जणांनी भरले पैसे
मतदार यादीची प्रत मिळावी यासाठी गेल्या दोन दिवसांत निवडणूक शाखेकडे ३० जणांनी पैसे भरलेले आहेत. एका प्रभागाच्या यादीची किंमत ही ११ हजारांपासून ते ४० हजार रुपयांपर्यंत आहे. मतदारांची संख्या जेवढी जास्त, तेवढी पानांची संख्या वाढत असल्याने त्याचे पैसेही वाढत आहेत. प्रत्येक १० हजार मतदारांसाठी एक पुस्तक केले आहे. प्रभाग क्रमांक ३८ बालाजीनगर-आंबेगाव-कात्रज या प्रभागाची मतदार यादीची किंमत सर्वाधिक ४० हजार २६६ रुपये इतके आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

