प्रकाश पुरोहित यांचा ससूनमध्येच मृत्यू

प्रकाश पुरोहित यांचा ससूनमध्येच मृत्यू

Published on

पुणे, ता. २१ : ससून रुग्णालयात उपचारासाठी भरती केलेल्या प्रकाश पुरोहित (वय ६०, रा. कर्वेनगर) यांचा मृत्‍यू ससून रुग्णालयामध्येच यावर्षी ७ मार्च रोजी झाल्‍याचे समोर आले आहे. मात्र, त्‍यावेळी त्‍यांची नोंद बेवारस रुग्‍ण अशी झाल्‍याने नातेवाइकांना याबाबत कळवले गेले नव्‍हते. त्‍यांचा अंत्‍यविधी महापालिकेने बेवारस समजून केला.
पुरोहित यांना पायाच्‍या दुखण्‍यावरील उपचारासाठी २३ सप्टेंबर २०२४ रोजी ससून रुग्णालयात डायल १०८ रुग्‍णवाहिकेद्वारे दाखल केले होते. पुरोहित दांपत्‍याला मुले नसल्‍याने त्‍यावेळी सोबत कोणी नव्‍हते. डॉक्‍टरांनी त्‍यांची पोलिसांकडे ‘मेडिको लीगल केस’ (एमएलसी) अशी नोंद करून त्‍यांच्‍यावर आधी आपत्कालीन कक्ष व नंतर अस्थिव्‍यंगोपचार विभागात भरती करून त्‍यांच्‍यावर ७२ दिवस उपचार केले. दरम्यान, नातेवाइकांनी संपर्क न केल्याने व डॉक्‍टरांनाही न भेटल्‍याने ससून रुग्णालयाच्‍या वैद्यकीय समाजसेवा विभागाने या रुग्णास उपचारानंतर पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने पुरोहित यांना ४ डिसेंबर २०२४ रोजी दादासाहेब गायकवाड यांच्या उरुळी देवाची, फुरसुंगी येथील ‘आस्क ओल्ड एज होम’ येथे संगोपनासाठी पाठविले होते.
यानंतर, गायकवाड यांनी पुरोहित यांना दोन महिने आठ दिवस सांभाळून १२ फेब्रुवारी २०२५ रोजी ससून रुग्‍णालयाच्‍या आपत्कालीन कक्षात उपचारासाठी भरती केले. मात्र, त्‍यांनी त्‍यावेळी त्‍यांचे नाव न सांगता बेवारस म्‍हणून भरती केले. म्‍हणून त्‍यांची नोंद बेवारस अशी झाली. पुरोहित यांना अल्‍झायमरचा त्रास असल्‍याने ते देखील नाव, पत्‍ता सांगू शकत नव्‍हते. ससून रुग्‍णालयात त्‍यांच्‍यावर उपचार सुरू असताना त्‍यांचा ७ मार्च २०२५ रोजी मृत्‍यू झाला. डॉक्‍टरांनी बंडगार्डन पोलिसांना कळवले व मृतदेह शवविच्‍छेदनासाठी न्‍यायवैद्यकशास्‍त्र विभागात पाठवून दिला. बेवारस मृतदेहांचे अंत्‍यसंस्‍कार महापालिकेकडून करण्‍यात येतात.

मृत्‍यू दाखला मिळण्यासाठी पोलिस देणार पत्र
बंडगार्डन पोलिस ठाण्यात प्रकाश पुरोहित यांच्या पत्नी अलका पुरोहित यांना शुक्रवारी बोलावून घेतले होते. पुरोहित यांचा बेवारस मृत्यू म्हणून नोंद करताना काढलेली छायाचित्रे त्यांना दाखविण्यात आली. त्‍यावरून पत्नीने त्यांची ओळख पटविली. या प्रकरणी बेवारस मृत्यू झालेल्या व्यक्तीचा ओळख पटल्याचा अहवाल ससून रुग्णालय प्रशासनाला पाठविण्यात येणार असून, त्यांच्या मृत्यूची नोंद करून मृत्‍यू प्रमाणपत्राची कागदपत्रे त्यांच्या नातेवाइकांना देण्याची विनंती रुग्णालयाकडे केली जाणार आहे, अशी माहिती बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे त्‍याचबरोबर पुरोहित यांचे नातेवाईक भाजपचे पदाधिकारी पुष्‍कर तुळजापूरकर यांनी दिली.

समितीकडून ससूनमध्‍ये १७ जणांची चौकशी
या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्‍त अनिल भंडारी यांनी गुरुवारी दिले होते. त्‍यानुसार वैद्यकीय शिक्षण विभागाच्‍या सहसंचालक डॉ. पल्लवी सापळे यांच्‍या अध्‍यक्षतेखाली सर जे. जे. समूह रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे, न्यायवैद्यकशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. गजानन चव्हाण यांनी ससून रुग्‍णालयात शुक्रवारी दिवसभर चौकशी केली. यामध्‍ये प्रभारी अधिष्‍ठाता, वैद्यकीय अधीक्षक त्‍याचबरोबर न्‍यायवैद्यकशास्‍त्र विभाग, वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक, पुरोहित यांच्‍यावर उपचार करणारे डॉक्‍टर यांची चौकशी केली.

बेवारस रुग्‍णांना पानशेतला हलविले
घोरपडी येथील महापालिकेच्‍या मैदानात उघड्यावर असलेल्‍या दादासाहेब गायकवाड यांच्‍याकडील बेवारस वृद्धांना समाजकल्‍याण विभागाने पोलिसांच्‍या उपस्थितीत गुरुवारी रात्री पानशेत येथील जनसेवा फाउंडेशनच्‍या वृद्धाश्रमात हलविण्‍यात आले.

समितीने रुग्‍णालयातील ज्यांची गरज वाटली त्या १५ ते १७ जणांची चौकशी केली असून, त्‍यांचे जबाब नोंदवून घेतले आहेत. हा अहवाल सरकारकडे शनिवारी किंवा सोमवारी सादर करण्यात येईल.
- डॉ. पल्‍लवी सापळे, अध्‍यक्ष, चौकशी समिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com