वैद्यकीय निष्काळजीपणासाठी २६ लाखांची भरपाई

वैद्यकीय निष्काळजीपणासाठी २६ लाखांची भरपाई

Published on

पुणे, ता. २२ : प्रसूतीनंतर टाके घालताना टॉवेल शरीराच्या आतच राहिल्याने हृदयविकाराचा झटका येऊन तीन वर्षे कोमात राहिलेल्या महिलेच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरसह रुग्णालयाला राज्य ग्राहक आयोगाने दणका दिला आहे. या महिलेवरील उपचारांचा खर्च, तिच्या मृत्यूमुळे झालेल्या मानसिक-शारीरिक त्रासाची भरपाई आणि तक्रार खर्चापोटी रुग्णालय व डॉक्टरने २६ लाख ५० हजार रुपये तिच्या पतीला द्यावेत, असा निकाल आयोगाने दिला आहे.
वैद्यकीय निष्काळजीपणा आणि त्रुटीयुक्त सेवा दिल्याचे नमूद करत राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या पुणे खंडपीठाचे अध्यक्षीय सदस्य मिलिंद सोनवणे व सदस्य नागेश कुंबरे यांनी हा निकाल दिला. याप्रकरणी पाषाण येथील रहिवासी प्रशांत कुकडे यांनी सूस रस्त्यावरील जीवनदीप मेडिकेअर सेंटर व डॉ. दीपलक्ष्मी रगडे यांच्याविरोधात आयोगात दावा दाखल केला होता. तक्रारदारांच्या वतीने अॅड. ज्ञानराज संत यांनी बाजू मांडली.
तक्रारदारांची पत्नी रूपाली यांना प्रसूतीसाठी आठ ऑगस्ट २००८ ला रुग्णालयात दाखल केले होते. सिझेरियन प्रसूतीनंतर टाके घालताना त्यांच्या शरीरात एक टॉवेल राहिल्याचे लक्षात आले. त्यामुळे रूपाली यांना भूल देऊन टाके पुन्हा उघडावे लागले. मात्र, काही वेळातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल केले. तिथे त्यांच्यावर तीन दिवस उपचार केल्यानंतर ‘हायपॉक्सिक एन्सेफॅलोपॅथी’ झाल्याने वेगळ्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्या कोमात गेल्या. तीन वर्षे कोमात राहिल्यानंतर त्यांचे एक मे २०११ रोजी निधन झाले. त्यामुळे संबंधित रुग्णालय व डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप तक्रारदारांनी केला.
ससून रुग्णालयाच्या तज्ज्ञ समितीने वैद्यकीय नोंदी तपासल्यानंतर रुग्णालयातील डॉक्टरांच्या पथकाने पुरेशी दक्षता घेतली नसल्याचा निष्कर्ष नोंदविला. रुग्णालय व डॉक्टरांच्या वकिलांनी ही तक्रार केवळ पैसे उकळण्यासाठी दाखल केली असून, तक्रारदारांच्या पत्नीची योग्य काळजी घेतल्याचा दावा केला. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आयोगाने या प्रकरणात वैद्यकीय निष्काळजीपणा व सेवेत त्रुटी झाल्याचा ठपका रुग्णालय आणि डॉक्टरांवर ठेवला.

निकालातील महत्त्वाचे मुद्दे
- रुग्ण अत्यवस्थ झाल्यानंतर तिला तातडीने उच्च दर्जाच्या रुग्णालयात पाठविले नाही
- रुग्णालय व डॉक्टरांनी डिस्चार्जसह इतर वैद्यकीय कागदपत्रे दीड महिन्यानंतर दिली
- प्रसूतीपूर्वी तिची श्‍वसननलिका सुरक्षित ठेवण्याच्या उपाययोजना केल्या नाहीत
- शस्त्रक्रियेनंतर रुग्णालयातील डॉक्टरांनी अधिक सतर्क राहणे आवश्यक होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com