पेंटबॉल खेळताना गमावली दृष्टी

पेंटबॉल खेळताना गमावली दृष्टी

Published on

पुणे, ता. २२ : मनोरंजनासाठी खेळला जाणारा पेंटबॉल हा खेळ दुबईत खेळत असताना पुण्‍याच्‍या २२ वर्षीय तरुणीच्या डोळ्याला गोळी लागून गंभीर दुखापत झाली. यामध्‍ये तिच्‍या डोळ्यातील भिंग फुटले होते. तिच्‍या डोळ्यावर पुण्‍यातील ‘एनआयओ’ रुग्‍णालयात गुंतागुंतीची आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया पार पडली. दोन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर व त्‍यानंतरच्‍या उपचारानंतर आता तिची दृष्टी पूर्ववत होण्‍यास मदत होत आहे.
डोळ्याच्या अंतर्गत रचनेपर्यंत झालेल्‍या दुखापतीमुळे तिच्‍या डोळ्याचा रंगीत भाग असलेली परितारिका (आयरिस) फाटली होती. त्‍याने तिचा मूळ आकार पूर्णपणे बिघडला होता. त्‍याचबरोबर डोळ्याच्या आतील व्हिट्रिअस जेली या मुख्य पोकळीत रक्त जमा झाले होते. त्‍याने डोळ्यांना समोरचे दृश्य दिसण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या नेत्रपटलालाही (रेटिना) गंभीर दुखापत झाली होती. या तरुणीवर एनआयओ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे संचालक डॉ. आदित्य केळकर व इतर डॉक्टरांच्‍या विशेष पथकाने दोन तास शस्त्रक्रिया केली. त्‍यामध्‍ये परितारिका पूर्ववत केली. यासाठी डॉक्टरांनी मानवी केसाएवढा बारीक धागा वापरत या धाग्याच्या मदतीने ही पुनर्रचना केली. या सूक्ष्म व कौशल्यपूर्ण टाके घालण्याच्या पद्धतीने डोळ्याचा आकार आणि कार्य दोन्ही पूर्ववत होण्यास मदत झाली. दुसऱ्या टप्‍प्‍यात डोळ्यात फुटलेले नैसर्गिक भिंग (लेन्स) डोळ्याबाहेर काढले. त्‍याच्या जागी कृत्रिम अंतःनेत्र लेन्स बसवली. या लेन्स प्रत्यारोपणामुळे डोळ्याची दृष्टी पुन्हा पूर्ववत होण्‍यास मदत झाली. त्‍यानंतर डोळ्याच्या मागील भागात साचलेले रक्त काढून टाकण्यासाठी २५-गेज व्हिट्रेक्टॉमी ही सूक्ष्म शस्त्रक्रिया केली. यामध्‍ये डोळ्यांत बारीक छोट्या छिद्रांमधून विशेष सूक्ष्म उपकरणाच्‍या मदतीने डोळ्यांच्या आतील रक्त साफ केले जाते. त्‍यानंतर वैद्यकीय लेझरचा वापर करत नेत्रपटलातील फाटलेल्या जागेची दुरुस्ती केली. या लेझरद्वारे फाटलेल्या भागाला हलकी उष्णता देत बंद केले जाते. या प्रक्रियेमुळे नेत्रपटल मूळ जागेवर घट्ट बसते. त्यामुळे नेत्रपटल वेगळे होण्याचा धोकाही टळतो व कायमस्वरूपी दृष्टी गमावण्यापासून संरक्षण मिळते.

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ही तरुणी आली होती. तिच्या डोळ्यातील सर्व भाग खराब झाल्‍याने त्‍यावर शस्त्रक्रिया करणे आव्‍हानात्‍मक होते. आधुनिक तंत्रज्ञान व अतिसूक्ष्म शल्यचिकित्सेच्‍या बळावर व सततच्या तपासण्यांनंतर रुग्णाची दृष्टी पूर्ववत होऊ लागली आहे. तिला काही अंशी दिसू लागले आहे. पेंटबॉलसारख्या इतर सर्व मनोरंजक खेळांदरम्यान उच्च प्रमाणित चष्मा परिधान करावा.
- डॉ. आदित्‍य केळकर, नेत्र शल्‍यचिकित्‍सक, एनआयओ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com