पुणे, ता. १४ : देशात पाण्याची कमी नाही, मात्र कमी आहे ती नियोजनाची. हेच शेतकरी आत्महत्यांचे मूळ कारण आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन, शास्त्रोक्त जलसंधारणाची कामे आणि स्किलचा वापर केल्यास शेतकरी केवळ अन्नदाता न राहता ऊर्जादाता, हायड्रोजनदाता बनेल,’’ असा विश्वास केंद्रीय रस्ते बांधणी आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी व्यक्त केला. भाषणे देणारे या देशात खूप आहेत, परंतु स्वतः केले आणि नंतर लोकांना सांगितले अशांची संख्या कमी आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
नाम फाउंडेशनच्या दशकपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री गडकरी बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, जलसंधारण विभागाचे सचिव नितीन खाडे, आयकर आयुक्त नितीन वाघमोडे, ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर, विश्वस्त मकरंद अनासपुरे, चंद्रशेखर फणसळकर, एल. एस. चंद्रशेखर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, ‘‘राज्यात पाणी मुबलक आहे. मात्र जलसंधारण आणि सिंचन सुविधांअभावी शेतीच्या पाण्याच्या समस्या आहेत. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. पाण्याचे योग्य नियोजन केले आणि तंत्रज्ञानाचा वापर केला, तर शेतकऱ्यांचे उत्पन्नही वाढले. त्यादृष्टीने प्रयत्न होण्याची गरज आहे. प्रश्न कठीण आहे, तो लगेच सुटण्यासारखाही नाही. त्यासाठी सातत्याने काम करत राहते लागणार आहे. मी ठरविले आहे, विदर्भातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी आयुष्यभर प्रयत्नशील राहण्याचा.’’
मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘सामाजिक संस्था आणि सरकारद्वारे मोठी साखळी निर्माण करण्याची गरज आहे. या साखळीद्वारे सरकारच्या योजना तळागाळात पोचविण्यासाठी नामसारख्या संस्थांची गरज आहे. सामाजिक संस्थांच्या विविध उपक्रमांच्या शासकीय योजना होण्यासाठी त्या शासनापर्यंत पोहचणे गरजेचे आहे.’’
प्रास्ताविक मकरंद अनासपुरे यांनी केले. यावेळी विविध उद्योग समूहांचा सामाजिक दायित्व निधी दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला. वसुंधरा काशीकर यांनी सूत्रसंचालन केले.
स्वामिनाथन आयोग पूर्ण लागू करावा ः नाना पाटेकर
स्वामिनाथन आयोगाची सध्या अंशतः अंमलबजावणी सुरू आहे. मात्र हा आयोग पूर्णपणे लागू करावा, अशी अपेक्षा व्यक्त करताना नाना पाटेकर म्हणाले, ‘‘या आयोगामुळे शेतीच्या समस्या सुटण्यास आणि शेतकरी आत्महत्या कमी होण्यास मदत होईल.’’
सरकार तिथे समस्या
शेतीचे प्रश्न सोडवायचे असतील तर सामाजिक संस्थांची गरज आहे. सामाजिक कामात सरकारला दूर ठेवले पाहिजे. जिथे सरकार तिथे समस्या असते. तेथे मदत घेणे आवश्यक आहे. त्यामुळे उत्स्फूर्तपणे काम करणाऱ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून शेती आणि पूरक उद्योगांसाठी कौशल्ये विकसित करणे गरजेचे असल्याचे मत मंत्री गडकरी यांनी व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.