पूजा खेडकरच्या 
आईविरुद्ध गुन्हा

पूजा खेडकरच्या आईविरुद्ध गुन्हा

Published on

पुणे, ता. १५ : वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा दिलीप खेडकर (वय ४८, रा. नॅशनल सोसायटी, बाणेर-पाषाण रस्ता) यांच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चतु:शृंगी पोलिसांनी आज सोमवारी खेडकर यांच्या बंगल्याची झडती घेतली; परंतु त्यात काही आढळून आले नाही.

नवी मुंबईतील किरकोळ अपघाताच्या वादातून सुरू झालेल्या या प्रकरणाने अखेर पुण्यात नाट्यमय वळण घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. १३) सायंकाळी नवी मुंबईत मिक्सर ट्रकने मोटारीला किरकोळ धडक दिली. यानंतर मोटार चालकाने ट्रकमधील क्लीनर प्रल्हाद कुमार (वय २२, रा. नवी मुंबई) याला मोटारीत बसवून, रबाळे पोलिस ठाण्यात चला असे सांगितले; परंतु पोलिस ठाण्यात नेण्याऐवजी त्याला पुण्याच्या दिशेने नेले. याबाबत मिक्सर ट्रकमालकाने रबाळे पोलिस ठाण्यात अपहरणाची फिर्याद दिली.
तपासादरम्यान, नवी मुंबई पोलिसांनी मोटारीचे लोकेशन तपासल्यानंतर पोलिसांचे पथक रविवारी पुण्यातील बाणेर-पाषाण रस्त्यावरील खेडकर यांच्या बंगल्यात पोहोचले. सहाय्यक निरीक्षक दीपक खरात यांनी बंगल्याचा दरवाजा ठोठावला. खरात यांनी मनोरमा खेडकर यांना तपासात सहकार्य करण्याचे आवाहन केले. मात्र, त्यांनी दरवाजा बंद केला. त्यानंतर चतु:शृंगी पोलिस ठाण्यातून पुन्हा बंगल्यात पोहोचेपर्यंत खेडकर यांनी मोटार चालकास पसार होण्यास मदत केली. तसेच, पोलिसांना अडवण्यासाठी बंगल्यातील पाळीव श्वान सोडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या संदर्भात माहिती मिळताच परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, सहाय्यक आयुक्त विठ्ठल दबडे आणि वरिष्ठ निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर खेडकर आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, नवी मुंबई पोलिसांनी ट्रक क्लीनरची सुटका केली आहे. या घटनेनंतर चतु:शृंगी पोलिसांनी सोमवारी खेडकर यांच्या बंगल्याची झडती घेतली; परंतु त्यात काही आढळून आले नाही, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक उत्तम भजनावळे यांनी दिली. सहाय्यक निरीक्षक नरेंद्र पाटील तपास करीत आहेत.

Marathi News Esakal
www.esakal.com