वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सरसावले पोलिस दल

वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी सरसावले पोलिस दल

Published on

पुणे, ता. १६ : शहरात टोळीयुद्ध, वाहनांची तोडफोड, गुंड टोळक्यांकडून कोयत्याचा वापर, घरफोडी अशा स्वरूपाच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अशा गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. नाकाबंदी, कोम्बिंग ऑपरेशन प्रभावीपणे राबवून संशयास्पद वाहनांची तपासणी, गुन्हेगारांवर लक्ष, अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाईचा आदेश त्यांनी दिला आहे.

शहरात वाढती लोकसंख्या आणि स्थलांतरितांचा वाढता ओघ यामुळे पोलिसांपुढे गुन्हे रोखण्याचे आव्हान वाढले आहे. शहरात विशेषत: उपनगरांमध्ये चोऱ्या आणि घरफोडींचे प्रमाण वाढले आहे. किरकोळ कारणांवरून वाहनांची तोडफोड, गुंड टोळक्यांकडून कोयत्याचा वापर, ज्येष्ठ महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावणे अशा ‘स्ट्रीट क्राइम’च्या घटना होत आहेत. गुन्हेगारांकडून चोरीच्या वाहनांचा वापर केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काटेकोर वाहन तपासणी आणि कोम्बिंग ऑपरेशन प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत गुन्हे शाखेसह वाहतूक विभाग, राज्य राखीव पोलिस बल आणि पोलिस मुख्यालयातील विशेष पथकांचा सहभाग राहणार आहे.

गुन्हेगारांची झाडाझडती
कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान संशयित गुन्हेगारांची झडती घेण्यासह फरारी आणि सराईत गुन्हेगार, तडीपार आरोपी, जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांवर विशेष लक्ष केंद्रित केले जाणार आहे. प्रलंबित वॉरंट्स व समन्स बजावणीसह अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांची तपासणी केली जाईल. सर्व वाहनांना अडवून तपासणी न करता केवळ संशयास्पद वाहनांनाच थांबविण्यात येईल. विशेषतः जादा प्रवासी घेणाऱ्या रिक्षांची तपासणी काटेकोरपणे होईल. चालकांचा परवाना, वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र आणि विमा पॉलिसी ही प्राथमिक कागदपत्रे तपासली जातील. महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना गैरसोय होणार नाही, याकडे विशेष लक्ष दिले जाणार आहे.

शस्त्रसज्ज पोलिसांचा पहारा-
कोम्बिंग ऑपरेशनदरम्यान पोलिस अधिकारी आणि अंमलदार ९-एमएम कार्बाईन आणि पिस्तूल सोबत ठेवतील. नाकाबंदीच्या ठिकाणीही शस्त्रसज्ज पोलिस तैनात असतील. रात्री शासननिर्धारित वेळेनंतर सुरू असणाऱ्या पब, बार चालक-मालकांवर कारवाई केली जाईल. पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्या हद्दीत प्रभावी गस्त घालून गुन्हेगारी रोखावी, तसेच पोलिस नियंत्रण कक्षात ११२ या क्रमांकावर नागरिकांच्या तक्रारी येतात. नियंत्रण कक्षाकडून येणाऱ्या या तक्रारींवर तातडीने प्रतिसाद द्यावा, असे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.
---------
पुणे शहरात दाखल गुन्ह्यांचे प्रमाण
वर्ष- दाखल गुन्हे
२०२१- ८३१७
२०२२- १०,९६२
२०२३- ११,९७४
२०२४- १२,९५४
------
‘स्ट्रीट क्राइम’च्या घटना
वर्ष- दाखल गुन्हे
२०२१- ९३७
२०२२- १,१५२
२०२३- १,३९०
२०२४- १,५३५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com