‘एनआयए’चे महासंचालक सदानंद दाते यांचे व्याख्यान
पुणे, ता. १६ : ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) महासंचालक सदानंद दाते यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम येत्या शनिवारी (ता. २०) सायंकाळी ५.३० वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होणार आहे.
या वेळी दाते यांचे ‘अंतर्गत सुरक्षा : भारतासमोरील आव्हाने आणि उपाय’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देणाऱ्या व्यक्तींपैकी ते एक आहेत. या हल्ल्यात दाखविलेल्या शौर्यामुळे त्यांना राष्ट्रपती शौर्यपदकाने सन्मानित करण्यात आले आहे. २००६ मध्ये त्यांना उत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलिस पदक आणि २०१४ मध्ये विशिष्ट सेवेसाठी पदक प्राप्त झाले आहे. मुंबईतील २६/११च्या हल्ल्यामागील सूत्रधारांपैकी एक असलेल्या तहव्वूर राणाच्या चौकशीचे नेतृत्व दाते यांना सोपविण्यात आले आहे.
दाते हे महाराष्ट्र केडरमधील भारतीय पोलिस सेवेचे (आयपीएस) १९९० च्या बॅचचे अधिकारी आहेत. सध्या ते राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) महासंचालक पदावर कार्यरत आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेमध्ये पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दल (सीआरपीएफ), गुप्तचर विभाग (आयबी) आणि महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) मध्ये प्रमुख पदांवर काम केले आहे.
‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे डॉ. परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी व्याख्यानाचे आयोजन करण्यात येते.या वेळी स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार (कै.) ना. अ. पेंडसेपुरस्कृत ‘डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कारां’चे वितरण करण्यात येईल, तसेच समाजात विधायक बदलांसाठी कार्य करणाऱ्या निवडक व्यक्तींचा सन्मानही करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे करण्यात आले आहे.
डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या जयंतीनिमित्त व्याख्यान :
- वक्ते : सदानंद दाते, महासंचालक, राष्ट्रीय तपास संस्था
- विषय : ‘अंतर्गत सुरक्षा : भारतासमोरील आव्हाने आणि उपाय’
- कधी : शनिवार (ता. २० सप्टेंबर २०२५)
- कुठे : बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
- केव्हा : सायंकाळी ५.३० वाजता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.