
मोत्यांचे दागिने
राधिका वळसे पाटील
सणासुदीचा हंगाम सुरू झाला की बाजारपेठा नव्या ट्रेंड्स आणि आकर्षक दागिन्यांनी खुलून जातात. नवरात्रीपासून दसऱ्यापर्यंत आणि दिवाळीपर्यंत महिलांचे लक्ष जे दागिन्यांकडे वेधले जाते, त्यात मोत्यांच्या दागिन्यांना विशेष स्थान आहे. पारंपरिक सौंदर्य, साधेपणा आणि आकर्षक, मनमोहक लुकमुळे मोत्यांचे दागिने नेहमीच महिलांची पहिली पसंती ठरले आहेत.
मोती हे सौंदर्य, शांती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जातात. मोत्यांचा नैसर्गिक रंग आणि चमक कोणत्याही पोशाखाला एक खास ‘स्पर्श’ देतात. पारंपरिक साड्यांपासून ते आधुनिक गाउनपर्यंत, मोत्यांचे दागिने कोणत्याही वेशभूषेला पूरक ठरतात. सणासुदीच्या काळात, महिला खास करून मोत्यांचे दागिने पसंत करतात. मोत्यांचे दागिने हे एक टाइमलेस गुंतवणूक आहेत. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या जुन्या मोत्यांच्या माळा आजही वापरल्या जातात.
मोत्यांच्या दागिन्यांचे विविध प्रकार
बाजारात मोत्यांच्या दागिन्यांची एक मोठी रेंज उपलब्ध आहे त्यात, नेकलेस (मणीहार)- सिंगल-स्ट्रँड नेकलेस, व मल्टी-लेयर नेकलेस उपलब्ध असून त्यात चोकर आणि लांब माळा, कानबाळी, नथ, बिंदी, माथा पट्टी, मंगळसूत्रांमध्ये मोत्यांची नक्षी, केसांमध्ये लावण्यासाठी विविध मोत्यांचे ब्रोच, क्लिप्स व गजरे कंबरपट्टा इअररिंग्समध्ये साधे स्टड, ड्रॉप इअररिंग्स आणि पारंपरिक झुमके यांचा समावेश आहे. ब्रेसलेट आणि बांगड्यांमध्ये मोत्यांचे ब्रेसलेटला विविध आकारातून, लटकनासोबत, विविध रंगांचे खडे, चैन लावून बनवले जातात तर मोत्यांच्या बांगड्यांवर विविध रंगांचे खडे, हिरे किंवा इतर मौल्यवान रत्नांचे नक्षीकाम असल्यास त्यांची शोभा वाढते. सोप्या डिझाइनच्या अंगठ्यांपासून ते कॉकटेल रिंग्जपर्यंत, मोत्यांच्या अंगठ्या आकर्षक दिसतात.
महिलांची पसंती आणि सध्या ट्रेंडिंग
आजच्या महिलांना हलक्या वजनाचे, रोजच्या वापरासाठी योग्य आणि फॅशन स्टेटमेंट देणारे दागिने आवडतात. त्यामुळे मोत्यांचे चोकर्स, लेयर्ड नेकलेस आणि मिनिमलिस्ट पर्ल इअररिंग्स ट्रेंडमध्ये आहेत. सध्या ‘ऑफ-व्हाइट पर्ल्स’ आणि ‘क्रीम शेड्स’ अधिक लोकप्रिय आहेत. नव्या पिढीला ‘पर्ल-गोल्ड कॉम्बो’ किंवा ‘पर्ल-डायमंड सेट्स’ अधिक भावत आहेत.
रंगीबेरंगी मोती : पांढरे मोती नेहमीच सर्वांच्या पसंतीचे असतात, पण फिकट पिवळा, निळा, गुलाबी, काळ्या आणि सोनेरी मोत्यांना मागणी वाढली आहे. हे रंग पारंपरिक डिझाइन्सना एक आधुनिक स्पर्श देतात.
फ्यूजन ज्वेलरी : डिझाइनर्स कुंदन, मीनाकारी आणि पोल्की हिऱ्यांसोबत मोत्यांचा वापर करून खास ज्वेलरी तयार करत आहेत. यामुळे पारंपरिक आणि आधुनिक शैलीचा सुंदर संगम साधला जातो.
मिनिमलिस्ट डिझाईन्स : जे महिला कमीतकमी दागिने पसंत करतात, त्यांच्यासाठी पातळ चेनमध्ये एक मोती किंवा लहान इअररिंग्स उत्तम पर्याय आहेत.
किमतींचा अंदाज आणि गुणवत्ता
- मोत्यांच्या दागिन्यांची किंमत मोत्यांच्या प्रकार, आकार, चमक आणि वापरलेल्या धातूवर अवलंबून असते.
- फ्रेशवॉटर मोती : हे सर्वांत सामान्य आणि स्वस्त मोती आहेत. ते विविध आकार आणि रंगात उपलब्ध असतात.
- अकोया मोती : त्यांच्या गोल आकार आणि उच्च चमकसाठी ओळखले जातात.
- साउथ सी मोती : हे सर्वांत मोठे आणि मौल्यवान मोती आहेत. त्यांचा वापर महागड्या दागिन्यांमध्ये केला जातो.
- ताहिती मोती : यांना ‘काळे मोती’ ओळखले जाते. त्यांच्या विशिष्ट गडद रंगासाठी ते खूप मौल्यवान मानले जातात.
- साधे पर्ल स्टड्स ५०० ते १,५०० रुपयांमध्ये मिळतात, तर आकर्षक डिझाईनचे चोकर्स ३,००० ते १०,००० रुपयांपर्यंत जातात. नैसर्गिक समुद्री मोती वापरलेले दागिने किमतीत महाग असले तरी त्यांची शोभा आणि टिकाऊपणा अधिक असतो. कृत्रिम मोत्यांचे दागिने तुलनेने स्वस्त असल्याने सर्वसामान्य ग्राहकांमध्ये त्यांना अधिक मागणी आहे.
मोत्यांच्या दागिन्यांत मुख्य तीन प्रकार असतात, तन्मणी, चिंचपेटी, आणि राणी हार, यात विविध पॅटर्न प्रमाणे डिझाईन उपलब्ध आहेत. तसेच मोत्यांमध्ये देखील विविध प्रकार आहेत, गोल आकाराचा मोती, नॅचरल मोती, आदींचा समावेश आहे. यंदा आमच्याकडे मोत्यांमध्ये ऑक्सिडाइझ गळ्यातले, हार, कानातले उपलब्ध असून, अमेरिकन डायमंड आणि मोती असे फ्युजन केलेले दागिने आहेत. लग्नसराई तसेच सणासुदीला मोत्यांचे दागिने जास्त प्रमाणात घेतले जातात.
- श्री राधेय पर्ल्स, कर्वे रस्ता
चोकर पॅटर्न, लप्पा, एडीएफ स्टोनमधील तसेच खड्यांमधील मोत्यांसामवेत दागिने उपलब्ध आहेत. सध्या कस्टमाइज करून दागिने बनवले जातात. जसे ग्राहकांची ऑर्डर असते त्याप्रमाणे आम्ही दागिने बनवून देतो. ट्रॅडिशनल, वेस्टर्न, फ्युजन, असे विविध मोत्यांमधील लुक सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. तर काही ग्राहक फक्त एक साधी मोत्याची माळ घालण्यास प्राधान्य देतात. तसेच यंदा ‘शेलपल’ म्हणून मोत्यांचे दागिने बाजारात आले आहेत. त्यात मोत्यांचे कलर मध्ये वैविध्य असून क्रीम, लाल, गुलाबी, पांढरा रंगाचा सामावेश असतो.
- कुलस्वामिनी ज्वेलरी, कर्वे रस्ता
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.