पुणे
खराडीत भरदिवसा घरफोडी, सव्वातीन लाखांचे दागिने लंपास
पुणे, ता. १५ : भरदिवसा घरफोडी करून चोरट्यांनी खराडी परिसरातील एका सदनिकेतून सव्वातीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लांबविल्याची घटना उघडकीस आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे खराडी गावठाणातील साई सदन सोसायटीत वास्तव्यास आहेत. रविवारी सकाळी सातच्या सुमारास तक्रारदार कुटुंबीयांसह बाहेर गेले होते. यादरम्यान चोरट्यांनी बंद सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातून सव्वातीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले. रात्री नऊच्या सुमारास तक्रारदार परत घरी आले असता कुलूप तुटलेले दिसले. कपाटातील दागिने चोरीस गेल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सोमवारी खराडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली.