सत्काराच्या औचित्याचेच ‘पानिपत’
पुणे, ता. १६ ः ‘विश्वास पाटील यांना तुरुंगात जाण्यापासून मीच वाचवले’, ‘संमेलनातील परिसंवाद कोणीच ऐकत नाहीत,’ ‘संमेलनाध्यक्षांपुढे आदिवासी कलावंतांना नाचवा, मिरवणूक काढा’, ‘विश्वास पाटील हे **बाज आणि **बाज नाहीत’, ‘नेमाडे यांची कोसला कादंबरी महत्त्वाची वाटत नाही’.... वगैरे वगैरे!
वरील सर्व धक्कादायक विधाने कोणा ऐऱ्यागैऱ्यांची नव्हेत; तर चक्क मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक म्हणवल्या जाणाऱ्यांची आहेत. शिवाय, महाराष्ट्रातील सारस्वतांचे आद्य ठिकाण मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात झालेल्या नियोजित संमेलनाध्यक्षांच्या सत्काराच्या कार्यक्रमातील आहेत. मंगळवारी मसाप आणि साहित्य महामंडळातर्फे आयोजित विश्वास पाटील यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात बोलताना वक्त्यांचा तोल गेल्याचे पाहायला मिळाले. आक्रमक विधाने करत साहित्य विश्वाची ‘झाडाझडती’ घेऊन ‘महानायक’ होऊ पाहणाऱ्या या वक्त्यांच्या बेताल विधानांनी मात्र सत्काराच्या औचित्याचेच ‘पानिपत’ झाले.
मसापचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांनी चक्क साहित्य संमेलनातील कार्यक्रमांचीच खिल्ली उडवली. ‘प्रत्येक साहित्य संमेलन हे वादग्रस्त झालेच पाहिजे. संमेलनातील परिसंवाद कोणीही ऐकत नाहीत. परिसंवादाच्या मंडपात वक्ते सहा आणि श्रोते पाच, असे चित्र मी पाहिले आहे. त्याऐवजी चांगला कलेचा कार्यक्रम असेल, तर तिकडे लोक गर्दी करतात,’ अशा शब्दांत कसबे यांनी संमेलनातील ‘साहित्यिक’ विचारमंथनाचीच चेष्टा केली.
विश्वास पाटील यांना तुरुंगात जाण्यापासून वाचवल्याचा दावाही कसबे यांनी केला. पाटील यांनी आपल्या भाषणात सौम्यपणे हा दावा खोडून काढला. शिवाय कसबे यांनी भाषणाच्या क्रमाचे औचित्य मोडत सत्कारमूर्तींच्या अगोदरच भाषण केले.
विश्वास पाटील यांना त्यांच्यावर झालेल्या आरोपांचे स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, असे सांगताना ‘समाजाचे चारित्र्य संशयास्पद झाल्याच्या काळात लेखकाचे चारित्र्य काय पाहता? पाटील हे **बाज नाहीत आणि **बाज नाहीत’, असे प्रमाणपत्र डॉ. सबनीस यांनी दिले.
----
नेमाडेंच्या ‘कोसला’ कादंबरीवरही टीका
डॉ. रावसाहेब कसबे आणि श्रीपाल सबनीस यांनी भालचंद्र नेमाडे यांच्या ‘कोसला’ कादंबरीवरही निशाणा साधला. ‘‘मराठीतील सर्व लेखकांची एकच कादंबरी चांगली असते. त्याच कादंबरीच्या जिवावर ते पुढे जातात. भालचंद्र नेमाडे यांचीही ‘कोसला’ ही अस्सल कलाकृती आहे; मात्र पुढे काहीच नाही,’ अशी टीका डॉ. कसबे यांनी केली. ‘माझ्या दृष्टीने ‘कोसला’देखील महत्त्वाची नाही. त्यापेक्षा अण्णा भाऊ साठे यांची ‘फकिरा’ ही कादंबरी अत्यंत श्रेष्ठ आहे,’ असे म्हणत सबनीस यांनी ‘संमेलनाला रिकामटेकड्यांचे उद्योग म्हणणाऱ्या नेमाडे आणि रंगनाथ पठारे यांच्याकडे अध्यक्षपदासाठी विनवणी करायला जाण्याचे काही कारण नाही,’ असा सल्लाही महामंडळाला दिला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.