पुणे महापालिकेच्या तिजोरीत २०० कोटींची भर

पुणे महापालिकेच्या तिजोरीत २०० कोटींची भर

Published on

पांडुरंग सरोदे ः सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. १७ ः महापालिकेच्या हद्दीमध्ये विविध प्रकारच्या मिळकती असूनही त्यांची नोंद महापालिकेकडे नव्हती, अशा मिळकती शोधून त्यांना करआकारणी करण्याचे महत्त्वपूर्ण काम पुणे महापालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मिळकतकर विभागाने अवघ्या पाच महिन्यांमध्येच ३० हजार ५३६ अधिक मिळकतींचा शोध घेतला आहे. या मिळकतींमुळे सुमारे २०० कोटी रुपयांचा कायमस्वरूपी महसूल आता महापालिकेच्या तिजोरीत पडणार आहे.
यंदा मिळकतकर विभागाने पालिकेकडे आत्तापर्यंत नोंदणी न झालेल्या जुन्या मिळकतींचा शोध घेऊन त्यांच्याकडून नव्याने करआकारणी करण्याचे निश्‍चित केले होते. त्याबाबत मिळकतकर विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांनाही सूचना दिल्या होत्या. त्यानुसार एप्रिल महिन्यापासून संबंधित मिळकतींचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली होती. आत्तापर्यंत ३० हजार ५३६ मिळकतींचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये आत्तापर्यंत मिळकतकर न भरणाऱ्या मिळकती, जुन्या बांधलेल्या मिळकती, भोगवटे प्रलंबित असणाऱ्या मिळकती व नव्याने नोंदणी झालेल्या मिळकती अशा मिळकतींचा समावेश आहे. विशेषतः मागील १ ते २ वर्षांपासून प्रलंबित असणारे भोगवटे निकाली काढण्यात आले. ३० हजार ५३६ मिळकतींचा एकूण १९८ कोटी ३१ लाख इतका महसूल आता महापालिकेस कायमस्वरूपी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. महापालिकेने पाच महिन्यांतच शोधलेल्या मिळकतींचा ६१ कोटी ८३ लाख रुपये इतका महसूल तिजोरीत जमा झाला आहे. आर्थिक वर्षाच्या समारोपापर्यंत ८० हजार जुन्या-नव्या मिळकतींचा शोध घेऊन त्यांच्याकडून कर आकारणी करण्याचेही उद्दिष्ट महापालिकेने ठरविले आहे. त्यानुसार पुढील सात महिन्यांत उर्वरित मिळकतींचा शोध घेऊन त्यांच्याकडून कर आकारणी केली जाणार आहे.

यापुढेदेखील ही शोधमोहीम कायम राहणार आहे. सुमारे २०० कोटी रुपये संबंधित मिळकतींमधून प्राप्त होतील, त्यापैकी ६१ कोटी रुपये महापालिकेस मिळाले आहेत.
- अविनाश सपकाळ, प्रमुख, मिळकतकर विभाग, पुणे महापालिका

दृष्टिक्षेपात
- मिळकतींची एकूण संख्या - १४ लाख ८० हजार
- महापालिकेने शोधलेल्या मिळकतींची संख्या - ३० हजार ५३६
- शोधलेल्या मिळकतींमधून मिळणारा कर - १९८ कोटी ३१ लाख रुपये
- मिळकतकर तत्काळ भरणारे मिळकतधारक - ७ हजार ८३६
मिळकतकराची भरलेली रक्कम - ६१ कोटी ८३ लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com