‘सकाळ’च्या वतीने डॉ. नानासाहेब परुळेकर पुरस्कार जाहीर
पुणे, ता. १७ : ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे देण्यात येणाऱ्या डॉ. नानासाहेब परुळेकर स्मृती पुरस्कारांसाठी यंदा प्रिन्सिपल करस्पाँडन्ट माधव इतबारे (छत्रपती संभाजीनगर), वरिष्ठ बातमीदार संतोष मिठारी (कोल्हापूर), उपसंपादक स्वप्नील शिंदे (सातारा) आणि जिल्हा बातमीदार मिलिंद उमरे (गडचिरोली) यांची निवड करण्यात आली आहे.
‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या १२८ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय तपास संस्थेचे (एनआयए) महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. पुरस्कारांचे वितरण येत्या शनिवारी (ता. २०) सायंकाळी साडेपाच वाजता बालगंधर्व रंगमंदिरात होईल. यावेळी दाते यांचे ‘अंतर्गत सुरक्षा : भारतासमोरील आव्हाने आणि उपाय’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासह विविध विषयांवर सातत्याने लेखन करणाऱ्या बातमीदारांना दरवर्षी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. स्वातंत्र्यसैनिक व ज्येष्ठ पत्रकार (कै) ना. अ. पेंडसे यांनी दिलेल्या निधीतून हे पुरस्कार देण्यात येतात.
छत्रपती संभाजीनगर आवृत्तीच्या इतबारे यांनी तेथे गेल्या २० वर्षांपासून गंभीर बनलेला पाणीप्रश्न मांडला. यासंदर्भात ‘कुठेय पाणी’ ही ४४ भागांची वृत्तमालिका त्यांनी लिहिली. त्याची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा आढावा घेत ऑक्टोबर २०२५ पर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानंतर अवघ्या दीड महिन्यात पाणी योजनेचा एक टप्पा पूर्णदेखील करण्यात आला.
कोल्हापूर आवृत्तीच्या मिठारी यांनी उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयातील गैरकारभार उघडकीस आणला. याची दखल घेत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तत्कालीन सहसंचालक, कनिष्ठ प्रशासन अधिकारी, वरिष्ठ लिपिक यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर शासनाने कोल्हापूर, नागपूर, नांदेड आणि मुंबई उच्च शिक्षण विभागीय सहसंचालक कार्यालयांतील अनियमित कामकाजाच्या तपासणीसाठी चारसदस्यीय समिती स्थापन केली.
सातारा आवृत्तीच्या शिंदे यांनी रोजगार हमी योजनेतील गैरव्यवहाराचा पर्दाफाश करणारा विषय मांडला. सातारा जिल्ह्यात या योजनेंतर्गत काम केलेल्या मजुरांना त्यांच्या कष्टाचा मोबदला न मिळाल्याचे आणि मजुरांची मजुरी अदृश्य लाभार्थ्यांच्या खात्यांत जमा होत असल्याचा धक्कादायक प्रकार त्यांनी उघडकीस आणला. याची दखल घेत आता सरकारकडून अदृश्य लाभार्थ्यांच्या खात्यांत जमा झालेली रक्कम वसूल करण्याची कार्यवाही सुरू आहे.
गडचिरोलीतील उमरे यांनी ‘माणूस आणि वन्यजीव संघर्ष’ यावर लिखाण केले. विशेषत: गडचिरोली जिल्ह्यातील वाघ आणि हत्तींच्या समस्यांवर लिखाण करून हा प्रश्न त्यांनी ऐरणीवर आणला. त्याची दखल घेत वनविभाग आणि सरकारने माणूस आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष कमी करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. ‘कमलापूर हत्तींच्या कॅम्प’वरील रिपोर्ताज, मोहटोला या अतिदुर्गम गावातील ‘गोंडी भाषेतील एकमेव शाळा’ यावरील रिपोर्ताज हे त्यांचे गाजलेले विषय आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.