पं. मुकेश जाधव यांना ''उस्ताद बालेखान मेमोरियल पुरस्कार''
पं. मुकेश जाधव यांना ‘उस्ताद बालेखान मेमोरिअल पुरस्कार’
पुणे, ता. १८ : पंडित मुकेश श्रीपतराव जाधव यांना ‘उस्ताद बालेखान मेमोरिअल को कलाकार पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. कर्नाटकातील धारवाड येथे झालेल्या संगीत महोत्सव आणि पुरस्कार सोहळ्यात उस्ताद बालेखान मेमोरिअल फाउंडेशनच्या वतीने हा मानाचा पुरस्कार देण्यात आला.
जाधव यांनी तबल्याचे शिक्षण पं. शांताराम चिगरी गुरुजी यांच्याकडे १६ वर्षे घेतले आहे. त्यांनी देश-विदेशातील विविध संगीत महोत्सवामध्ये सहभाग घेतला असून, स्वतंत्र तबलावादन तसेच संगत या दोन्ही क्षेत्रांत त्यांचा विशेष ठसा आहे. यांची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
‘अनुभूती’ विशेष कार्यक्रमाचे उद्या आयोजन
पुणे, ता. १८ : विचारवंत व रामायण-महाभारताचे अभ्यासक स्व. दाजी पणशीकर यांनी वक्तृत्व आणि लेखनाद्वारे सहा दशके महाराष्ट्राचे प्रबोधन केले. त्यांच्या साहित्यातल्या निवडक अंशांचे अभिवाचन आणि व्याख्यानाच्या चित्रफिती यांचा मिलाफ असलेल्या ‘अनुभूती’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन कलासरगमने केले आहे. हा कार्यक्रम येत्या शनिवारी (ता. २०) सायंकाळी सात वाजता टिळक रस्ता येथील हिराबाग परिसरातील श्रीराम लागू रंग-अवकाश येथे होणार आहे. कार्यक्रमात रंगकर्मी अशोक समेळ, नाट्य दिग्दर्शक कुमार सोहनी, ज्येष्ठ निवेदिका वासंती वर्तक, विदुषी नंदिनी बेडेकर यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांच्याकडून स्व. दाजी पणशीकर यांच्या साहित्याचे अभिवाचन केले जाणार आहे. प्रा. विजय जोशी यांची संकल्पना-दिग्दर्शन असलेल्या या कार्यक्रमाचे निवेदन आणि चित्रफिती नरेंद्र बेडेकर सादर करणार आहेत. कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असून, रसिकांनी उपस्थित राहून अभिजात मराठीची अनुभूती घ्यावी, असे आवाहन विश्वास कणेकर यांनी केले.
जिल्ह्यातील ४० शिक्षकांचा आदर्श पुरस्काराने गौरव
पुणे, ता. १८ : याव्हे निस्सी ख्रिश्चन असोसिएशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने ‘जीवनगौरव’ पुरस्कार व ‘आदर्श शिक्षक-शिक्षकेतर’ पुरस्काराचे वितरण गंज पेठ येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहामध्ये नुकतेच झाले. कार्यक्रमात डॉ. पी. ए. इनामदार यांना यावर्षीचा जीवनगौरव पुरस्कार माजी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते देण्यात आला. तसेच पुणे जिल्ह्यातील ४० शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.
याप्रसंगी उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी प्रमुख मंगेश चिवटे, शिव कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुधीर कुरुमकर, सुदर्शन त्रिगुणाईत, बिशप अजित फरांदे, विजय कचरे, आझम कॅम्पसचे विश्वस्त जावेद मुजावर, आसिफ शेख, नितीन गोडे, प्रकाश नानिवडेकर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संस्थेचे सचिव अनिल गडकरी यांनी केले. आभार शिक्षक अश्पाक शेख यांनी मानले.