नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्वाचा अनोखा वारसा

नेतृत्व, कर्तृत्व, दातृत्वाचा अनोखा वारसा

Published on

यंदा ९०वे वर्ष साजरे करीत असलेल्या पूना गेस्ट हाउसविषयी स्नेह व्यक्त करण्यासाठी विदिशा विचार मंच तर्फे २० सप्टेंबर रोजी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात सत्कार सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्यानिमित्त सरपोतदार कुटुंबाशी असलेल्या ऋणानुबंधांचे शब्दचित्र.

- डॉ. सतीश देसाई, संस्थापक-अध्यक्ष, पुण्यभूषण फाउंडेशन

पूना गेस्ट हाउस हा खरंतर अनुभवण्याचा विषय असून ज्यांच्या आयुष्यात चांगले योग असतात, त्यांचे पूना गेस्ट हाऊसशी ३६ गुण सहज जुळतात. मात्र, पूना गेस्ट हाउसचे चारूकाका सरपोतदार यांच्यासमोर बसणाऱ्या व्यक्तीला कायम भीती वाटायची की ते काय बोलतील. सगळ्यांच्या मनात त्यांच्याविषयी आदरयुक्त दबदबा होता; पण चारूकाका, विश्वास सरपोतदार काय किंवा बंडोपंत म्हणजे दिल्लीच्या गेस्ट हाउसचे मालक असो किंवा आमचे गजानन सरपोतदार जे महानगरपालिकेच्या निवडणुकीला उभे होते. या सगळ्या भावांशी माझा जवळून संपर्क आला.
गजाननकाका सरपोतदार यांचा प्रचार करण्यापासून ते यशवंतराव चव्हाण दिल्लीत संरक्षणमंत्री असताना बंडोपंत सरपोतदारांच्या दिल्लीतील पूना गेस्ट हाउसला जाण्याचा योग मला आला होता.
मी अनेक वर्षे पूना गेस्ट हाउसमध्ये चारूकाकांना भेटायला जात होतो. १९७९ मध्ये अण्णा जोशी यांच्या विरुद्ध मी निवडणुकीला उभा राहिलो होतो. खरंतर चारूकाकांच्या प्रत्येक श्‍वासात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ होता. मात्र, मी निवडणुकीला उभा राहतो आहे, हे कळल्यावर माझ्या निवडणूक प्रचाराचा नारळ वाढवण्यासाठी चारूकाका तिथे आले होते. आपल्या प्रेमाच्या आड विचारांची मतमतांतरे, पक्षीय हेवेदावे असे काहीही न आणता मदत करणे, हे त्यांचे धोरण होते. हा स्वभाव सरपोतदार कुटुंबाच्या पुढच्या पिढ्यांमध्येही पाहायला मिळतो.
हे सगळे कुटुंब व्यवसायाचा सगळा प्रपंच सांभाळून सांस्कृतिक विश्वात आपले योगदान देत आहेत. पॅव्हेलियन मॉल असो की, झपूर्झा असो. नव्या-जुन्या पिढीशी आणि कलेशी जोडलेली आपली नाळ पूना गेस्ट हाउसने कायमच घट्टपणे सांभाळली आहे. मधू आपटे आणि काशिनाथ घाणेकर हे ज्येष्ठ कलावंत त्यांच्या शेवटच्या काळात पूना गेस्ट हाउसलाच वास्तव्यास होते. तसेच मंगेशकर कुटुंबासह सुलोचनादीदी, आशा काळे, बेबी शकुंतला, सूर्यकांत, चंद्रकांत अशा अनेक कलावंतांवर सरपोतदार कुटुंबाने भरभरून प्रेम केले. कलावंतांना केवळ जेवण देणेच नाही, तर निवास आणि आजारपणातही त्यांची आपुलकीने काळजी घेणारी ही वास्तू कायमच आपले वैशिष्ट्य जपत आली आहे. त्यामुळेच पूना गेस्ट हाउसला ‘कलाकारांचे माहेर’ असे म्हटले जाते.
प्रश्न कोणताही असला तरी, त्याचे निराकरण पूना गेस्ट हाउसमध्ये व्हायचे. कारण, प्रत्येकासाठी सरपोतदार कुटुंबीयांच्या मनाची दारे कायम खुली असतात. संस्कारांचा हा वारसा सरपोतदार कुटुंबीयांना नानासाहेब सरपोतदार आणि त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई यांच्याकडून मिळाला. हा वारसा पुढे नेणे ही काळाची गरज होती आणि हा वारसा म्हणजे काळाच्या पडद्यावरील एक सुवर्णपान आहे. त्यांची पुढची पिढी नव्या काळाचा विचार करून पुढे जात असताना मागील जुन्या संस्कारांशी घट्टपणे जोडलेली आहे. नवीन पिढीने जगाला गवसणी घालणेच अपेक्षित असून ते काम पुढची पिढी करत आहे. जगात पूना गेस्ट हाउस हा ब्रँड मिसळ, आळूची भाजी, कढीभात, दालखिचडी अशा कोणत्याही रूपात जाईल तेव्हा ते जगातील सर्व मॉलमध्ये आपल्याला दिसेल, असा मला विश्वास आहे. सरपोतदार कुटुंबाच्या चारही पिढ्यांशी जोडलेला आणि तीन पिढ्यांच्या जडणघडणीचा म्हणजे किशोर-साधना आणि अभय-शर्मिला, तसेच चौथ्या पिढीतील सनत आणि अदिती यांच्याशी माझे ऋणानुबंध जोडलेले आहेत. संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा, असे हे सांस्कृतिक संचित आहे. हे संचित भविष्यातील अनेक दशके वृद्धिंगत होवो, अशा शुभेच्छा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com