ऐन पावसाळ्यात गावे तहानलेली

ऐन पावसाळ्यात गावे तहानलेली

Published on

पुणे, ता. १८ ः महापालिकेच्या पाणीपुरवठ्यामध्ये असणाऱ्या असंख्य त्रुटी, अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा होण्यास येणाऱ्या अडचणी, अशा अनेक कारणांमुळे हडपसर व परिसरातील महंमदवाडी, केशवनगर व इतर गावांमध्ये पाणी समस्या गंभीर आहे. धरणात मुबलक पाणीसाठा असतानाही पाणी मिळत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत. दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून संबंधित परिसराला नियमित व पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा व्हावा, यासाठी किरकोळ स्वरूपाच्या उपाययोजना सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
खडकवासला धरण साखळीतील सर्व धरणे १०० टक्के भरली आहेत. शहरात अजूनही संततधार सुरू असल्याने खडकवासला धरणातून टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. एकीकडे धरणांमध्ये पाण्याचा मुबलक साठा असताना शहराच्या पूर्व भागामध्ये असणाऱ्या हडपसर गाडीतळ, सातववाडी, गोंधळेनगर या परिसरात अपुरा पाणीपुरवठा होत आहे, तर काळेपडळ, मांजरी, महंमदवाडी, केशवनगर, साडेसतरानळी, केशवनगर, मगरपट्ट्याच्या पाठीमागील बाजूस असलेले टिळेकरनगर परिसरातील नागरिकांना तर पाणीच उपलब्ध होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. महंमदवाडी, तरवडे वस्ती, हांडेवाडी रोड या परिसरात मोठमोठे गृहप्रकल्प आहेत. संबंधित परिसर महापालिकेच्या हद्दीत येतो, तरीही या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची गैरसोय सुरू आहे. संबंधित परिसरात महापालिकेकडून टॅंकरने पाणीपुरवठा केला जातो, मात्र टॅंकरद्वारे होणारा पाणीपुरवठादेखील अपुरा असल्याने नागरिकांवर खासगी टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे.

अशी आहे स्थिती
- हडपसर परिसर एक ते दीड लाख, काळेपडळ येथे ७५ हजार, मांजरी येथे सव्वा लाख, साडेसतरानळी येथे ३० हजार, केशवनगर येथे एक लाख इतकी लोकसंख्या
- या परिसराला दररोज केवळ १५ मिनिटे पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी
- उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांनी हडपसर परिसरातील समस्यांसंदर्भात बैठक घेतली होती
- यावेळी संबंधित गावांमधील नागरिकांनी पवार यांच्यासमोर पिण्याच्या पाण्यासंदर्भात कैफियत मांडली
- त्यावेळी पवार यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना यासंदर्भात गांभीर्याने लक्ष घालून नागरिकांना पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना केल्या
- महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सध्या पाणी गळतीवर उपाययोजना केल्या जात आहेत

हडपसर व केशवनगरमध्ये काही भागांत पाणीपुरवठा कमी होत आहे. तसेच महापालिकेत समाविष्ट झालेल्या हडपसर परिसरातील गावांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी समान पाणीपुरवठा योजनेंतर्गत काम सुरू आहे. पाणीपुरवठा नियमित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणीपुरवठा विभाग, पुणे महापालिका

पुण्यात सगळीकडे नियमित पाणीपुरवठा होतो, मात्र हडपसर व परिसरातील गावांमध्ये केवळ १० ते १५ मिनिटे पाणी येते. त्यातही पाणी अपुरे असते. त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पैसे मोजण्याची वेळ आली आहे.
- राजू गोसावी, रहिवासी, काळेपडळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com