पुणे शहरात दुसऱ्यांदा पावसामुळे रस्ते तुंबले
पुणे, ता. १८ ः महापालिकेने पावसाळी वाहिन्यांमधील गाळ काढल्याबाबत केलेला दावा गुरुवारी सायंकाळी शहरात झालेल्या जोरदार पावसाने पुन्हा एकदा खोडून काढला. जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साठल्याने रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते, तर गुडघाभर पाण्यातून वाट शोधताना पादचारी व वाहनचालकांची अक्षरशः तारांबळ उडाली. वाहनांमध्ये पाणी गेल्याने अनेक वाहने बंद पडण्याच्या घटनेमुळे तर चालकांची आणखीनच दयनीय अवस्था झाल्याचे चित्र गुरुवारी सायंकाळी दिसून आले.
महापालिका प्रशासनाने मे महिन्यात शहरातील पावसाळी वाहिन्या, ओढे-नाल्यांमधील गाळ काढल्याचा दावा केला होता. मात्र, काढलेला गाळ पावसाळी गटारे व ओढे-नाल्यांभोवती ठेवण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे शहरातील बहुतांश रस्त्यांवर पाणी साठले होते. हा गाळ पावसाळी वाहिन्यांमध्ये गेल्याने संबंधित वाहिन्या तुंबल्या, परिणामी रस्त्यांवर पाणी साठण्याचा प्रकार घडला होता. त्याचीच पुनरावृत्ती गुरुवारी झाली. गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. अवघ्या तासाभरातच शहराच्या मध्यवर्ती भागासह पेठा, शिवाजीनगर, खडकी, दापोडी, गणेशखिंड रस्ता, औंध, बाणेर, बावधन, कोथरूड, सिंहगड रोड, नऱ्हे, कर्वेनगर, वारजे माळवाडी, धनकवडी, कात्रज, बिबवेवाडी, कोंढवा, हडपसर, येरवडा, विश्रांतवाडी, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विमाननगर, मुंढवा अशा विविध भागातील रस्त्यांना अक्षरशः ओढ्या-नाल्याचे स्वरूप पाप्त झाले होते. उपनगरांमधील बहुतांश रस्ते जलमय झाले होते.
गटारे तुंबल्यामुळे ठिकठिकाणी पाणी साठले होते, सहा वाजण्याच्या सुमारास पावसाचा जोर कमी झाला, त्यानंतरही पाण्याचा निचरा होण्यास बराच वेळ लागला. चेंबरच्या झाकणांभोवती कचरा, चिखल, गाळ साठल्यामुळे पाणी जाण्यास अडथळा येत होता. स्थानिक नागरिक, वाहतूक पोलिस व काही ठिकाणी महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी चेंबरच्या झाकणांवरील कचरा, गाळ काढून पावसाच्या पाण्याला वाट करून दिली, तर काही ठिकाणी पदपथ व दुभाजकांमधून पाणी जाण्याची व्यवस्था नसल्याने संपूर्ण रस्ते जलमय झाल्याचे चित्र होते.
दरम्यान, खासगी, सरकारी आस्थापना, कार्यालये, शाळा, महाविद्यालये सुटण्याची वेळ असल्याने नोकरदार, विद्यार्थी मोठ्या संख्येने बाहेर पडले. दुचाकीवरून जाणाऱ्या वाहनचालकांना अक्षरशः गुडघाभर पाण्यातून वाट काढत वाहन चालविण्याची वेळ आली. घरी निघालेल्या चाकरमान्यांसह विद्यार्थ्यांची देखील मोठ्या प्रमाणात गैरसोय झाल्याचे चित्र शहरात होते.
------------------
शहरात पाणीच पाणी, मात्र सीसीटीव्हीत सर्व आलबेल!
शहराच्या बहुतांश भागात गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय झाले होते. अनेक सजग नागरिकांकडून व्हाटस्अप, फेसबुकवर पाणी साठलेल्या ठिकाणचे छायाचित्र, व्हिडिओ टाकून सद्यःस्थिती दाखविली जात होती. पावसामुळे उद्भवणाऱ्या परिस्थितीवर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून लक्ष ठेवले जात होते. मात्र, मोठ्या प्रमाणात पाऊस होऊनही आपत्ती निवारण केंद्राच्या सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या शहरातील बहुतांश भागातील चौकांमध्ये कुठेही पाणी साठल्याचे, गटारे तुंबल्याचे दिसत नव्हते. जोरदार पाऊस होऊनही सर्व चौकांमधील वाहतूक सुरळीत असल्याचेही संबंधित सीसीटीव्हीमध्ये दिसत होते. विशेषतः सायंकाळी सहापर्यंत महापालिका किंवा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे पाण्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीबाबत एकही फोन आला नव्हता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.