‘जीएसटी’चे दरबदल
‘जीएसटी’चे दरबदल
ॲड. महेश पां. भागवत
जीएसटी कायदा सुरू होऊन या जुलै महिन्यात आठ वर्षे पूर्ण झाली. पंतप्रधानांनी १५ ऑगस्ट २०२५ रोजी जीएसटी कायद्यामध्ये काही बदल विशेषतः कराच्या दरांमध्ये बदल करण्याची घोषणा केली. त्याबाबत तीन सप्टेंबर रोजी जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत निर्णय होऊन अनेक वस्तू आणि सेवांच्या दरांमध्ये बदल केल्याचे पत्रकदेखील प्रकाशित झाले. त्याचबरोबर ‘‘वारंवार विचारले जाणारे प्रश्न’’ आणि त्यांची उत्तरेदेखील प्रकाशित करण्यात आली. या दरांची प्रत्यक्ष अंलबजावणी २२ सप्टेंबर २०२५ पासून होणार आहे. नवरात्राच्या प्रथम दिवशी या दरांची अंमलबजावणी सुरू होणार आहे. याबाबत काही तांत्रिक मुद्दे करदाते व्यापारी आणि उद्योजक यांच्याकडून उपस्थित केले जात आहेत. त्या मुद्द्यांबाबत चर्चा प्रस्तुत लेखामध्ये करीत आहोत.
सप्टेंबर महिन्याचे विवरणपत्र भरताना खालील गोष्टी विचारात घ्याव्या लागणार आहेत.
१. सर्व प्रथम जीएसटीआर-१ विवरणपत्र भरताना १ सप्टेंबर २०२५ ते २१ सप्टेंबर २०२५ या मुदतीची विक्री जुन्या दरानुसार आणि २२ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या मुदतीची विक्री नव्या दरानुसार विवरणपत्रामध्ये सादर करावी लागेल. त्यासाठी आपल्या अकाउंटिंग सॉफ्ट वेअरमध्ये योग्य ते बदल करणे अपेक्षित आहे.
२. तसेच जर वस्तू आणि सेवा २२ सप्टेंबरच्या आधी ग्राहकाला पुरवली असेल आणि जर त्या वस्तूचे बिल २२ सप्टेंबरनंतर ग्राहकाला दिले तर आणि त्या बिलाची रक्कम ग्राहकाकडून २२ सप्टेंबरनंतर आली असेल तर बिलाची रक्कम अदा केल्याची तारीख आणि बिलाची तारीख यापैकी जी तारीख आधी असेल त्या दिवशी वस्तू किंवा सेवेचा पुरवठा झाला असे समजण्यात येईल म्हणजेच नव्या कराच्या दराने बिल करावे लागेल.
३. जर, बिलाची रक्कम २२ सप्टेंबरच्या आधीच ग्राहकाने अदा केली असेल तर त्या वस्तू किंवा सेवेचा पुरवठा बिलाची रक्कम ज्या दिवशी अदा केली असेल तोच दिवस समजला जाईल म्हणजेच जुन्या कराच्या दराने बिल करावे लागेल.
४. तसेच जर बिलाची तारीख २२ सप्टेंबरच्या आधी असेल आणि बिलाची रक्कम २२ सप्टेंबरनंतर अदा केली असेल तर बिलाची तारीख जी असेल त्या दिवशी पुरवठा केला असे समजले जाईल म्हणजेच जुन्या कराच्या दराने बिल करावे लागेल.
५. जर वस्तू आणि सेवा पुरवठा हा २२ सप्टेंबरनंतर झालेला असेल आणि बिलाची रक्कम २२ सप्टेंबरनंतर आलेली असेल परंतु बिल २२ सप्टेंबरच्या आधी केलेले असेल तर पुरवठा २२ सप्टेंबरनंतर झाला असे समजण्यात येईल म्हणजेच नव्या दराने कर लागेल.
६. जर वस्तू आणि सेवा पुरवठा हा २२ सप्टेंबरनंतर झालेला असेल आणि बिलाची तारीख २२ सप्टेंबरच्या आधी असेल तसेच बिलाची रक्कम अदा केल्याची तारीख तारीख २२ सप्टेंबरच्या आधी असेल; तर बिलाची रक्कम अदा केल्याची तारीख आणि बिलाची तारीख यापैकी जी तारीख आधी असेल त्या दिवशी वस्तू किंवा सेवेचा पुरवठा झाला असे समजण्यात येईल म्हणजेच जुन्या कराच्या दराने बिल करावे लागेल.
७. जर वस्तू आणि सेवा पुरवठा हा २२ सप्टेंबरनंतर झालेला असेल आणि बिलाची तारीख २२ सप्टेंबरनंतर असेल तसेच बिलाची रक्कम अदा केल्याची तारीख तारीख २२ सप्टेंबरच्या आधी असेल तर बिलाची तारीख जी असेल त्या दिवशी पुरवठा झाला असे ग्राह्य धरले जाईल म्हणजेच नव्या दराने बिल करावे लागेल.
८. जर २२ सप्टेंबरनंतर वस्तू किंवा सेवेच्या कराचा दर कमी झाला असेल तर त्या वस्तू किंवा सेवेच्या खरेदीच्या स्टॉकमध्ये असलेल्या भरलेल्या कराची पूर्ण वजावट विवरणपत्र भरताना घेता येईल.
९. २२ सप्टेंबरच्या नंतर वस्तू आणि सेवेचा कर रद्द झालेला असेल तर मात्र त्या वस्तू किंवा सेवेच्या खरेदीच्या स्टॉकमध्ये असलेल्या भरलेल्या कराची पूर्ण वजावट उलटवून (Reverse) घ्यावी लागेल. सप्टेंबर महिन्याचे विवरणपत्र भरताना वरील सर्व बाबींचा विचार करणे आवश्यक आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.