बळकट लोकशाही हाच अंतर्गत सुरक्षेचा पाया
पुणे, ता. २० : ‘‘दहशतवाद, नक्षलवाद, फुटीरतावाद, अंतर्गत बंडाळी, संघटित गुन्हेगारी यांसारख्या देशांतर्गत सुरक्षेसमोरील आव्हानांवर आपण राज्यघटना आणि लोकशाहीमुळे आजवर यशस्वीपणे मात केली. मात्र, आता देशाची प्रगती होताना शत्रू राष्ट्रांकडून पुकारले जाणारे छुपे युद्ध आणि इस्लामिक मूलतत्त्ववादी दहशतवाद ही नवी आव्हाने उभी ठाकली आहेत. त्यावर मात करण्यासाठी लोकाभिमुख व भ्रष्टाचारविरहित प्रशासन तयार करणे आणि लोकशाही अधिक बळकट करणे, हेच उत्तर आहे,’’ असे प्रतिपादन राष्ट्रीय तपास यंत्रणेचे (एनआयए) महासंचालक सदानंद दाते यांनी शनिवारी केले.
‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. नानासाहेब परुळेकर यांच्या १२८व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘अंतर्गत सुरक्षा : भारतासमोरील आव्हाने आणि उपाय’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. याप्रसंगी ‘सकाळ’चे अध्यक्ष प्रतापराव पवार, ‘सकाळ’चे संपादक सम्राट फडणीस उपस्थित होते.
दाते म्हणाले, ‘‘अंतर्गत सुरक्षा या समस्यांच्या व्यूहात संघटित गुन्हेगारी, कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती, अंतर्गत बंडाळी, दहशतवाद आणि छुपे युद्ध (ग्रे वॉर), असे पाच घटक आहेत. जेव्हा एक मोठा जनसमुदाय आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरतो, तेव्हा त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी कायद्याचा वापर आणि दुसरीकडे सुव्यवस्थेचाही विचार, असा समतोल पोलिसांना साधावा लागतो. इस्लामी मूलतत्त्ववादी दहशतवादाचेही आव्हान वाढत आहे. भारतातील ०.१ टक्का लोकांना इस्लामी कट्टरवादी विचारांकडे आकर्षित करण्यासाठी पाकिस्तानची ‘आयएसआय’ ही गुप्तचर संघटना प्रयत्न करते आहे. छुपे युद्ध हेदेखील नवे आव्हान असून, यात शत्रू राष्ट्रावर सायबर हल्ला करणे, नवीन विद्युत प्रकल्प होऊ न देणे, अशा पद्धतींनी देशाच्या प्रगतीत अडथळा आणला जातो.’’
पोलिस प्रशासनाच्या सुधारणेला हवा अग्रक्रम
‘‘पोलिस आणि जनतेमधील संबंध फारसे चांगले नाहीत. जनतेचा पुरेसा पाठिंबा नाही, हे पोलिसांच्या अपुरेपणाचे कारण आहे. पोलिसांचे वेतन पूर्वीपेक्षा बरे झाले आहेत, पण तरीही भ्रष्टाचार आहे. या व्यवस्थेतील भ्रष्टाचार दूर करणे आणि ही व्यवस्था अधिकाधिक पारदर्शक व लोकाभिमुख करणे, हा आपला अग्रक्रम असायला हवा. लोकांनीदेखील लाच देणार नाही, हा निश्चय केला पाहिजे. पोलिस दलात आधुनिकता आणली पाहिजे. ती केवळ इमारत चकाचक करून येणार नाही, त्यासाठी व्यक्तिप्रतिष्ठेचे मूल्य रुजवले पाहिजे. सर्वोच्च पदावरील अधिकाऱ्यांपासून कनिष्ठ स्तरावरील कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना समान वागणूक मिळाली पाहिजे,’’ अशी आग्रही भूमिका सदानंद दाते यांनी मांडली.
भ्रष्टाचारविरहित, गुणपोषक समाज आवश्यक
‘‘आव्हानांचे स्वरूप बदलत जाणे, हे आपण प्रगतिपथावर असल्याचे लक्षण आहे. आपली लोकशाही व्यवस्था अधिक दृढ करणे, व्यक्तिप्रतिष्ठेच्या मूल्यावर आधारित व लोकाभिमुख प्रशासन निर्माण करण्यावर भर देणे, व्यापक पातळीवर भ्रष्टाचारविरहित गुणग्राहक व गुणपोषक समाजव्यवस्था निर्माण करणे, यातून समाजरक्षणाची व्यूहरचना बळकट होईल आणि येणाऱ्या प्रत्येक येणाऱ्या आव्हानावर मात करता येईल,’’ असा विश्वास सदानंद दाते यांनी व्यक्त केला.
‘हा माझा बहुमान’
‘‘नानासाहेब परुळेकर यांनी १९३२मध्ये ‘सकाळ’ची स्थापना करत एकप्रकारे क्रांतीच केली होती. आजही अशक्य वाटणारे काम त्यांनी १०० वर्षांपूर्वीच केले. त्यांचे विचार आजही दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करणारे आहेत. मी १९७७ ते १९८८ या काळात पुण्यात वर्तमानपत्र विक्रीचा व्यवसाय केला होता. त्यातून मला वाचनाची गोडी लागली. माझ्या स्टॉलवर स्वारगेट पोलिस वसाहतीतील कर्मचारी येत असतं. त्यांच्याशी झालेल्या संवादातून समाजाचे वास्तव जवळून समजले. आज नानासाहेब परुळेकर व्याख्यानासाठी मला बोलविण्यात आले, हा माझा बहुमान समजतो,’’ अशा शब्दांत सदानंद दाते यांनी भावना मांडल्या.
कायद्यानुसार काम केल्याने वाचलो...
‘‘शिवाजी तुमरेड्डी हा जहाल नक्षलवादी व त्याची पत्नी पोलिसांनी शरण आले, त्या वेळी त्यांना आम्ही जिवाची हमी दिली होती. त्या वेळी काही वरिष्ठांनी मला त्याचे एन्काउंटर करण्याची सूचना दिली होती. पण मी ती बेकायदा असल्याचे सांगत अमान्य केली. शिवाजी शरण येण्यापूर्वी एका वार्ताहराकडे त्याची ध्वनिचित्रफीत तयार असल्याचे मला काही दिवसांनी कळाले. योग्य काम केल्यामुळे माझा बचाव झाला, हा फार मोठा धडा मला यातून मिळाला. जर राज्यघटना आणि कायद्याने काम होत असेल, तर मर्दुमकी म्हणून हत्यार चालवण्यात अर्थ नाही,’’ असे सदानंद दाते यांनी सांगितले.
सदानंद दाते म्हणाले...
- काश्मीरमधील फुटीरतावादी दहशतवाद, पंजाबमध्ये डोके वर काढण्याचा प्रयत्न करणारे खलिस्तानी, ईशान्य भारतातील बंडखोर, देशाच्या मध्यवर्ती भागातील नक्षलवादी चळवळ या अंतर्गत सुरक्षेच्या आव्हानांवर आपल्या व्यवस्थेने मात केली आहे.
- १९४७ ला निर्वासितांचे लोंढे, भाषावार प्रांतरचनेनंतर झालेल्या दंगलींपासून ते २०१३ पर्यंत झालेले अनेक दहशतवादी हल्ले आपल्या यंत्रणांनी रोखले.
- गेल्या दीड वर्षापासून नक्षलवादावर नियंत्रण आणले आहे, ही आपल्या लोकशाहीची आणि राज्यघटनेची ताकद आहे.
- आपल्या देशात संघराज्य पद्धतीमुळे जिल्हा प्रशासन, राज्य सरकार आणि केंद्र सरकार असे कामाचे तीन स्तर आहेत. त्यासह इंटेलिजन्स ब्यूरो आणि अन्य गुप्तचर यंत्रणा, सीमा सुरक्षा दले, केंद्रीय सुरक्षा दले कार्यरत आहेत.
- सशक्त कायदेमंडळासह यंत्रणेतील चुकीच्या गोष्टी रोखण्यासाठी स्वायत्त न्यायसंस्था, प्रसारमाध्यमे आणि नागरिकांचा अंकुश आहे. त्यामुळे संघराज्य पद्धती हेच देशाचे बलस्थान आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.