विमान प्रवासात डाएट कोकच्या कॅनमध्ये धातूचे तुकडे
पुणे, ता. २० : गोवा ते पुणे या विमान प्रवासादरम्यान आठ सप्टेंबरला शहरातील व्यावसायिक अभिजित भोसले यांना प्रवासात दिलेल्या डाएट कोकच्या कॅनमध्ये तीक्ष्ण धातूचे तुकडे आढळले. या तुकड्यांमुळे त्यांच्या घशाला इजा झाली आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करावे लागले. मात्र, याबाबत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे तक्रार करूनही कारवाई झालेली नाही. याबाबत स्पाइस जेट’ या विमान कंपनीवर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी व्यावसायिक भोसले यांनी पत्रकार परिषदेत केली.
भोसले म्हणाले, ‘‘कोकचे काही घोट घेतल्यानंतर अचानक घशात तीव्र वेदना व श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. कोकमध्ये धातूचे तुकडे दिसत होते. विमानातील कर्मचाऱ्यांनी कॅन जबरदस्तीने ताब्यात घेऊन पुरावा नष्ट केला. सहप्रवासी महेश गुप्ता आणि राजकुमार अगरवाल यांनी मदत केली. पुण्यात उतरल्यावर मला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करावे लागले. या घटनेबाबत ‘स्पाइस जेट’, ‘कोका-कोला इंडिया’, ‘डीजीसीए’, ‘एफएसएसएआय’ व नागरी विमान वाहतूक मंत्रालयाकडे तक्रारी केल्या. तरीही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. ही घटना केवळ माझ्यापुरती मर्यादित नाही. प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षेसंबंधी धोक्याची घंटा आहे. दूषित कॅनचे फोटो, धातूचे तुकडे, उत्पादनस्थळ व बॅच नंबर सार्वजनिक करणे गरजेचे आहे.’’
गुणवत्ता, सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्य
‘‘आमच्या एका पेयासंबंधी घटना घडल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. संबंधित ग्राहकांशी आम्ही संपर्कात आहोत आणि त्यांच्यासोबत सातत्याने सहकार्य करत आहोत. वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी आम्ही सर्व संबंधित घटकांसोबत काम करत आहोत. गुणवत्ता आणि सुरक्षितता हे कोका-कोलाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. भरणी व सीलिंग प्रक्रियेदरम्यान कोणतीही परकी वस्तू पॅकेजिंगमध्ये प्रवेश करू नये यासाठी सर्व आवश्यक खबरदारी घेतली जाते. ’’ असे कोका-कोला कंपनीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.