उस्ताद शुजात हुसेन खाँ यांच्या सतारवादनाची पर्वणी
पुणे, ता. २२ : ज्येष्ठ सतारवादक उस्ताद शुजात हुसेन खाँ यांच्या नजाकतपूर्ण सतारवादनाची पर्वणी पुणेकरांना मिळणार आहे. निमित्त आहे, ‘सकाळ’तर्फे आयोजित ‘गुरुस्मरणम’ या विशेष कार्यक्रमाचे. बाणेरमधील बंटारा भवनमध्ये ४ ऑक्टोबरला सायंकाळी ६.३० वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
अभिजात भारतीय संगीताच्या स्वरक्षितीजावर अनेक कलाकारांनी आपल्या अपूर्व योगदानाने अढळस्थान निर्माण केले आहे. कठोर साधनेतून मिळवलेल्या सिद्धीचा अनुभव त्यांनी मागे ठेवलेल्या त्यांच्या ध्वनिमुद्रित स्वरशिल्पातून अनुभवयास मिळतो. अशा थोर कलाकारांचे कार्य पुढील पिढीस निश्चितच प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरत असते, हे लक्षात घेऊन दिग्गजांनी केलेल्या साधनेचा, त्यांच्या सांगीतिक वाटचालीचा, त्यांच्या सांगीतिक विचारांचा व कार्याचा अभ्यासपूर्ण मागोवा घेणे आणि त्यांच्या अनुयायांकडून त्यांची महती जाणून घेणे, हा ‘गुरुस्मरणम’ या विशेष कार्यक्रम मालिकेचा उद्देश आहे.
या मालिकेतील पहिल्या कार्यक्रमाचा प्रारंभ उस्ताद शुजात हुसेन खाँ यांच्या सादरीकरणाने होणार आहे. मुकेश जाधव आणि सपन अंजारिया हे त्यांना तबल्यावर साथसंगत करणार आहेत. ज्येष्ठ तबलावादक पं. विजय घाटे हे त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटी लि., तसेच ‘पु. ना. गाडगीळ आणि सन्स’ हे या कार्यक्रमाचे सहयोगी प्रायोजक आहेत.
‘‘कोणत्याही कलाकाराची किंबहुना प्रत्येक व्यक्तीची ओळखच तिच्या गुरुंवरून ठरते. भगवंताकडे जाण्याचा रस्ताही गुरूच दाखवतात. गुरूशिवाय मोठे या जगात काहीच नाही, अशी माझी धारणा आहे. ‘गुरुस्मरणम’ या कार्यक्रमातून मला माझ्या गुरूंचे स्मरण करून त्यांना अनोखी सांगीतिक आदरांजली वाहण्याची संधी मिळणार आहे’’, अशा भावना शुजात हुसेन खाँ यांनी व्यक्त केल्या.
कार्यक्रमाबद्दल...
कधी : ४ ऑक्टोबर
केव्हा : सायंकाळी ६.३० वाजता
कुठे : बंटारा भवन, बाणेर
तिकिटे : ‘बुक माय शो’ या संकेतस्थळावर उपलब्ध
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.