गृह सोसायट्यांसाठी विशेष अभियान
पुणे, ता. २२ : सहकारी गृहरचना संस्थांसाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या वतीने ‘मानीव अभिहस्तांतरण प्रकरणे, अभिनिर्णय पूर्व तपासणी’ हे विशेष अभियान सुरू करण्यात आले आहे. २७ ते ३० सप्टेंबर या कालवधीत हे अभियान राबविले जाणार आहे.
राज्य सरकारच्या ‘सेवा पंधरवडा’ या उपक्रमात नागरिकांना अधिक गतिमान, सकारात्मक आणि लोकाभिमुख सेवा देण्यासाठी हे अभियान आयोजित करण्यात आले आहे. त्यामध्ये सहकारी संस्थांना मानीव अभिहस्तांतरणासाठी (डीम्ड कन्व्हेन्स) आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून देणे, त्यांच्या शंकाचे निराकरण करणे, आदी गोष्टींवर भर दिला जाणार आहे, अशी माहिती सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संतोष हिंगाणे यांनी दिली. ज्या सहकारी गृहरचना संस्थांना जमीन मालक अथवा विकसक यांनी जमीन व इमारतीचे खरेदीखत करून दिलेले नाही त्यांना महाराष्ट्र मालकी हक्काच्या सदनिकांबाबत अधिनियम, १९६३ नुसार सक्षम प्राधिकारी (सहकार विभागातील उपनिबंधक) यांच्याकडून मानीव अभिहस्तांतरण करून मिळण्याचा कायदेशीर मार्ग उपलब्ध आहे. सहकारी गृहरचना संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणाच्या प्रकरणांमध्ये आवश्यक कागदपत्रांची कमतरता, अपुरी माहिती किंवा विलंबामुळे मुद्रांक शुल्क निश्चित होण्यास आणि पुढील नोंदणी प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. परिणामी संस्थांना मिळकत पत्रिकेवर नाव नोंदवणे, पुनर्विकास यांसारख्या कामास विलंब होतो. हा विलंब कमी करण्यासाठी कागदपत्रांची पूर्व तपासणी करून त्रुटी शोधणे आणि त्या दूर करणे, हा या विशेष अभियानाचा हेतू आहे, असेही हिंगाणे म्हणाले.
या अभियान मानीव अभिहस्तांतर प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे समजून घेण्यामध्ये आणि ती संकलित करण्यामध्ये लागणारा कालावधी कसा कमी करण्यात येईल, यासाठी मदत केली जाणार आहे. या अभियानामध्ये मुद्रांक शुल्काबाबत अंतिम निर्णय देण्यात येणार नाही. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील मानीव अभिहस्तांतरासाठी (डीम्ड कन्व्हेन्स) इच्छुक गृहनिर्माण संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन ही हिंगाणे यांनी केले आहे.
अभियानातील ठळक मुद्दे
- पुणे सह जिल्हा निबंधक कार्यालयात विशेष कक्ष सुरू करण्यात येणार आहे
- सहभागी संस्थांची कागदपत्रे तपासून कोणती कागदपत्रे अपूर्ण आहेत याची माहिती देऊन लेखी अहवाल दिला जाईल
- मूल्यांकन व मुद्रांक शुल्क आकारणीसंदर्भातील शंका प्रत्यक्ष निराकरण केल्या जातील
- इच्छुक गृहनिर्माण संस्थांनी २६ सप्टेंबरपूर्वी सह जिल्हा निबंधक पुणे शहर कार्यालयात येथे समक्ष किंवा jdr.punecity@gmail.com या मेलवर सहभाग नोंदवावा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.