चित्रपट जीवनाच्या सर्वांत जवळ जाणारे माध्यम

चित्रपट जीवनाच्या सर्वांत जवळ जाणारे माध्यम

Published on

पुणे, ता. २४ ः ‘‘बुद्धिवादी शिक्षण हे स्वयंकेंद्रित असल्यामुळे जगण्याविषयी संवेदना निर्माण झालेल्या नाहीत. आधुनिक बुद्धिवादी शिक्षण पद्धतीतून केवळ वाचक निर्माण झालेत, उत्तम प्रेक्षक व श्रोते नाही. सध्या बुद्धीची भाषा शिकविली जाते परंतु संवेदनांची भाषा शिकविली जात नाही,’’ अशी खंत ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांनी व्यक्त केली. ‘‘जीवनाच्या सर्वांत जवळ जाणारे आणि भावनेचे माध्यम हे चित्रपट आहे,’’ असेही ते म्हणाले.
मुंबा फिल्म फाउंडेशन आयोजित सहाव्या ‘मुंबा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल’चे उद्‍घाटन बुधवारी (ता. २४) ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे तसेच चित्रपट निर्माते उमेश कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी डॉ. आगाशे बोलत होते. ‌महोत्सवाचे आयोजक जय भोसले, महोत्सव संयोजक वीरेंद्र चित्राव, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील मराठी भाषा समन्वयक किरण गायकवाड, ‘एमआयटी’ कॉलेजच्या दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय फिल्म स्कूलचे विभाग प्रमुख डॉ. अरुण प्रकाश, ‘मराठवाडा मित्र मंडळा’च्या कॉलेज ऑफ कॉमर्सचे प्राचार्य डॉ. गणेश पठारे यावेळी उपस्थित होते. ‘आता थांबायचे नाय‌’ या मराठी चित्रपटाच्या प्रदर्शनाने फिल्म फेस्टिव्हलची सुरुवात झाली. फेस्टिव्हलच्या कॅटलॉगचे यावेळी अनावरण करण्यात आले.
डॉ. आगाशे म्हणाले, ‘‘चित्रपट हे माध्यम करमणूक आणि शिक्षण या दोन्हीसाठी वापरले गेले पाहिजे. निव्वळ मनोरंजनात्मक चित्रपटातून योग्य ते शिक्षण मिळत नसल्यामुळे प्रेक्षकांची मानसिक प्रकृती खराब झाली आहे. बुद्धिवादी शिक्षण हे स्वयंकेंद्रित असल्याने यात संवेदनक्षमता नाही त्यामुळे भावना ओळखणे, हाताळणे घडू शकत नाही. यातूनच युद्धासारखे प्रसंग उद्‍भवले आहेत. चित्रपट तयार करणेच नव्हे तर बघणेदेखील शिकावे. त्यातून स्वतःची परीक्षा करा. जिवंत माणसाचा मुडदा करून तो साठविण्याला आठवण म्हणत नाहीत, हे चित्रपटाच्या माध्यमातून शिकणे महत्त्वाचे आहे.’’
‘‘आपल्या मनात नक्की काय घडते आहे, हे आजची तरुणाई लघुपटाच्या माध्यमातून मांडत आहे. कलेच्या माध्यमातून सामाजिक विषयांवर भाष्य करणे, प्रश्न निर्माण करणे आवश्यक आहे. राज्यात चित्रपट माध्यमांविषयी अपेक्षित लोकशिक्षण झालेले दिसत नाही. चांगला प्रेक्षक घडविण्याचे कार्य अशा चित्रपट महोत्सवातून वारंवार होणे गरजेचे आहे’’, असे कुलकर्णी म्हणाले.
प्रास्ताविकात वीरेंद्र चित्राव म्हणाले, ‘‘चित्रपट, लघुपट निर्मितीतून संवेदनशीलता आणि जाणिवा जागृत झाल्यास युवा पिढीकडून या क्षेत्रात प्रभावी कार्य घडेल. मुंबा फिल्म फेस्टिव्हलच्या माध्यमातून सकस निर्मिती करणाऱ्या चित्रपट, लघुपटांना मंच उपलब्ध करून दिला जात आहे.’’ डॉ. गणेश पाठारे, किरण गायकवाड यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. महोत्सवाचे संचालक अभिषेक अवचार यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com