कात्रज डेअरीची क्षमता होणार दुप्पट अत्याधुनिक प्रकल्पाची उभारणी ः तीन लाख लिटर क्षमतेचे उद्दिष्ट
पुणे, ता. २४ ः पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या कात्रज येथील मुख्यालयावर डेअरी विस्तारीकरणाचा अत्याधुनिक प्रकल्प उभारण्याचे काम सुरू होणार आहे. या प्रकल्पामुळे संघाची दूध प्रक्रिया क्षमता दुप्पट होऊन, तीन लाख लिटरपर्यंत पोहोचणार आहे. सुमारे दीड वर्षांच्या कालावधीत हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
सुमारे पाच एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या या अत्याधुनिक डेअरीसाठी शंभर कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यापैकी सुमारे ८० टक्के निधी कर्जाच्या स्वरूपात उभारण्याची प्रक्रिया सुरू आहे. उर्वरित निधी संघाच्या स्वतःच्या स्रोतांतून भागविण्यात येणार आहे. यामध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रक्रिया यंत्रणा, साठवणूक केंद्रे, स्वच्छता व गुणवत्ता नियंत्रण सुविधा यांचा समावेश असेल. या संदर्भात संघाचे अध्यक्ष अॅड. स्वप्नील ढमढेरे म्हणाले, ‘‘राष्ट्रीय दुग्धविकास महामंडळाच्या (एनडीडीबी) अर्थसाहाय्याने आणि त्यांच्या माध्यमातून या विस्तारीकरण प्रकल्पाचा आराखडा तयार केला आहे. संचालक मंडळाच्या बैठकीत या योजनेला पूर्वीच मान्यता मिळाली असून, महापालिकेच्या बहुउद्देशीय प्रकल्पाचे आरक्षण रद्द झाल्याने या जमिनीवर आता हा प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. नव्या संचालक मंडळाच्या स्थापनेनंतर या योजनेला गती देण्यात आली असून, दीड वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा संकल्प आहे.’’
संघाचे व्यवस्थापकीय संचालक मनोज लिमये म्हणाले, ‘‘दूध संकलन, त्यावर प्रक्रिया आणि ते पिशवीबंद करण्याची प्रक्रिया पूर्ण स्वयंचलित पद्धतीने होणार आहे. येथील मनुष्यबळ इतर विभागासाठी वापरले जाणार आहे. जुनी यंत्रणा साठवणूक आणि अतिरिक्त मागणीवेळी उपयोगात आणली जाणार आहे.’’
प्रकल्पाची क्षमता वाढल्यानंतर सध्या संकलन होत असलेल्या दुधापेक्षा अधिक दुधाची गरज ही एकाच ठिकाणी एखाद्या संस्थेकडून दूध मिळू शकते. अशा काही संस्थांनी संघाशी यापूर्वी संपर्क साधला आहे. मात्र, क्षमता नसल्याने तो पर्याय निवडता येत नव्हता. अशा काही संस्थांकडून संघाला एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात दूध उपलब्ध होऊ शकते, त्यावर प्रक्रिया करून त्यातून नफा मिळविण्याचे उद्दिष्ट संघाने ठेवले आहे.
उत्पादनवाढीसह कामगारांचे
योग्य व्यवस्थापन
या प्रकल्पामुळे केवळ दूध प्रक्रिया क्षमताच वाढणार नाही, तर नवीन उपपदार्थ निर्मितीलाही चालना मिळेल. यंत्रणांच्या आधुनिकतेमुळे कमी मनुष्यबळामध्ये कामे होण्यास मदत होईल. परिणामी संघाकडे असलेल्या मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन करून इतर कामांसाठी कार्यक्षमता वाढणार आहे. संघाचे वितरण जाळे अधिक मजबूत होणार असून, शेतकरी सदस्यांना स्थिर बाजारपेठ मिळेल. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात स्थानिक पातळीवर रोजगारसंधीही निर्माण होणार असल्याचा विश्वास संघाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
‘‘सध्या कात्रज डेअरीतील यंत्रणा साठ वर्षांपूर्वी बसविण्यात आलेली आहे. नवीन तंत्रज्ञान आल्याने प्रकल्पात बदल करण्याची आवश्यकता आहे. सध्या दूध, दही, ताक, तूप आणि इतर उपपदार्थांचे एकूण संकलन दीड लाख लिटर असून नवीन प्रकल्पामुळे ते दुपटीने वाढणार आहे. पाच एकर जागेवरील या प्रकल्पासाठी शंभर कोटींचा निधी लागणार असून, ८० टक्के कर्ज मिळविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
-अॅड. स्वप्नील ढमढेरे, अध्यक्ष, पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.