फुले विद्यापीठाने सादरीकरण सुधारणे गरजेचे
पुणे, ता. २५ : ‘‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीत घसरण होण्याची अनेक कारणे आहेत. परंतु, गेल्या काही वर्षांत एका आंतरराष्ट्रीय जर्नलने फुले विद्यापीठाशी संलग्न जवळपास ५०० शोधनिबंध मागे घेतले आहेत. यापैकी सुमारे ४९५ शोधनिबंध संलग्न महाविद्यालयांमधून आले होते. याचा फटकाही विद्यापीठाला बसला आहे,’’ असे मत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी व्यक्त केले.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ यांच्या वतीने ‘एनआयआरएफ’ विषयक चर्चासत्र आयोजित केले होते. याप्रसंगी डॉ. करमळकर, माजी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. अशोक उबाळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डी. बी. पवार, प्रोग्रेसिव्ह सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, प्रा. ज्योत्स्ना एकबोटे, श्यामकांत देशमुख आदी उपस्थित होते.
डॉ. करमळकर पुढे म्हणाले की, खासगी विद्यापीठांत कायमस्वरूपी प्राध्यापक नसतात, तरीही ते पुढे आहेत. कारण ते सादरीकरणात आघाडीवर आहेत. याची दखल घेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीतील सादरीकरणात सुधारणा करणे आवश्यक आहे. याशिवाय आंतरराष्ट्रीय शिक्षकांची संख्या वाढवणे, व्यक्तिगत संशोधनाला प्रोत्साहन देणे, सुसंवाद वाढवणे, दृष्टिकोन सुधारणे, अभ्यासक्रम कालसुसंगत करणे, प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस वाढवणे यांसह ‘स्केल-स्पीड-स्कोप’ या गोष्टीवर काम केले पाहिजे.
डॉ. गजानन एकबोटे म्हणाले, ‘‘विद्यापीठाचे मानांकन चांगले ठेवणे ही सामूहिक जबाबदारी आहे. राष्ट्रीय क्रमवारीत स्थान घसरल्याने विद्यापीठाचे ‘बाजार मूल्य’ कमी होणार आहे. पर्यायाने त्याचे दूरगामी परिणाम विद्यार्थ्यांच्या प्लेसमेंट आणि प्रवेश प्रक्रियेवर होणार आहे. विद्यापीठाचे मानांकन घसरण्यास अनेक कारणांसह उदासीनता आणि अज्ञानही कारणीभूत आहे.’’
मानांकन दरवर्षीच होत असते, त्यामुळे फार चिंता करण्याची गरज नसल्याचे डॉ. उमराणी यांनी अधोरेखित केले. ते म्हणाले की, या क्रमवारीसाठी २०१६ मध्ये तीन हजार २६५ संस्था सहभागी होत्या, तर २०२५ मध्ये १४ हजार १६३ संस्था झाल्या आहेत. अध्ययन-अध्यापन, संशोधन, पब्लिकेशन, प्लेसमेंट यावर भर दिला पाहिजे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.