पुण्यातील सिग्नल होणार ‘स्मार्ट’
अनिल सावळे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. २५ : शहरातील वाढत्या वाहनसंख्येमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिस आयुक्तालयाकडून शहरातील सुमारे ५०० सिग्नल जंक्शनवर ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित ‘इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम’ (आयटीएमएस) लवकरच उभारण्यात येणार आहे. त्यामुळे पुणेकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळणार आहे.
शहरात सध्या स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू करण्यात आलेली अडॅप्टिव्ह ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम (एटीएमएस) सिग्नल यंत्रणा उपलब्ध आहे. महापालिकेकडून सुमारे १०२ कोटी रुपये खर्च करून १२५ सिग्नल्स बसविण्यात आले. परंतु वाहतूक कोंडी कमी न झाल्याने ही यंत्रणा फारशी प्रभावी ठरली नाही. त्यानंतर आता पोलिस आयुक्तालयाकडून ‘आयटीएमएस’ सिग्नल यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. याबाबतचा प्रस्ताव पोलिस आयुक्तालयाकडून राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून, पुढील काही महिन्यांत पुणेकरांना स्मार्ट वाहतूक व्यवस्थेचा अनुभव घेता येणार आहे.
अत्याधुनिक सिग्नल यंत्रणेचा वापर
‘आयटीएमएस’ सिग्नल यंत्रणा वाहनांचा वेग, वाहनांची संख्या, प्रवासाचा वेळ, ‘पीक अवर’मधील ट्रॅफिकची तीव्रता यांचा अभ्यास करून आपोआप सिग्नलचे नियोजन करते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) साहाय्याने सिग्नल सिंक्रोनायझेशन साधले जाते. त्यामुळे अनावश्यक एका चौकात लांब रांगा लागत नाहीत, तर वाहने एका मागोमाग दुसऱ्या चौकातून सहजतेने जाऊ शकतात. यामुळे शहरात ‘ग्रीन कॉरिडॉर’ तयार होऊन वाहतुकीचा वेग वाढणार आहे.
रुग्णवाहिकांसाठी सुलभता
शहरात व्हीआयपी व्यक्तीचे दौरे असतात. ‘व्हीआयपी मुव्हमेंट’मध्ये वाहतूक कोंडी होऊ नये, नागरिकांची गैरसोय टाळावी, यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. याशिवाय रुग्णांच्या अवयव प्रत्यारोपणासाठी रुग्णवाहिकेला ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याचे काम या तंत्रज्ञानाच्या मदतीने कार्यक्षमतेने करता येईल. त्यामुळे अपघातग्रस्त किंवा गंभीर रुग्णांना वेळेत वैद्यकीय मदत मिळण्यास मदत होईल.
जगातील अनेक प्रगत शहरांमध्ये ‘आयटीएमएस’ प्रणाली यशस्वी ठरली आहे. सिंगापूरमध्ये या प्रणालीमुळे पीक अवरमध्ये सुमारे ३० टक्के वाहतूक कोंडी कमी झाली. लंडन व न्यूयॉर्कसारख्या शहरांत वाहनांच्या वेगानुसार आपोआप सिग्नल बदलले जातात, त्यामुळे नागरिकांचा प्रवास वेळ कमी होतो. दुबईमध्येही स्मार्ट ‘आयटीएमएस’मुळे रुग्णवाहिकांना तत्काळ ग्रीन कॉरिडॉर उपलब्ध होतो. पुण्यातही ही व्यवस्था सुरू झाल्यास वाहतुकीच्या समस्यांवर प्रभावी ठरणार आहे.
काय फायदा होणार?
- सुमारे ५०० सिग्नल जंक्शन जोडले जाणार
- वाहनांचा वेग व संख्येनुसार सिग्नल स्वयंचलित
- ग्रीन कॉरिडॉरमुळे प्रवास वेळेत बचत
- राज्य सरकारकडे प्रस्ताव, मंजुरीनंतर कामांना वेग
पुण्यातील वाढती वाहनसंख्या लक्षात घेता पारंपरिक सिग्नल प्रणाली अपुरी पडत आहे. ‘आयटीएमएस’ प्रणालीमुळे चौकांमध्ये सिग्नल स्वयंचलितपणे वाहतुकीच्या प्रमाणानुसार नियंत्रित होतील. ग्रीन कॉरिडॉरची सुविधा व्हीआयपी मूव्हमेंट आणि रुग्णवाहिका सेवेसाठी उपयुक्त ठरेल. वाहतूक कोंडी कमी झाल्यास नागरिकांचा प्रवासाचा वेळ वाचणार आहे.
- अमितेश कुमार,
पोलिस आयुक्त, पुणे शहर.