कनिष्ठ अभियंतापदासाठी आता १६९ जागा
महापालिकेने प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास आचारसंहितेचा पुन्हा फटका बसणार

कनिष्ठ अभियंतापदासाठी आता १६९ जागा महापालिकेने प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास आचारसंहितेचा पुन्हा फटका बसणार

Published on

पुणे, ता. २७ ः पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या ११३ जागांऐवजी आता १६९ जागांची भरती केली जाणार असून, त्यासाठी अर्ज भरण्यासाठी एक ऑक्टोबरपासून मुदत सुरू होणार आहे. प्रशासनाच्या संथ कारभाराचा फटका उमेदवारांना बसला आहे. लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत ही भरती रखडल्याने तब्बल २८ हजार ७०० उमेदवार हवालदिल झाले. आता पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वाढीव जागांसाठी अर्ज मागविण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया वेळेत पार पडली नाही तर पुन्हा एकदा निवडणुकीच्या कचाट्यात हे उमेदवार अडकणार आहेत.
पुणे महापालिकेने २०२२ आणि २०२३ मध्ये एकूण ७४८ जागांची भरती केली. त्यामध्ये कनिष्ठ अभियंता, लिपिक, अग्निशामक दलाचे जवान, आरोग्य विभागातील काही महत्त्वाच्या पदांचा समावेश होता. त्यानंतर मार्च २०२४ मध्ये कनिष्ठ अभियंता स्थापत्य या पदाच्या ११३ जागांची भरती प्रक्रिया सुरू करून ‘आयबीपीएस’ या संस्थेच्या माध्यमातून अर्ज मागविण्यात आले. याच काळात राज्य सरकारने मराठा समाजासाठी शासकीय नोकर भरतीमध्ये १० टक्के आरक्षण निश्‍चित केले. त्यामुळे या आरक्षणाचा समावेश करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली. महापालिकेच्या मागासवर्ग विभागाने सुमारे सहा महिने त्यावर काम केल्यानंतर हा प्रस्ताव शासनाच्या मागासवर्ग समितीकडे पाठविण्यात आला आहे. तेथे मंजुरी मिळाल्यानंतर ज्या उमेदवारांनी खुल्या प्रवर्गातून अर्ज भरला आहे, त्यांना ‘एसईबीसी’ या आरक्षणातून अर्ज भरण्याची संधी दिली जाणार होती. पण शासनाची मान्यता मिळाल्यानंतर महापालिकेचा ‘आयबीपीएस’सोबतचा करार संपल्याने पुढची प्रक्रिया ठप्प झाली. ‘आयबीपीएस’सोबत पुन्हा करार करण्यात आल्यानंतर उमेदवारांना त्यांच्या आरक्षणात बदल करण्याची संधी देण्यात आली. यामध्ये २८ हजार ७०० उमेदवारांपैकी ४ हजार ४९३ जणांनी त्यांच्या अर्जात बदल केला आहे.

अर्ज भरण्यासाठी एक महिना मुदत
कनिष्ठ अभियंता पदासाठी ११३ ऐवजी १६९ जागांची भरती केली जाणार आहे. या वाढीव जागांसाठी नव्याने अर्ज मागविले जाणार आहेत. हे अर्ज १९ सप्टेंबरपासून मागविले जाणार होते. पण ही प्रक्रिया पूर्ण होण्यास विलंब होऊन आता १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत अर्ज मागविले जातील. त्यानंतर एकूण अर्जानुसार महाराष्ट्रातील विविध शहरांत ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. त्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर कागदपत्रांची छाननी करून गुणवत्ता यादी जाहीर करून नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. या प्रक्रियेसाठी किमान दोन महिन्यांचा कालावधी लागणार आहे.

तिसऱ्यांदा आचारसंहितेत अडकणार?
महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कनिष्ठ अभियंता पदभरतीची जाहिरात आचारसंहितेच्या पूर्वी काढलेली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या आचारसंहितेचा परिणाम होणार नाही. पण ११३ पदांची भरती ही लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकली, त्यानंतर विधानसभेची आचारसंहिता लागू झाल्याने त्या काळातही ही भरती प्रक्रिया ठप्प झाली. आता महापालिका निवडणुकीची गडबड सुरू झाली आहे. प्रभाग रचना अंतिम टप्प्यात आली असून, निवडणुकीच्या कामासाठी कर्मचारी, अधिकारी यांच्या नियुक्त्यांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे महापालिकेचे कर्मचारी व्यस्त असणार आहेत. अशा काळात दोन महिन्यांत प्रशासकीय प्रक्रिया जवळपास ठप्प होण्याची शक्यता असल्याने ही भरती तिसऱ्यांदा निवडणुकीच्या आचारसंहितेत अडकण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीत नवीन अभियंत्यांना नियुक्ती मिळू शकते.

‘‘कनिष्ठ अभियंत्यांच्या भरतीसाठी १ ऑक्टोबरपासून ऑनलाइन नोंदणी करता येईल, ही मुदत ३१ ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. त्यानंतर पुढील दोन महिन्यांत भरती प्रक्रिया पार पडेल. भरतीची जाहिरात आचारसंहितेपूर्वी काढल्याने निवडणुकीच्या काळात नियुक्तीचा अडथळा येणार नाही.’’
- विजयकुमार थोरात, उपायुक्त, सामान्य प्रशासन विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com