सार्वजनिक ठिकाणी ‘एईडी’ उपकरण बसविणार
पुणे, ता. २८ : जागतिक हृदयरोग दिनानिमित्त रुबी हॉल क्लिनिकतर्फे ‘सेव्हिंग लाइव्हस्’ मोहिमेअंतर्गत पुण्यातील सर्वात वर्दळीच्या ठिकाणी जर एखाद्याचे हृदय बंद पडले तर ते हृदय शॉक देऊन सुरू करण्यासाठी ‘ऑटोमॅटिक एक्स्टर्नल डिफिब्रिलेटर्स’ (एईडी) उपकरण बसवण्यात येत आहे, तसेच एक हजारांहून अधिक नागरिकांना हृदयविकाराचा धक्का आल्यावर जीवन वाचविणारी ‘सीपीआर’ (कार्डिओपल्मनरी रेशुसीटेशन) आणि याबाबत प्रशिक्षण दिले जाईल.
अचानक हृदय बंद पडणे हे जगभरातील मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. वेळेवर उपचार न मिळाल्यास दर मिनिटाला जीव वाचण्याचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी होते. वैद्यकीय सेवा पोहोचायला अनेक वेळा वेळ लागू शकतो. यासाठी रूबी हॉल क्लिनिकतर्फे १० मेट्रो स्टेशन व इतर जागांवर ‘एईडी’ उपकरण बसवण्यात येत आहे. या उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी रुबी हॉल क्लिनिकचे अध्यक्ष डॉ. परवेझ ग्रांट, फिजिशियन व विश्वस्त डॉ. सायमन ग्रांट, धोरण व व्यवसाय विकास विभागाच्या सरव्यवस्थापक नॅटली ग्रांट नंदा, मुख्य कार्यकारी अधिकारी बेहराम खोडाईजी, अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ. कपिल झिरपे आदी उपस्थित होते.