जनसेवा सहकारी बँकेतर्फे सभासदांना आठ टक्के लाभांश
पुणे, ता. २७ : हडपसर येथील जनसेवा सहकारी बँक लिमिटेडतर्फे बॅंकेच्या सभासदांना आठ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला आहे. बॅंकेच्या नुकत्याच झालेल्या ५३ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेण्यात आला.
याप्रसंगी बँकेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र हिरेमठ, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष पोळेकर आदी उपस्थित होते. पोळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, बँकेच्या एकूण ठेवी १९५६.७९ कोटी रुपये, तर कर्ज १०४६.६७ कोटी रुपये आहे. तसेच बँकेचा एकूण व्यवसाय ३००३.४६ कोटी रुपये आणि भांडवल पर्याप्तता २०.१८ टक्के आहे. २०२४-२५ या आर्थिक वर्षात बँकेला ११.८४ कोटी रुपयांचा नफा झाला असून, बँकेच्या मुख्य कार्यालयासह २८ शाखा कार्यरत आहेत. त्याचबरोबर वैधानिक लेखापरीक्षकांनी लेखापरीक्षणात बँकेस ‘अ’ वर्ग दिला आहे.
डॉ. हिरेमठ म्हणाले, ‘‘भारतीय रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकांना लागू केलेले सर्व निकष आम्ही पूर्ण करीत आहोत. २०२५-२६ या आर्थिक वर्षात बँकेचा एकूण व्यवसाय तीन हजार ५०० कोटी रुपयांवर नेण्याचा मानस आहे.’’ बँकेचे उपाध्यक्ष रवी तुपे यांनी सभासदांचे आभार मानले.