भीमा नदी वाचवण्यासाठी ‘यारी’ उपक्रम
पुणे, ता. ३० : महाराष्ट्राची महत्त्वाची जलवाहिनी असलेल्या भीमा नदीचे वाढते प्रदूषण, पाण्याची घटती गुणवत्ता आणि ढासळलेली जैवविविधता यामुळे निर्माण झालेल्या गंभीर संकटावर मात करण्यासाठी आता भीमा खोऱ्यातील तरुणाई मैदानात उतरली आहे. जलबिरादरी, नदी की पाठशाला, महाराष्ट्र हाउसिंग सहकारी संस्था महासंघ, गोखले इन्स्टिट्यूट आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने नदीच्या संवर्धनासाठी ‘युथ ॲक्शन फॉर रिव्हर इनिशिएटिव्ह’ (यारी) हा महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती ‘चला जाणूया नदीला’ अभियानाचे राज्यस्तरीय सदस्य डॉ. सुमंत पांडे आणि जलपुरूष डॉ. राजेंद्र सिंह यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी महाराष्ट्र हाउसिंग सहकारी संस्था महासंघाचे सुहास पटवर्धन, जलसंपदा विभागाचे माजी सचिव राजेंद्र पवार, जलबिरादरीचे अध्यक्ष नरेंद्र चुघ आणि विनोद बोधनकर आदी उपस्थित होते.
पांडे म्हणाले, ‘‘भीमा नदी राज्यातील पुणे, अहिल्यानगर, सोलापूरसह आठ जिल्ह्यांतून वाहते. मात्र, केवळ पुण्यातूनच दररोज अंदाजे ७५० एमएलडी मलनिस्सारण नदीत सोडले जाते, त्यापैकी किमान २५० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया होत नाही. यामुळे नदीच्या नैसर्गिक प्रवाहावर मोठा ताण आला असून, गेल्या २० वर्षांत माशांच्या प्रजातींमध्ये ५० टक्के घट झाली आहे. त्यामुळे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. हा उपक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशीदेखील जोडण्यात आला आहे.’’
--------------------
विद्यार्थ्यांना सर्वांगीण प्रशिक्षण
नदीची ही विदारक स्थिती बदलण्यासाठी ‘यारी’ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना ४० तासांचे सर्वांगीण प्रशिक्षण दिले जाईल. यामध्ये विद्यार्थी नदी, पाण्याची गुणवत्ता तपासणी, जलसंपदा व्यवस्थापन याचे प्रशिक्षण घेऊन प्रत्यक्ष नदीकाठी सर्वेक्षण, पाणी व माती तपासणी करतील, तसेच जिल्हा परिषद, जलसंपदा विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच महापालिकांशी समन्वय साधून प्रत्यक्ष जलव्यवस्थापन योजनांचा अभ्यास करतील. यामुळे शैक्षणिक अभ्यास समाजाशी जोडला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या ‘चला जाणू या नदीला’ आणि जलसाक्षरता केंद्रांशी जोडण्यात आला आहे. जलपुरुष डॉ. राजेंद्र सिंह हे या उपक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.