जलशुद्धीकरण केंद्रासाठी मिळेना जागा

जलशुद्धीकरण केंद्रासाठी मिळेना जागा

Published on

पुणे, ता. १ ः गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचा फटका बसलेल्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी आवश्‍यक जलशुद्धीकरण केंद्र उभारणीसाठी महापालिका प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. मात्र, या केंद्रासाठी लागणारी जागा अद्याप महापालिकेस मिळालेली नाही. महापालिकेकडून जागेचा शोध सुरू आहे. त्यामध्ये काही जागांची पाहणी महापालिकेने केली असली तरीही, जागेचा प्रश्‍न अजून सुटलेला नाही.
नरवीर तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) धायरी, नऱ्हे, नांदेड, नांदोशी, किरकटवाडी, सणसवाडी, खडकवासला या गावांत ‘जीबीएस’चे रुग्ण आढळले होते. अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे ‘जीबीएस’ आजार पसरल्याची माहिती पुढे आली होती. त्यानंतर संबंधित घटनेची राज्य सरकारसह केंद्र सरकारनेही गांभीर्याने नोंद घेतली. त्यादृष्टीने महापालिका प्रशासनाने संबंधित गावांसाठी पाणी पुरवठा योजनेचा आराखडा तयार केला होता. त्यासाठी ८९० कोटी रुपये इतका खर्च येणार होता. त्याबाबतचे पत्र महापालिकेने फेब्रुवारी महिन्यात राज्य सरकारला पाठविले होते.
दरम्यान, महापालिका प्रशासनाकडून एकीकडे निधीसाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करतानाच दुसरीकडे जलशुद्धीकरण केंद्रासाठी आवश्‍यक जागेचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली होती. त्यादृष्टीने काही जागांची पाहणी केली. मात्र, दोन टप्प्यांत होणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रासाठी मोठी जागा लागणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून पाटबंधारे विभाग व केंद्रीय जल व विद्युत संशोधन केंद्राची (सीडब्लूपीआरएस) या जागांची पाहणी केली. त्यामध्ये पाटबंधारे विभागाची जागा धरणालगत येत असल्याने या जागेचा जलशुद्धीकरण केंद्रासाठी विचार झाला नाही; तर ‘सीडब्लूपीआरएस’मधील जागा जलशुद्धीकरण केंद्रासाठी योग्य असल्याचे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या पाहणीत निदर्शनास आले. त्यानुसार, पाणी पुरवठा विभागाकडून ही जागा मिळावी, यासाठी ‘सीडब्लूपीआरएस’ व केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, अद्यापही जागेचा प्रश्‍न सुटलेला नाही.

केंद्राचे काम होणार दोन टप्प्यांत
जलशुद्धीकरण केंद्रासाठी आवश्‍यक जागा व उभारणी लागणाऱ्या निधीच्या उपलब्धतेनुसार महापालिकेने दोन टप्प्यांत जलशुद्धीकरण केंद्राचे काम करण्याचे नियोजन केले आहे. १०० एमएलडी पहिल्या, तर १०० एमएलडी दुसऱ्या टप्प्यात असे दोन टप्प्यात काम केले जाणार आहे. याबरोबरच साठवण टाक्‍या बांधणे, नवीन जलवाहिन्या टाकणे, मीटर बसविणे या स्वरूपाची कामेही होणार आहेत. पहिल्या टप्प्यात ६०६ कोटींची कामे प्रस्तावित आहेत. त्यासाठी ११ एकर जागा लागणार आहे. पाच पंपहाउस व साठवण टाक्‍या बांधल्या जाणार आहेत.

या गावांना केंद्रातून पाणी पुरवठा
धायरी, नांदोशी, किरकटवाडी, खडकवासला, सणसनगर, नांदेड, नऱ्हे, कोळेवाडी, जांभूळवाडी, भिलारवाडी, मांगडेवाडी आणि गुजर निंबाळकरवाडी या १२ गावांसाठी महापालिकेने पाणी पुरवठा योजना प्रस्तावित केली आहे.

जीबीएस आजार पसरलेल्या गावांना पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी जलशुद्धीकरण केंद्र उभारले जाणार आहे. त्यासाठी आवश्‍यक जागांचा महापालिकेकडून शोध घेतला जात आहे. मात्र, अद्याप जागेचा प्रश्‍न सुटलेला नाही.
- नंदकिशोर जगताप, प्रमुख पाणी पुरवठा विभाग, पुणे महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com