पुणे
खासगीकरणाविरोधात वीज कर्मचाऱ्यांचे आंदोलन
पुणे, ता. १ : राज्यातील ८६ हजार वीज कर्मचारी, अभियंते, अधिकारी व ४२ हजार कंत्राटी कामगार वीज कंपन्यांच्या खासगीकरणाच्या विरोधात ९ ऑक्टोबरला महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी, अभियंता, अधिकारी कृती समिती संप करणार आहे. दरम्यान बुधवारी समितीने रास्ता पेठ कार्यालयासमोर आंदोलन केले.
सब ऑर्डिनेट इंजिनिअर्स असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास भोसले, ईश्वर वाबळे, दिलीप कोरडे, तुकाराम बिंबळे, प्रशांत माळवदे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. महानिर्मिती, महापारेषण व महावितरण या वीज कंपन्यांत सुरु असलेले खासगीकरण, महावितरणच्या नफ्याच्या क्षेत्रात टोरांटो, अदानी व इतर खासगी भांडवलदारांना समांतर वीज वितरणाचा परवाना, एकतर्फी पुनर्रचना लागू करण्याविरोधात हा संप पुकारणार असल्याचे समितीने सांगितले.