विद्यापीठ तयार करणार सहअभ्यासक्रम
पुणे, ता. १ : ‘‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबविण्यात येणारे सहअभ्यासक्रम (को-करिक्युलर्स कोर्स) तयार करण्यात येतील. लवकरच ते विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येतील,’’ अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेत देण्यात आली. तसेच, दोन क्रेडिटसाठी असणाऱ्या या अंतर्गत मूल्यमापन अभ्यासक्रमासाठी या सत्रात पुरेसा वेळ मिळाला नसेल, तर संबंधित महाविद्यालयांनी या अभ्यासक्रमांचे गुणांकन पुढील सत्रात करावे, असेही विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठाच्या अधिसभेच्या दुसऱ्या दिवशी प्रश्नोत्तरांदरम्यान डॉ. काळकर यांनी ही माहिती दिली. सदस्य डॉ. रमेश गायकवाड यांनी ‘सहअभ्यासक्रमाअंतर्गत किती विषयांचा अभ्यासक्रम तज्ज्ञांकडून तयार करून घेतला?’ असा प्रश्न विचारला. त्याला व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. नितीन घोरपडे यांनी दिलेल्या उत्तरात विद्यापीठाने स्वयम प्रणालीतून हे अभ्यासक्रम घेतल्याची माहिती समोर आली. राज्य सरकारने स्थापन केलेल्या सुकाणू समितीच्या शिफारशींनुसार पदवी आणि पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम आराखडा, श्रेयांक आराखड्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचनांची २०२३-२४ पासून अंमलबजावणी होत आहे. विविध अभ्यासक्रम तयार करण्याची मुभा दिल्याने विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेंतर्गत २३ सहअभ्यासक्रम महाविद्यालयांना निवडीचे आणि राबविण्याचे स्वातंत्र्य दिल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.
दरम्यान, विद्यापीठात कोणतेही धोरण निश्चित न करता सहअभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. याबाबत अधिसभा सदस्य डॉ. गायकवाड, कृष्णा भंडलकर यांनी ताशेरे ओढल्यानंतर विद्यापीठाला जाग आली. त्यानंतर, ‘या सहअभ्यासक्रमांबाबत मार्गदर्शक सूचना तयार करण्यात येतील. त्यानुसार सहअभ्यासक्रम निश्चित करण्यात येईल,’ असे विद्यापीठाने जाहीर केले.
प्रश्नोत्तरावर चर्चा झाल्यानंतर विद्यापीठाचा २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा लेखा परीक्षण आणि अनुपालन अहवाल डॉ. घोरपडे यांनी सादर केला. यात विद्यापीठाला नफा दाखविला असला, तरी प्रत्यक्षात तोटा झाल्याचे सत्य स्वीकारावे, असे अधिसभा सदस्य विनायक आंबेकर यांनी सभागृहात सांगितले.
२५ कोटी रुपये येणे
संलग्न महाविद्यालयांकडून विद्यापीठाला तब्बल २५ कोटी रुपयांची रक्कम येणे असल्याची बाब लेखा परीक्षण आणि अनुपालन अहवालातून समोर आली. त्यावर, ‘महाविद्यालयांकडे प्रलंबित असणाऱ्या रकमांची वसुली करण्यात यावी,’ अशी मागणी सदस्य अद्वैत बंबोली आणि जयंत काकतकर यांनी केली.
डेक्कन जिमखान्यासमवेत करार
‘‘विद्यापीठातील स्पोर्ट्स ॲकॅडमी’बाबत डेक्कन जिमखान्यासमवेत करार केला आहे. त्यानुसार डेक्कन जिमखान्यातील काही सदस्यांना विद्यापीठातील क्रीडा संकुल वापरण्याची मुभा मिळेल. या सदस्यांची सदस्यत्व शुल्काची रक्कम विद्यापीठाला मिळेल. तसेच जिमखान्याचे प्रतिष्ठित क्रीडा प्रशिक्षक विद्यापीठातील खेळाडूंना मार्गदर्शन करतील. ही स्पोर्ट्स ॲकॅडमी जानेवारीपासून सुरू होईल,’’ असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी स्पष्ट केले. सदस्य अद्वैत बंबोली यांनी मांडलेल्या प्रस्तावाला उत्तर देताना गोसावी यांनी ही माहिती दिली.