नाट्य कलाकारांनी शब्दांचे पूजन करावे : अतुल पेठे
पुणे, ता. १ : ‘दसऱ्याच्या दिवशी नाट्य कलाकारांनी शस्त्रांचे नाही तर शब्दांचे पूजन करावे. कलाकाराने जे दिसते, किंवा जे बोलले जाते त्याकडे लक्ष न देता जे दिसत नाही, जे बोलले जात नाही त्यावर लक्ष केंद्रित करावे, त्या गोष्टी समाजात रुजवाव्यात आणि लोकांसमोर आणाव्यात. तेव्हाच कुठल्याही परिस्थितीकडे बघण्याचा, तिला हाताळण्याचा दृष्टिकोन बदलतो,’ असे मत अभिनेते, दिग्दर्शक अतुल पेठे यांनी बुधवारी व्यक्त केले.
भरत नाट्य मंदिरातर्फे आयोजित ‘भरत नाट्य एकांकिका करंडक’ स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रथम क्रमांकाचे सांघिक पारितोषिक गणेशखिंड येथील मॉडर्न महाविद्यालयाच्या ‘वामन आख्यान’ या एकांकिकेला मिळाले. रेवन इन्स्टिट्यूटच्या ‘पेडल टू द मेडल’ या एकांकिकेला द्वितीय क्रमांकाचे आणि पीव्हीजी अभियांत्रिकी तंत्रज्ञान व्यवस्थापन महाविद्यालयाच्या ‘कोयता’ या एकांकिकेला तिसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक प्रदान करण्यात आले.
याप्रसंगी सीए विजयकांत कुलकर्णी, भरत नाट्य मंदिर संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग मुखडे, संस्थेच्या उपाध्यक्ष भाग्यश्री देसाई, संस्थेचे कार्याध्यक्ष अभय जबडे आदी उपस्थित होते. यंदाचे भरत नाट्य करंडक स्पर्धेचे १९ वे वर्ष असून, यावेळी संस्थेतर्फे शहरातील लहान मुलांसाठी कार्यरत असलेल्या सामाजिक संस्थेला २५ हजार रुपयांची मदत करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रचिती सुरू यांनी केले.
फोटो - PPRTT25B16237