विद्यापीठ मुद्रणालयातून होणार पुस्तकाची छपाई
पुणे, ता. १ : ‘‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुद्रणालयाकडे केवळ मालमत्ता म्हणून न त्याकडे सकारात्मकदृष्टीने पाहायला हवे. मुद्रणालयातून आता ‘क्वांटम कम्प्युटिंग’चे पहिले मराठी पुस्तक छापले जाणार आहे. या पुस्तकाचे प्रकाशक विद्यापीठ असणार आहे,’’ असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील निवृत्त प्राध्यापक डॉ. प्रमोद जोग यांचे हे मूळ इंग्रजी पुस्तक असून ते विद्यापीठाच्या मुद्रणालयातर्फे मराठीत आणले जाणार आहे. विद्यापीठाच्या अधिसभेत लेखा परीक्षण आणि अनुपालन अहवालावरील चर्चेदरम्यान डॉ. गोसावी यांनी ही माहिती दिली. ‘विद्यापीठातील मुद्रणालय बंद करण्यात येऊ नये. हे मुद्रणालय देखील जुने आहे. आता छपाई क्षेत्रातील नवे बदल स्वीकारून अद्ययावत तंत्रज्ञान मुद्रणालयात आणावे,’ असे सदस्य राहुल पाखरे यांनी सुचविले. तर, ‘छपाई क्षेत्रातील वाढती मागणी लक्षात घेता, विद्यापीठाने कलर प्रिंटिंगचे नवे तंत्रज्ञान स्वीकारावे,’ असे अद्वैत बंबोली यांनी सांगितले. त्यावर डॉ. गोसावी म्हणाले, ‘‘मुद्रणालयातून काही पुस्तकांची छपाई आणि प्रकाशित करून ती विक्रीसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होत आहे.’’