अकरावीच्या प्रवेशासाठी सोमवारपर्यंत संधी
पुणे, ता. ३ : इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना शनिवार (ता. ४) ते सोमवार (ता. ६) दरम्यान शेवटची संधी मिळणार आहे. या कालावधीत प्रवेशास इच्छुक विद्यार्थ्यांना नवीन नोंदणी, प्राधान्यक्रम भरण्याची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.
संपूर्ण राज्यात यंदा इयत्ता अकरावीची प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात आली. दरम्यान, विधानसभा अध्यक्ष आणि शालेय शिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत ३० सप्टेंबरला बैठक झाली. या बैठकीत दिलेल्या आदेशानुसार, राज्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीचा विचार करून विद्यार्थ्यांसाठी अकरावीच्या प्रवेशाची शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
त्यानुसार या फेरीत अर्ज भरताना विकल्प भरण्याची आणि नाव नोंदणीची सुविधा अंतिमतः देण्यात येईल. फेरीत विकल्प भरलेल्या प्राधान्यक्रमानुसार कनिष्ठ महाविद्यालय न मिळाल्यास केवळ अशा विद्यार्थ्यांना पुनःश्च रिक्त जागा दर्शवून रिक्त असलेल्या जागा विचारात घेऊन विकल्पात बदल करण्याची सुविधा दिली जाणार आहे. या बदल केलेल्या विकल्पानुसार कनिष्ठ महाविद्यालय गुणानुक्रमे देण्यात येईल. विकल्प न नोंदविलेल्या विद्यार्थ्यांना त्या स्तरावर गुणानुक्रमे महाविद्यालयाची अलॉटमेंट करण्यात येणार नाही. तद्नंतरही गुणानुक्रमे महाविद्यालय न मिळाल्यास अशा विद्यार्थ्यांना पुनःश्च विकल्प नोंदविण्याची सुविधा दिली जाणार आहे.
विद्यार्थ्यांना मिळालेल्या महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करण्यासाठीचे वेळापत्रक मंगळवारी (ता. ७) जाहीर करण्यात येईल, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे.
महत्त्वाचे
प्रवेशासाठी नवीन विद्यार्थी नोंदणी, राज्य मंडळाच्या पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण (एटीकेटी) विद्यार्थ्यांसाठी नवीन नोंदणी, अर्जाचा भाग एकमध्ये दुरुस्ती करणे, महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम देणे : ४ ते ६ ऑक्टोबर
दृष्टिक्षेपात
कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या : ९,५५०
नाव नोंदणी केलेले विद्यार्थी : १४,८८,५६९
‘कॅप’अंतर्गत प्रवेश घेतलेले विद्यार्थी : ११,७२,९९७
‘कोटा’अंतर्गत प्रवेश घेतलेले विद्यार्थी : १,६९,४४१
प्रवेश घेतलेले एकूण विद्यार्थी : १३,४२,४३८