शमा भाटे लेख

शमा भाटे लेख

Published on

प्रयोगशील, विचारवंत कलाकार
आदर म्हणजे प्रसिद्धी, लोकप्रियता, प्रशंसा यापलीकडे असणारी गोष्ट. आदर मिळवला’ जात नाही, तो काळाची अग्निपरीक्षा देऊनच ‘कमावला’ जातो. विदुषी शमाताई भाटे म्हणजे कथकमधील अत्यंत आदरपूर्वक घेतले जाणारे नाव. हा आदर गेल्या सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी गहन अभ्यास, अपार कष्ट, अपरिमित त्याग, आणि सश्रद्ध साधनेने कमावलेला आहे. अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त त्यांच्या प्रवासाचा लेखाजोखा...
- पं. सुरेश तळवलकर
---
शमाताईंचा आणि माझा परिचय १९७०-७१ पासूनचा. त्यामुळे, त्यांचा, एक गुणी कलाकार, ते कथक नृत्यामध्ये आपली स्वतंत्र मोहोर उमटवणाऱ्या एक विचारवंत, प्रयोगशील, खऱ्या अर्थाने मर्मज्ञ अशा गुरू, या प्रवासाचा मी जवळचा साक्षीदार आहे. आजपर्यंत कायम त्या नवनवीन प्रयोग करत आलेल्या आहेत. त्या नवतेमध्ये परंपरेची मूल्ये मात्र कायम असतात. त्यांच्या प्रत्येक प्रयोगामागे अनुभवसिद्ध, सखोल विचार असतो. आपल्या सांस्कृतिक आणि कलात्मक मूल्यांबाबत तडजोड न करण्याचा आग्रहही. भारतीय संगीतातील तंतुवाद्य, ख्याल, उपशास्त्रीय, अशा विविध प्रकारांचा उपयोग, शमाताई कथकच्या माध्यमातून, अत्यंत उच्च दर्जा अबाधित ठेऊन करून घेतात. आणि याच मानकांसाठी शमाताईंचे नाव अतिशय आदराने घेतले जाते.
संगीताच्या प्रत्येक शैलीचे मर्म जाणून व्यक्त होणारी त्यांची कला ही नित्यनूतन, चिरतरुण, अद्ययावत आणि तरीही भारतीय राग-ताल तत्त्वांना सशक्त आणि सौंदर्यपूर्ण दृक अभिव्यक्ती प्रदान करणारी ठरते. त्यांच्या नृत्याविष्कारांतून बंदिशींमधील ताल-अंगांची अभिव्यक्ती, वर्णांची जरब किंवा हलकेपणा, नादाची स्थिरता किंवा प्रवाह हे सर्व विविध ढंगांनी साकार होतात. त्यांच्या गुरू प्रख्यात कथक कलाकार विदुषी रोहिणी भाटे यांच्याप्रमाणेच शमाताईंचीही साहित्य, काव्य, नाट्य आणि अभिनयाची जाण अफाट आहे. या सर्वांचा समतोल त्यांच्या सादरीकरणांमधून पाहायला मिळतो.
शमाताईंच्या व्यक्तिमत्वाचा एक अत्यंत महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांची विचक्षणता. कथक नृत्यातील तंत्रशुद्धता, तंत्राचा पक्केपणा, परंपरेची मूल्ये, त्या मूल्यांमागचा शास्त्रात्मक विचार, आणि त्यातून उत्पन्न होणारी अभिजात कला, या सगळ्यांवर त्या अतिशय अभ्यासपूर्ण, चिकित्सक, मार्मिक लेखन आणि भाष्य करतात. त्यांचे अजून एक मोठे योगदान म्हणजे ‘नादरूप’! अक्षरशः जगभर पसरलेला नादरूपाचा शिष्यवर्ग शमाताईंच्या संस्कारांचे आणि मूल्यांचे पाथेय घेऊनच मार्गक्रमण करत आहे आणि त्यांचा विचार जगभर पोहोचवत आहे. या संस्थेच्या माध्यमातून केवळ कथकच नाही, तर सर्वच संगीतप्रकारांचे
अत्यंत दर्जेदार कार्यक्रम, व्याख्याने, कार्यशाळा यांमार्फत बुजुर्गांचे विचार नवीन कलाकारांपर्यंत पोहोचवण्याचे फार मोठे कार्य शमाताईंनी केलेले आहे.
काळाची कसोटी कोणत्याही कार्यक्षेत्रात सर्वोच्च मानली जाते. विदुषी शमा भाटे यांची जवळपास सहा दशकांची कारकीर्द मुळातच त्यांची विद्या आणि कला, काळाच्या कसोटीवर खऱ्या अर्थाने उतरल्याचे द्योतक आहे. आणि पुन्हा ती कला अतिशय प्रवाही, काळानुरूप सुसंगत आणि समर्पक राहिली आहे. आज शमाताईंचा अमृतमहोत्सवी वाढदिवस साजरा होत आहे. त्या निमित्ताने मी त्यांना उदंड आयुरारोग्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांच्या कामातून अभिजात भारतीय संगीत अजून जास्त उन्नत आणि समृद्ध होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
---
(लेखक प्रसिद्ध तबलावादक, गुरू आहेत.)
(शब्दांकनः आशुतोष थत्ते)
----
छायाचित्र - 57165

Marathi News Esakal
www.esakal.com