संबळ वादन, शंखनादात आदिशक्तीचा जागर
पुणे, ता. ५ : संबळाचा खणखणीत आवाज अन् दमदार आवाजात घुमलेला देवीचा गोंधळ...शंखनादाने दुमदुमलेला आसमंत अन् भक्तीमय वातावरणात झालेले श्री सूक्त पठण...हे चित्र होते, ‘जागर आदिशक्तीचा’ या कार्यक्रमाचे.
नवरात्रानिमित्त स्त्रीशक्तीचा, गुणांचा, कलांचा, समूह शक्तीचा जागर व्हावा, तसेच समाजात कला आणि सांस्कृतिक मूल्ये रुजावीत, या उद्देशाने ‘तनिष्का व्यासपीठा’च्या वतीने हा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी ‘सकाळ’च्या कम्युनिटी डेव्हलपमेंटचे सरव्यवस्थापक प्रदीप वेदपाठक, जोगेश्वरी सिल्क अँड सारीजचे संचालक निखिल पासकंठी, महिला संबळवादक गौरी वनारसे, श्रीमंत केसरी प्रतिष्ठानची संस्थापक उमेश गडे, कोरिओग्राफर हरिसिंग राजपुरोहित यांच्यासह पुणे आणि पिंपरी परिसरातील तनिष्का विभाग प्रमुख, गटप्रमुख, सदस्या आणि इतर महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
कोंढव्यातील गुरुदत्त महिला भजनी मंडळाने श्री सूक्त पठण करत कार्यक्रमाची सुरवात केली. वनारसे यांनी देवीचा गोंधळ सादर करत खणखणीत आवाजात संबळवादन करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी गडे यांनी शंखनादाच्या विविध प्रकारांची माहिती देत प्रतिष्ठानच्या कलाकारांसह शंखनादाची विविध प्रात्यक्षिकेही सादर केली. राजपुरोहित यांनी पारंपारिक वेशात दांडियाचे प्रात्यक्षिक दाखवत उपस्थित महिलांना गाण्यांवर ताल धरायला लावला. कार्यक्रमात हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेणाऱ्या शिवाजी पासलकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी जोगेश्वरी सिल्क अँड सारीजला सहकार्य करता आले याचे समाधान व्यक्त करत, महिलांना साडीच्या विणकामाचे प्रशिक्षण देण्याचे पासकंठी यांनी यावेळी जाहीर केले. कार्यक्रमाचे संयोजन तनिष्का जिल्हा प्रमुख ऋतुजा बालवडकर, रमेश मोरे, विभाग समन्वयक जागृती कुलकर्णी, मोहिनी मोहिते, प्रयागा होगे, मीरा तुपेरे, मानसी हिरेकोडी, सारिका तुळवे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वेदपाठक यांनी केले.
स्पर्धा उत्साहात
कार्यक्रमात ‘देवीचा जागरा’ची स्पर्धा आयोजित केली होती. याप्रसंगी शहर आणि परिसरातून आलेल्या भजनी मंडळांनी देवीची गाणी, गोंधळ सादर केला. यात नवदुर्गा भजनी मंडळाने प्रथम, अंबिका भजनी मंडळ द्वितीय तर कुलस्वामिनी भजनी मंडळाने तृतीय क्रमांक पटकविला. स्वानंदी महिला भजनी मंडळ आणि मिलिंदनगर भजनी मंडळाला उत्तेजनार्थ पारितोषिकाने गौरविण्यात आले. या स्पर्धेचे परीक्षण गौरी वनारसे आणि पल्लवी चाकणकर यांनी केले.