कोठे तक्रारींची दखल तर कोठे राजकीय सोय अंतिम प्रभाग रचना जाहीर ः इच्छुकांच्या नजरा आरक्षणाच्या सोडतीकडे
पुणे, ता. ४ ः पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना जाहीर झाली आहे. प्रारूप प्रभाग रचनेत काही ठिकाणी नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्यात आली आहे. तर काही ठिकाणी राजकीय सोय बघून प्रभागांमध्ये बदल करण्यात आले आहेत. ही प्रभाग रचना अंतिम झाल्याने इच्छुक उमेदवारांच्या नजरा आता आरक्षणाच्या सोडतीकडे लागल्या आहेत.
पुणे महापालिकेच्या निवडणुका या वेळेवर पार न पडल्याने मार्च २०२२ पासून प्रशासक राजवट सुरु आहे. गेल्या सव्वा तीन वर्षापासून निवडणुका न झाल्याने अखेर यात सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून चार महिन्यात निवडणुका घेण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार पुणे महापालिकेची प्रारूप प्रभाग रचना करण्याचे काम प्रशासनाने सुरु केले. राज्य निवडणूक आयोगाने २२ ऑगस्ट रोजी प्रारूप प्रभाग रचना जाहीर केली होती. ही प्रभाग रचना करताना समाविष्ट गावे अनेक प्रभागांना जोडले. त्यामुळे उपनगरांमधील प्रभाग मोठे तर मध्यवर्ती भागातील प्रभाग लहान झाले आहेत. अनेक ठिकाणी नैसर्गिक हद्दी ओलांडून प्रभाग तयार केले आहेत. त्यामुळे नागरिकांनी हरकती सूचनांचा पाऊस पाडला. प्रशासनाकडे ५ हजार ९२२ हरकती सूचना नोंदविल्या गेल्या. त्यावर राज्य शासनाकडून प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यांमार्फत दोन दिवस सुनावणी झाली. त्यानंतर प्रभाग रचनेतील बदलांसह त्याचा अहवाल राज्य शासनास सादर झाला. त्यास निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी (ता. ३) मान्यता दिल्यानंतर आज (ता. ४) अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.
या प्रभागांच्या हद्दी बदलल्या
प्रारूप प्रभाग रचनेवर ५ हजार ९२२ हरकती सूचना आल्या होत्या. यातील १ हजार ३२९ हरकती पूर्ण मान्य करण्यात आल्या असून, ६९ हरकतीं अंशतः मान्य करून बदल केले आहेत. तर ४ हजार ५२४ हरकती नामंजूर करण्यात आल्या आहेत. हरकती सूचनेनंतर प्रभाग क्रमांक १, ४, १४, १५, १७, १८, २०, २४, २७, ३४, ३८, ३९ येथील हद्दीमध्ये बदल झाले आहेत. मध्यवर्ती भागापेक्षा उपनगरांमध्ये बदल जास्त झाले आहेत.
थिटे वस्तीला मिळाला न्याय
प्रारूप प्रभाग रचनेत प्रभाग क्रमांक १५ मांजरी बुद्रूक- केशवनगर- साडेसतरा नळीमधील या प्रभागाला खराडी येथील थिटे वस्तीचा भाग जोडण्यात आला होता. नदी ओलांडून नागरिकांना मांजरी, केशवनगर भागाला थिटे वस्ती जोडल्याने या भागातील नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष होता. हा प्रभाग भौगोलिकदृष्ट्या व व्यावहारिक दृष्ट्या सोयीचा नसल्याचे लक्षात आल्यानंतर थिटे वस्तीचा भाग प्रभाग क्रमांक १५ मधून काढून तो प्रभाग क्रमांक ४ खराडी- वाघोलीला जोडण्यात आला आहे. त्यामुळे सुमारे ६ हजार ५०० नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सुनावणीमध्ये नागरिकांना आक्रमक भूमिका मांडली होती. त्यास न्याय मिळाला आहे.
पाचच्या प्रभागात मोठे फेरबदल
प्रभाग क्रमांक ३८ कात्रज- आंबेगाव या प्रभागात मोठ्या प्रभागात बदल झाला. या प्रभागाचे नाव बदलून बालाजीनगर-कात्रज-आंबेगाव असे नवे नाव निश्चित केले आहे. हा प्रभाग पाच सदस्याचा असताना त्याला आता आणखी नवीन भाग जोडण्यात आला आहे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक २० बिबवेवाडी- महेश सोसायटी या प्रभागातील केके मार्केट येथील पुण्याई नगरचा भाग प्रभाग क्रमांक ३८ ला जोडला आहे. प्रभाग क्रमांक ३४ नऱ्हे-वडगाव बुद्रुकचा काही भाग हा प्रभाग क्रमांक ३८ ला जोडला आहे. त्याच प्रमाणे कोळेवाडी ,जांभूळवाडी हा भाग देखील या प्रभागाला जोडला गेला आहे. तर प्रभाग क्रमांक ३८ मधील सुखसागरनगरचा भाग काढून तो प्रभाग क्रमांक ३९ अप्परसुपर - इंदिरानगरला जोडण्यात आला आहे.
कोरेगाव पार्क, मुंढवा, रामटेकडी येथे बदल
निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अंतिम प्रभागरचनेमध्ये प्रभाग
क्रमांक १८ वानवडी- साळुंके विहार या प्रभागातील शिंदे वस्तीचा भाग प्रभाग क्रमांक १४ कोरेगाव पार्क-घोरपडी- मुंढवा या भागाला जोडला आहे. प्रारूप रचनेमध्ये शिंदे वस्तीच्या रस्त्याने विभाजन झाले होते, हा भाग एकत्र करण्यात आला आहे. प्रभाग क्रमांक १४ कोरेगाव पार्क-घोरपडी- मुंढवा येथील मगरपट्टा सिटी रस्त्याच्या समोरील भाग हा प्रभाग क्रमांक १७ रामटेकडी- माळवाडी- वैदुवाडी याला जोडण्यात आला आहे.
आठ प्रभागांची नावे बदलली
प्रभाग क्रमांक - बदललेले नाव --- जुने नाव
१ - कळस-धानोरी-लोहगाव उर्वरित ---कळस-धानोरी
१४ - कोरेगाव पार्क-घोरपडी- मुंढवा ---कोरेगाव पार्क-मुंढवा
१५ - मांजरी बुद्रूक-केशवनगर-साडेसतरा नळी ---मांजरी बुद्रूक- साडेसतरा नळी
१७ - रामटेकडी-माळवाडी-वैदुवाडी ---रामटेकडी- माळवाडी
२० -शंकर महाराज मठ-बिबवेवाडी ---बिबवेवाडी-महेश सोसायटी
२४ - कसबा गणपती-कमला नेहरू हॉस्पिटल - केईएम रुग्णालय ---कमला नेहरू रुग्णालय- रास्ता पेठ
२६ - घोरपडे पेठ-गुरुवार पेठ-समताभूमी --- गुरुवार पेठ-घोरपडे पेठ
३८ - बालाजी नगर-आंबेगाव-कात्रज --- आंबेगाव-कात्रज
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.