‘वॉकेथॉन’ने अनुभवला सळसळता उत्साह
पुणे, ता. ४ : सकाळच्या गुलाबी थंडीत नृत्यावर थिरकणारे, उत्साहाने ‘वॉक’ करण्यासाठी सराव करणारे, चालताना चेहऱ्यावरचा आनंद आणि सळसळता उत्साह... सेल्फी आणि फोटोंसाठी ‘चिअर्स’ करत जल्लोष करणारे ज्येष्ठ...आणि पाच व तीन किलोमीटर चालण्याचा टप्पा पूर्ण केल्यानंतर तरुणाईलाही लाजवेल असा जल्लोष... हे विलोभनीय आणि ऊर्जा देणारे चित्र बघण्यास मिळाले ‘वॉक फॉर सुहाना स्वास्थ्यम्’ या ‘वॉकेथॉन’च्या निमित्ताने. निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी आयोजित या उपक्रमात पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन, ‘वय फक्त एक आकडा असतो’ हे सिद्ध केले.
‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने आणि ‘जॉय-एन-क्रू व्हेकेशन्स’ प्रस्तुत आणि पॉवर्ड बाय विश्वकर्मा विद्यापीठ ‘वॉक फॉर सुहाना स्वास्थ्यम्’ या ‘वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमासाठी विजय सेल्स, आर्यन वर्ल्ड स्कूल (लॉजिस्टिक) व कॅप्चर्ड (फोटो टेक) यांचे सहकार्य लाभले. ‘वॉकेथॉन’ ‘सकाळ’ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम्’ उपक्रमाचाच एक भाग आहे. या उपक्रमात ज्येष्ठ नागरिकांच्या ‘महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ’ (फेस्कॉम), ‘मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघ’ (अॅस्कॉप), ‘जनसेवा फाउंडेशन’, ‘नवचैतन्य हास्ययोग परिवार’, ‘लोकमान्य हास्ययोग संघ’, ‘महा-एनजीओ फेडरेशन’ व ‘योग-आनंद’ अशा विविध ज्येष्ठांसाठी काम करणाऱ्या संस्थांचे सदस्य सहभागी झाले होते.
या वेळी जॉय-एन-क्रू व्हेकेशन्सच्या संचालिका प्रग्या आदिराज, आर्यन वर्ल्ड स्कूलचे मॅनेजिंग डायरेक्टर मिलिंद लडगे, सुहाना मसालेचे आनंद माने, ‘सकाळ माध्यम समूहा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, नवीन उपक्रम प्रमुख हेमंत वंदेकर, पुणे युनिट हेड सिद्धार्थ माळवदकर, ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाची दिग्दर्शिका मृण्मयी देशपांडे, अभिनेता राहुल पेठे, पुष्कराज चिरपुटकर, करण परब, गायिका सावनी रवींद्र, अभिनेत्री आणि मॉडेल्स अक्षता उकिरडे, हर्षिता ठाकूर, सारा मोतीवाला, राजलक्ष्मी जाधव, रिया जोशी आणि झेबा शेख यांच्यासह फेसकॉमचे रत्नाकर मानकर, ॲस्कॉपचे दिलीप पवार, जनसेवा फाउंडेशनचे मुकुंद उजळंबकर, नवचैतन्य हास्ययोग परिवारचे मकरंद टिल्लू, लोकमान्य हास्ययोग संघाचे डॉ. प्रसाद आंबेकर, महाएनजीओ फेडरेशनचे मनोहर शिंदे, योग-आनंदचे रवींद्र गांधी, या सहयोगी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
सकाळी सहा वाजल्यापासूनच ज्येष्ठांची कार्यक्रमस्थळी गर्दी होण्यास सुरुवात झाली आणि बघता बघता मंचासमोरील संपूर्ण मैदान उत्साही नागरिकांनी फुलून गेले. विद्याधर कलावंतांनी झुंबा सादर केला. पहिल्यांदाच सहभागी झालेल्या ज्येष्ठांनी केलेल्या झुंबा नृत्याने वातावरणात एक वेगळेच चैतन्य निर्माण झाले. यात ‘मनाचे श्लोक’ या चित्रपटाचे कलाकारही सहभागी झाले आणि त्यांनी ज्येष्ठांना आपल्यासोबत ठेका धरायला लावला. त्यानंतर मकरंद टिल्लू यांनी हास्ययोगाच्या माध्यमातून उपस्थितांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. उपक्रमाचे उद्घाटन ‘सकाळ’चे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, प्रायोजक आणि मान्यवर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर प्रथम पाच किलोमीटरसाठीच्या ज्येष्ठांना ‘फ्लॅग ऑफ’ दिल्यानंतर सर्वजण डीपी रस्त्यावर चालण्यास मार्गस्थ झाले, त्यानंतर तीन किलोमीटरसाठीच्या ज्येष्ठांनी सहभाग घेतला. चालताना एकमेकांना प्रोत्साहन देत, टाळ्या वाजवत, त्यांनी हा उत्साह कायम ठेवला. मार्ग संपल्यावर ज्येष्ठांचा जल्लोष तरुणाईलाही थक्क करून गेला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी केले.
१ ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने ‘सकाळ’ प्रस्तुत ‘सुहाना स्वास्थ्यम्’ उपक्रम राज्यातील पुणे, कोल्हापूर, नाशिक आणि नागपूरमध्ये आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमात हजारो ज्येष्ठ नागरिक उत्साहाने सहभागी होत आहेत.
दिव्यांग व्यक्तींचाही सहभाग
या ‘वॉकेथॉन’मध्ये दिव्यांग व्यक्तींचा उत्साह आणि सहभाग लक्षवेधी ठरला. कोथरूड येथील ‘एनेबलर चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘वेलोसिटी केअर फाउंडेशन’च्या तब्बल २० दिव्यांग आणि अस्थिव्यंग व्यक्तींनी या ‘वॉकेथॉन’मध्ये सहभाग घेतला होता. या वेळी ‘‘आमच्यासाठी हा केवळ एक सहभाग नाही, तर समाजाला एक सकारात्मक संदेश देणारा प्रवास आहे,’’ अशी भावना अमोल शिनगारे यांनी व्यक्त केली.
८९ वर्षांची ‘तरुणी’
आश्वस्त सर्व्हिसेसच्या ८९ वर्षांच्या प्रभा नेने यांचा ‘वॉकेथॉन’मधील सहभाग हा सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. वयाच्या उत्तरार्धात असूनही त्यांनी तीन किलोमीटरचे अंतर केवळ पूर्णच केले नाही, तर ते अगदी ठरावीक वेळेत पार करून दाखवले. नेने यांचे आयुष्य हे केवळ वैयक्तिक आयुष्यापुरते मर्यादित न राहता समाजसेवेला वाहिलेले आहे. निवृत्तीनंतरही ‘आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो’ या प्रामाणिक भावनेतून त्यांनी तब्बल २३ वर्षे रस्त्यांवर उभे राहून वाहतूक नियोजनाचे काम केले आहे.
‘सकाळ’चा हा अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. वयाच्या या टप्प्यावर घरात बसण्यापेक्षा मित्रांसोबत चालण्याचा आनंद काही वेगळाच असतो. चालता चालता पाच किलोमीटरचा टप्पा कधी पार झाला, तेच कळलं नाही.
- आशिष देशपांडे (वय ७८)
मी अनेक वर्षांपासून हास्ययोग करत आहे, पण इतक्या मोठ्या संख्येने लोक चालण्यासाठी एकत्र आलेले पाहून मन आनंदित झाले. तीन किलोमीटर चालल्यावर थकवा नाही, उलट उत्साह वाढला आहे. ‘सकाळ’मुळे आज आम्ही वय विसरून पुन्हा तरुण झालो आहोत.
- विजया देसाई (वय ६७)
आजची ‘सकाळ’ खरंच ‘सुहाना’ झाली. या उपक्रमामुळे ज्येष्ठ नागरिक संघटनांचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांना भेटण्याची संधी मिळाली. निरोगी आयुष्याचा मंत्र सगळ्यांपर्यंत पोहोचला. अशा सामाजिक आणि आरोग्यदायी उपक्रमांची आजच्या काळात नितांत गरज आहे.
- भगवान परदेशी (वय ६५)
‘सकाळ माध्यम समूहा’ने ज्येष्ठांसाठी आयोजित केलेल्या ‘वॉकेथॉन’ला मोठ्या संख्येने आणि उत्साहाने प्रतिसाद मिळाला. ज्येष्ठ नागरिकांनी सुदृढ, निरोगी आणि आनंदी जीवन जगावे यासाठी विशेष प्रयत्न होणे आवश्यक आहे. म्हणूनच आम्ही ‘जॉय अँड क्रू व्हेकेशन्स’तर्फे आयोजित पर्यटनात ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेतो आणि त्यांना पूर्ण निश्चिंतीने पर्यटनाचा आनंद घेता यावा याची खबरदारी घेतो.
- प्रग्या आदिराज, संस्थापिका, जॉय-एन-क्रू व्हेकेशन्स