दिव्यांगांच्या कल्याणाचा अविरत वसा

दिव्यांगांच्या कल्याणाचा अविरत वसा

Published on

पुणे, ता. ५ ः दिव्यांग मुलांसाठी केवळ शैक्षणिक किंवा आरोग्याच्या सुविधा नाहीत; तर त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि दिव्यांगांचे आत्मबळ वाढवण्यासाठी १९७८ मध्ये निर्मिती झाली, ‘बालकल्याण’ या संस्थेची. तेव्हापासून गेली ४७ वर्षे दिव्यांगांच्या कल्याणाचा हा वसा अविरतपणे जपत देशभरातील संस्थांना पथदर्शी ठरणारे काम संस्था करत आहे. समाजातील सर्व घटकांच्या एकत्रित प्रयत्नांतून उभ्या राहिलेल्या आणि यशस्वीपणे कार्यरत असणाऱ्या संस्थेचे हे आदर्श उदाहरण आहे.

राजभवनाशेजारील एका पडीक जागेपासून सुरू झालेला संस्थेचा प्रवास आता सुसज्ज प्रशासकीय कार्यालय, क्रीडांगण, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीचे बंदिस्त सभागृह, वैद्यकीय शिबिर केंद्र, अक्वाटिक ट्रेडमिल असलेला एकमेव जलतरण तलाव, अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, मानसिक व शारीरिक आरोग्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रमापर्यंत आणि हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांच्या उत्तुंग यशापर्यंत येऊन पोहोचला आहे. दिव्यांगांसाठीच्या स्वतंत्र सुविधांचा विचार ज्यावेळी देशभरात कोठेही सरकारी पातळीवर केला जात नव्हता आणि समाजाचा दिव्यांगांकडे पाहण्याचा दृष्टिकोन फारसा पुढारलेला नव्हता, अशा काळात दूरदृष्टीने विचार करत निर्माण झालेली ही संस्था एक दुर्मिळ उदाहरण आहे.

दिव्यांग मुलांसाठी सांस्कृतिक तथा मनोरंजन केंद्र म्हणून १९७८ मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली. तत्कालीन राज्यपाल सादिक अली यांच्या पत्नी तथा राज्याच्या प्रथम महिला शांता सादिक अली यांच्या संकल्पनेतून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या यमुताई किर्लोस्कर यांच्या पुढाकाराने या संस्थेची निर्मिती झाली. किर्लोस्कर यांनी प्रतापराव पवार यांच्याकडे कार्यकारी विश्वस्त म्हणून संस्थेची जबाबदारी सोपवली.

संस्थेच्या इमारतीचा आराखडा, बांधकाम, नियमावली ठरवणे आणि अन्य सर्व कायदेशीर सोपस्कार झाल्यानंतर १९८३ मध्ये संस्थेच्या कार्याला सर्वार्थाने सुरुवात आली. त्याकाळी पालकांना दिव्यांग मूल जन्माला येणे, हे गतजन्मीच्या कर्माचे फळ वाटत असे. हा दृष्टिकोन बदलण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून राज्यभर शिक्षक आणि पालकांचे प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आले. सुरुवातीच्या काळात तर प्रतापराव पवार यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी हे स्वतः मुलांना शाळेतून संस्थेत घेऊन येणे आणि परत घरी सोडण्याचे काम करत असत.

हळूहळू संस्थेच्या कामाचा परीघ वाढत गेला. दिव्यांग मुला-मुलींच्या आरोग्याबद्दल प्रशिक्षण कार्यक्रम, चर्चासत्रे, तपासण्या, विशेष औषधोपचार, फिजिओथेरपीतून शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी प्रयत्न, कला व क्रीडा स्पर्धा, असे असंख्य उपक्रम संस्थेतर्फे राबवण्यात आले.

या सर्व प्रयत्नांचे फळ म्हणून संस्थेतील विद्यार्थी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन यश मिळवत आहेत. सर्वसामान्य खेळाडूंनी असे यश मिळवणे आणि दिव्यांग खेळाडूंनी असे यश मिळवणे, यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. या यशामागे दिव्यांग विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक, संस्थेतील शिक्षक, कर्मचारी यांच्या अविरत कष्टाचाही मोठा वाटा आहे.

राज्यपालांच्या पत्नी या संस्थेच्या पदसिद्ध प्रेसिंडेट असतात. विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, दिव्यांग कल्याण विभागाचे आयुक्त, पुणे महापालिका आयुक्त आणि पुण्याचे पोलिस आयुक्त हे संस्थेचे पदसिद्ध विश्वस्त आहेत. संस्थेच्या स्थापनेपासून प्रतापराव पवार यांनी संस्थेची धुरा सांभाळली आहे. पूर्वी मानद सचिव म्हणून आणि आता अध्यक्ष म्हणून ते संस्थेचे काम पाहत आहेत. त्यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर व कार्यकर्ते संस्थेचे विश्वस्त म्हणून काम पाहतात.
----
संस्थेची वैशिष्ट्ये ः
- सुमारे पाच हजार विद्यार्थी घेतात संस्थेचा लाभ
- पुणे आणि आसपासच्या परिसरातील ८५ शाळांमधील दिव्यांग विद्यार्थ्यांना संस्थेचा लाभ
- अन्य राज्यांतील मुलांचाही संस्थेत मुक्काम, सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण
- ॲक्वाटिक ट्रेडमिल असलेला एकमेव जलतरण तलाव

- दिव्यांगासाठी ‘ॲक्वाटिक थेरपी’ उपलब्ध करून देणारी संस्था
- विविध विभागांतून दिव्यांग मुलांच्या प्रवासासाठी दोन बस
----
संस्थेच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश ः
- २०२३ मध्ये ‘ऍबिलिम्पिक’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत संस्थेच्या चार विद्यार्थ्यांचा सहभाग, दोन विद्यार्थ्यांना सुवर्ण व रजत पदक
- यावर्षी झालेल्या राष्ट्रीय पॅरा योग स्पर्धेत सर्वसाधारण विजेतेपद, स्पर्धेत २८ खेळाडूंचा सहभाग, नऊ सुवर्णपदकांसह एकूण १९ पदकांची कमाई
- संस्थेत व्हॉलिबॉल या क्रीडा प्रकाराचे मार्गदर्शन घेणारी विद्यार्थिनी सुप्रिया गायकर हिची यावर्षी पोलंड येथे होणाऱ्या व्हॉलिबॉल विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड
- विभागीय ‘ऍबिलिम्पिक’ स्पर्धेत १७ विद्यार्थ्यांचा सहभाग, १७ पदकांची कमाई
- संस्थेच्या विद्यार्थ्यांकडून विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण
----
दिव्यांगांसाठी विविध कलांचे अभ्यासक्रम
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गायन, वादन, नृत्य अशा कलांच्या शिक्षणासाठी प्रारंभिक ते विशारदपर्यंतचा विशेष अभ्यासक्रम बालकल्याण संस्थेने अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय मंडळाच्या सहकार्याने तयार केला आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मर्यादा लक्षात घेऊन शास्त्र भाग व लेखी भाग, हा अधिकाधिक मौखिक पद्धतीने कसा घेता येईल, यावर यात भर देण्यात आला. देशभरातील अशा प्रकारचा हा पहिलाच अभ्यासक्रम आहे.
----
सामुदायिक प्रयत्नातून उभी राहिलेली संस्था
संस्थेतील फक्त पगार आणि देखभाल यांचा खर्च सरकारतर्फे केला जातो. मात्र, संस्थेचे विश्वस्त आणि कर्मचाऱ्यांनी अविरत प्रयत्नातून संस्थेसाठी मदत गोळा केली आहे. कामाचे ठरलेले तास किंवा सुट्ट्या यापलीकडे जात संस्थेला आपलेसे करत हे विश्वस्त आणि कर्मचारी संस्थेसाठी काम करतात. अनेक सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती, उद्योजक, बांधकाम व्यावसायिक तसेच कंपन्या यांनी ‘सीएसआर’मधून संस्थेला लाखो रुपयांची मदत केली आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी देखील वेळोवेळी संस्थेला मदत केली आहे. प्रामाणिकपणे आणि चांगल्या उद्देशाने काम केल्यावर मदतीसाठी समाज नेहमीच पुढे येतो, हे संस्थेच्या आजवरच्या वाटचालीत सिद्ध झाले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com