धनगर समाजाने ‘ओबीसी’चे नेतृत्व करावे सकल धनगर समाजाच्या अधिवेशनात ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन
पुणे, ता. ५ : धनगर समाज लढवय्या असून, इतिहासात त्यांची नोंद राज्यकर्ता अशी आहे. समाजाने आपला इतिहास समजून घेत होळकरांनी दिलेली शिकवण अंगीकारत व लढवय्यापणा दाखवत समाजाची सामाजिक व राजकीय ओळख प्रस्थापित करायला हवी. आगामी निवडणुकांत ओबीसींची सत्ता आपल्याला आणायची आहे. त्यासाठी धनगर समाजाने सर्व ओबीसी समाजाचे नेतृत्व करावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
सकल धनगर समाजाच्या दुसऱ्या राज्यस्तरीय अधिवेशनात ते बोलत होते. गंजपेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारकात हे अधिवेशन झाले. यावेळी अधिवेशनाचे अध्यक्ष विजय मोरे, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी आमदार रामराव वडकुते, भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते गणेश हाके, काँग्रेसचे नेते डॉ. यशपाल भिंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिन गावडे, महिला व बालविकास आयुक्त नयना गुंडे, प्राप्तिकर आयुक्त डॉ. नितीन वाघमोडे, संयोजक ॲड. विजय गोफणे, सोमनाथ देवकाते आदी उपस्थित होते.
डॉ. महात्मे म्हणाले, ‘‘धनगर समाज आरक्षणाचा हक्क मिळवण्यासाठी नेहमीच एकवटलेला आहे. त्यांचा हा अधिकार कोणीही हिरावून घेणार नाही. धनगर समाजाने शिक्षण, संघटन आणि हक्क यांची त्रिसूत्री अंगीकारली पाहिजे. समाजातील युवकांनी शिक्षणाच्या बळावर आपले स्थान निर्माण केले तर आरक्षण आणि आर्थिक उन्नतीचे प्रश्न सोडवणे अधिक सोपे होईल. समाजातील नेते आणि कार्यकर्त्यांनी आपापसांतील मतभेद विसरून एकसंघ व्हावे.’’
यावेळी अहिल्यारत्न पुरस्कार वितरण, तसेच आरक्षणासाठी उपोषण केलेल्यांचा सन्मान करण्यात आला. बापूसाहेब शिंदे (सामाजिक कार्य), रामकिसन रौंदळे (शैक्षणिक), जयश्री वाक्षे (आरक्षण लढा), रूपाली जोशी (सेवाभावी संस्था), डॉ. सोमनाथ सलगर (वैद्यकीय सेवा), घनश्याम हाके (आदर्श समाजयुवक), भारत कवितके (पत्रकारिता), रामभाऊ लांडे (इतिहास संशोधन / साहित्य), अक्षता ढेकळे (क्रीडा), डॉ. स्नेहा सोनकाटे (राजकीय), सुरेखा चौरे-गावडे (शासकीय सेवा), विवेक बिडगर (आदर्श उद्योजक), सैनाली गंगाराम उचाळे (महिला संघटन), धुळाभाऊ कोकरे (आधुनिक शेती), दत्ताभाऊ डोंबाळे (कामगार क्षेत्र), मुकुंद कुचेकर (वधू-वर परिचय उपक्रम), यशोदा नाईकवडे (युवा व्याख्याते / प्रबोधनकार), सुनीता अर्जुन, रेखा धनगर-नरोटे (बास्केट बॉल) यांना सन्मानित करण्यात आले. प्रास्ताविकात ॲड. विजय गोफणे यांनी अधिवेशनाचे स्वरूप विशद केले.
------------------
फोटो ः 57664
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.