दिवाळी अंक

दिवाळी अंक

Published on

स्वागत दिवाळी अंकाचे

१) पुण्यभूषण
दर वर्षीप्रमाणे यंदाही पुण्याशी संबंधित विविध घटकांवर प्रकाश टाकणाऱ्या लेखांनी ‘पुण्यभूषण’चा अंक सजला आहे. कोथरूडचे आमदार आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांच्या ‘मी अस्सल पुणेकर!’ या लेखाचा अंकात समावेश आहे. पुण्याच्या नद्यांवर श्रीकांत इंगळहळीकर आणि प्राजक्ता महाजन यांनी लिखाण केले आहे. ‘मागे वळून पाहताना’मध्ये डॉ. सतीश देसाई, राजीव साबडे, प्रशांत कोठडिया यांनी लिहिले आहे. ‘वैविध्यपूर्ण वारसा’ या अंतर्गत अजित कानेटकर, सुप्रिया शेलार, मिलिंद जोशी, अनिल अवचट आदींचे लेख आहेत. शहराच्या बदलत्या गरजांवर भाष्य करणारे लेखन तुषार कलबुर्गी आणि वृषाली जोगळेकर यांनी केले आहे. श्रीपाद ब्रह्मे यांनी खाद्यसंस्कृतीची झलक दाखवली आहे. ‘सलाम’ सदरात विविध क्षेत्रांत महत्त्वपूर्ण योगदान दिलेल्या शकुंतला खटावकर, डॉ. सदानंद बोरसे, राजकुमार चोरडिया, जे. पी. श्रॉफ, प्रा. उल्हास बापट, डॉ. अविनाश भोंडवे, चंद्रमोहन कुलकर्णी, श्रावण हर्डीकर आदींवर लिहिले आहे.
मुख्य संपादक : सुहास कुलकर्णी, पृष्ठे : २१६, मूल्य : ३०० रुपये
---
२) संवादसेतू
‘बाप-लेक’ आणि ‘शतस्मरणीय’ हे दोन विभाग यंदाच्या संवादसेतू अंकाचे वैशिष्ट्य आहे. ‘शतस्मरणीय’ विभागात कौशल इनामदार यांनी ओ. पी. नय्यर यांचे शब्दचित्र रेखाटले आहे. आश्‍लेषा महाजन यांनी अहिल्याबाई होळकर यांना मानवंदना वाहिली आहे. दिलीप प्रभावळकर यांनी जयवंत दळवी यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच, शरद पोंक्षे, विजया मेहता, मृदुला दाढे, प्रा. मिलिंद जोशी यांनीही या विभागासाठी लेखन केले आहे. ‘बाप-लेख’ विभागासाठी प्रतिभा रानडे, मृणाल देव-कुलकर्णी, सावनी तळवलकर आदींनी त्यांचे वडिलांशी असलेले नाते उलगडले आहे. अनंत सामंत, भारत सासणे, शर्मिला फडके, गणेश मतकरी यांच्या कथांचा समावेश आहे. मंगला गोडबोले यांनी मीना प्रभू यांच्या लेखनावर लेख लिहिला असून, धृतिमान मुखर्जी यांची मुलाखतही अंकात आहे.
संपादक : डॉ. वंदना बोकील-कुलकर्णी, जयश्री बोकील, पाने : २२०, किंमत : ३०० रुपये
-------------------
३) लाडोबा
बालसाहित्यातील साहित्य अकादमी हा अत्यंत प्रतिष्ठेचा सन्मान प्राप्त झालाय असे तब्बल सहा लेखक एकाच दिवाळी अंकात वाचायला मिळाले तर? होय, ही किमया घडवलीय लाडोबा या मासिकाने. आबा महाजन, एकनाथ आव्हाड, डॉ. संगीता बर्वे, डॉ. सुरेश सावंत, राजीव तांबे आणि भारत सासणे या सहा लेखकांच्या कथा बालविश्वाला साद घालतात. सातारची साहसी शिखरकन्या धैर्या कुलकर्णीच्या अफाट कामगिरीची दखल राहुल तांबोळी यांनी घेतलीय. ज्योती घनश्याम यांनी रणरागिणी महाराणी ताराबाई यांच्याविषयी लिहिलंय तर शकुंतला काळे यांनी शहाण्या वाक्यांचा खजिना दिलाय. डॉ. कैलास दौंड, नागेश शेवाळकर, आशा पैठणे, संदीप वाकचौरे, अनुजा कुलकर्णी, उमेश वाघेला, विनायक ढवळे आदींच्या कथा आहेत. विनोद कुलकर्णी यांचा लेख आहे. प्रशांत केंदळे, उत्तम सदाकाळ, प्रा. ललिता सबनीस, समृद्धी दामले यांच्या कवितांसह आश्लेषा महाजन यांच्या पंचमहाभूताच्या कविता ज्ञानवर्धक आहेत. प्रत्येक लेख, कथा-कविता ऐकण्यासाठी सोबत क्यूआर कोड आहे.
संपादक ः घनश्याम पाटील, पाने ः ११६ , किंमत ः २५० रुपये
फोटो ः ६२९४७
-----------------------

४) दुर्गांच्या देशातून...
यंदाचा अंक एव्हरेस्ट विशेषांक आहे. एव्हरेस्टशी संबंधित लेखांसह इतरही काही विषयांचा समावेश अंकात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ यादीत स्थान मिळालं. याबाबत विकास खरगे यांची मुलाखत डॉ. लता पाडेकर यांनी घेतली आहे. एव्हरेस्ट आरोहणाचा आलेख ऋषीकेश यादव यांनी मांडला आहे. गणेश मोरे यांनी सिंहगड ते एव्हरेस्ट हा प्रवास उलगडला आहे. ३३ वर्षांनी एव्हरेस्ट सर करण्याचं स्वप्न पूर्ण कसं झालं, हे सांगणारा अनुभवकथनपर लेख व्यंकटेश माहेश्‍वरी यांनी लिहिला आहे. सर्वोच्च शिखरावर राष्ट्रगीत गाण्याचा थरार द्वारका डोखे यांनी मांडला आहे. यासह किशोर धनकुडे,
चंद्रकला गावित, चेलुवी ढोकले, वरुण भामरे आदींच्या लेखांचा अंकात समावेश आहे.
संपादक : संदीप तापकीर, पाने : १४०, किंमत : ४०० रुपये

५) गुंफण
परिसंवाद, साहित्य उत्सव, ललित, आरोग्य विषय, कथाविश्‍व, भावविश्‍व, विनोदी कथा, पर्यटन, ज्योतिष, अशा विविध विषयांचे लेख अंकात आहेत. सुनील भोईटे लिखित ‘पश्‍चिम घाटातील भूस्खलन’ या लेखाने अंकाची सुरवात होते. श्रीराम पचिंद्रे यांचा ‘अशी होते ढगफुटी’, बसवेश्‍वर चेणगे यांचा ‘चक्राकार घोंगावणारा दैत्य’, ‘अतिवृष्टी महापूर दरवर्षीची डोकेदुखी’ हा प्रा. विनोद सावंत यांचा सध्याच्या परिस्थितीवरील लेख आहे.
याशिवाय राजीव मुळ्ये, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, गजानन चेणगे, प्रताप गंगावणे, स्वाती बाजारे, योगेंद्र ठाकूर, प्रा. श्रीधर साळुंखे, डॉ. संजय पवार, डॉ. प्रतापराव गोळे, डॉ. रवींद्र घोंगडे, डॉ. राजेंद्र माने, डॉ. कांता नलावडे, गौरी भालचंद्र, योगेश शिंदे, वीरेंद्र पतकी, प्रतीक दोशी आदींचे लेख या अंकामध्ये आहेत.
संपादक : डॉ. बसवेश्‍वर चेणगे, पाने : १७२, किंमत : २४० रुपये
------------------------------
६) शुभश्री
वर्तमान काळाचा वेध घेत भविष्यवेधी प्रश्‍नांवरील लिखाण अंकात करण्यात आले आहे. ‘पंच परिवर्तन’ या परिसंवादात नितीन देशपांडे, पंकज जयस्वाल, डॉ. राहुल मुगीकर, मकरंद ढवळे आदींनी लेखन केले आहे. ‘एआय’ची भीती की बागुलबुवा यावर बालेन्दु शर्मा दाधिच, डॉ. अच्युत गोडबोले, नवनाथ वारे, अतुल कहाते, महेश कोळी, डॉ. अभय जेरे यांनी लिखाण केले आहे. विश्‍वास पाटील, नितीन थोरात, देविदास सौदागर यांनी आपल्या लेखनावर प्रकाशझोत टाकला आहे. चित्रपटांमुळे बदललेल्या आयुष्याविषयी स्वप्नील जोशी, पूजा सावंत, हेमंत ढोमे, हेमामालिनी, अनिता दाते- केळकर, अमृता खानविलकर यांनी लिहिले आहे. ‘उरल्या फक्त आठवणी’ यावर गणेश काळे, प्रसाद पाटील, महेश शिपेकर, राधिका बिवलकर आदींनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. काजोलवर सोनम परब यांचा लेख आहे.
संपादक : शुभदा पाटील, पाने : १०८, किंम त : २०० रुपये

७) परंतु
----
कस्तुरबा गांधी.. राष्ट्रपिता महात्मा गांधी या थोर व्यक्तिमत्वाआड दडलेलं तेवढ्याच ताकदीचं थोर व्यक्तिमत्त्व. ‘परंतु’ हा वैशिष्ट्यपूर्ण व संग्राह्य असा दिवाळी अंक कस्तुरबा गांधी विशेषांक नावाने प्रसिद्ध झाला आहे. कस्तुरबा अर्थांत ‘बां’वर खूप कमी लिहिलं गेलं आहे. त्यांना अभिवादन करणाऱ्या या अंकात चार विभाग आहेत. पहिल्या विभागात दस्तूरखुद्द महात्मा गांधी यांनी ‘बां’वर ''गांधीजी: हिज लाईफ ॲन्ड वर्क'' या ग्रंथात लिहिलेल्या लेखाचा अनुवाद सुशील धसकटे यांनी केला आहे. तसेच रिचर्ड ॲटनबरो यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘गांधी’ या इंग्रजी चित्रपटात ‘बां’ची भूमिका यथार्थपणे साकार केलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांची मुलाखत हे या अंकाचे वैशिष्ट्य आहे. याशिवाय प्राचार्य विश्वास पाटील, रामदास भटकळ, तुषार गांधी आदी मान्यवरांचे लेख आहेत. दुर्मिळ छायाचित्रे, कविता अंकावर आहे.
------
संपादक ः सुशील धसकटे,
पाने ः २१० , किंमत ः ३०० रुपये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com