महापालिका प्रशासनात लवकरच खांदेपालट
पुणे, ता. २८ ः पुणे महापालिका प्रशासनातील बेशिस्तपणा, नियमांचे होणारे उल्लंघन, चुकीच्या निर्णयांची अंमलबजावणी यामुळे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी अधिकाऱ्यावर कारवाईचा बडगा उचलला होता. या त्रुटी आता दूर करण्यासाठी प्रशासनात खांदेपालट केले जाणार आहे. निष्क्रिय असलेले व निर्णयक्षमता नसलेल्या अधिकाऱ्यांना बाजूला काढले जाणार आहे. नियमाला धरून व्यवस्थित निर्णय घेणाऱ्या अधिकाऱ्यांकडे महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी दिली जाणार आहे. आयुक्त राम यांनी यास दुजोरा दिला आहे.
पुणे महापालिकेत गेल्या साडेतीन वर्षांपासून प्रशासकाच्या माध्यमातून कामकाज सुरू आहे. या काळात नगरसेवक नसल्याने अधिकाऱ्यांच्या मनानुसार सगळा कारभार सुरू आहे. नगरसेवक असताना महापालिकेची मुख्यसभा, स्थायी समितीमध्ये अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले जातात. त्यामुळे त्यांच्यावर वचक असतो. कामामध्ये शिस्त असते. वेळेवर कार्यालयात येणे जाणे सुरू असते. पण प्रशासक राजमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कोणाचाही वचक नसल्याने प्रशासनातील शिस्त बिघडून गेली आहे. उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, विभाग प्रमुख, खाते प्रमुख यासह अन्य पदावरील अधिकाऱ्यांसह लिपिक, बिगाऱ्यांपर्यंत कामावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. या बेशिस्तीमुळे शहरातील पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. खड्डे, कचरा, सांडपाणी, असमान पाणी पुरवठा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.
महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी महापालिकेचा कारभार हातात घेऊन जवळपास पाच महिने झाले आहेत. या काळात त्यांनी आढावा बैठका घेऊन, प्रत्यक्ष जागा पाहणी करून महापालिकेचे कामकाज समजून घेतले. त्यावेळी त्यांना कामात अनेक त्रुटी असल्याचे निदर्शनास आले. अधिकाऱ्यांना त्यात सुधारणा करण्याचे आदेश दिले गेले, पुरेसा वेळही देण्यात आला. पण समाधानकारक बदल झालेले नाहीत. दिवाळीच्या काळात आयुक्तांनी वाघोली, मांजरी, शेवाळवाडी येथे भेट दिली. तेथील स्थिती पाहून त्यांनी काही अधिकाऱ्यांची बदली केली तर काहींचे निलंबन केले आहे. बांधकाम विभागातील टीडीआर सेलमधील अभियंत्यांचे निलंबन करून त्यांची खातेनिहाय चौकशी सुरू केली आहे.
पुणे महापालिकेच्या प्रशासनात सुधारणा करण्यासाठी आयुक्तांनी निष्क्रिय अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्याचा निर्णय घेतला आहे. नियमाला धरून काम न करणारे, चुकीच्या गोष्टींना प्रोत्साहन देणाऱ्या अधिकाऱ्यांकडून खाते काढून घेतले जाणार आहे. त्याऐवजी तेथे नवीन अधिकारी नियुक्त केले जातील. यामध्ये राज्य सरकारकडून प्रतिनियुक्तीवर आलेल्या अधिकाऱ्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. महापालिकेत सामान्य प्रशासन, मालमत्ता व्यवस्थापन, मिळकतकर व करसंकलन, सुरक्षा, घनकचरा व्यवस्थापन हे विभाग महत्त्वाचे आहेत. हा विभाग मिळावा यासाठी अधिकारी फिल्डींग लावत असतात. असे असताना आता आयुक्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करताना काय निकष लावणार याकडे लक्ष लागले आहे.
पुणे महापालिकेतील विविध विभागांचे अधिकारी बदलले जाणार आहेत. आपल्याकडे बाहेरून काही चांगले अधिकारी आले आहेत. काम व्यवस्थित व गतीने होणे आवश्यक आहे. त्यासाठी हे बदल केले जातील.
- नवल किशोर राम, आयुक्त, महापालिका
अग्निशामक दलासाठी उपायुक्त
महापालिकेच्या अग्निशामक दलाचे कामकाज हे मुख्य अग्निशामक अधिकारी यांच्या माध्यमातून चालत आहे. सध्या हे पद रिक्त असल्याने येथे ‘पीएमआरडीए’चे अधिकारी देवेंद्र पोटफोटे यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार आहे. या विभागाच्या कामात सुधारणा करण्यासाठी उपायुक्त दर्जाचा अधिकारी नियुक्त केला जाणार आहे, असे आयुक्तांनी सांगितले. मात्र, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अंतर्गत अग्निशामक दलाचा समावेश होतो. या विभागाच्या उपायुक्तांकडूनही यावर नियंत्रण ठेवता येणे शक्य आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

