गर्भधारणा, प्रसूतीनंतर मणक्याची घ्या काळजी

गर्भधारणा, प्रसूतीनंतर मणक्याची घ्या काळजी

Published on

पुणे, ता. ३० ः गर्भधारणेदरम्यान व प्रसूतीनंतर शरीरात होणारे संप्रेरकांचे बदल (हार्मोनल), वजन वाढ आणि चुकीची बसण्याची पद्धत, यामुळे मणक्यावर ताण येतो. प्रसूतीनंतर चुकीच्या शारीरिक स्थितीत बाळाला स्तनपान देणे, झोपेची कमतरता आणि व्यायामाचा अभाव, यामुळे हा त्रास दीर्घकाळपर्यंत टिकू शकतो. प्रसूतीनंतर बाळाला सतत उचलून घेणे, चुकीच्या स्थितीत व पाठीच्या कण्यास योग्य आधार न घेता स्तनपान करणे आणि पुरेशी विश्रांती न घेणे यांसारख्या दैनंदिन समस्यांमुळेदेखील ही समस्‍या वाढत असून, दहापैकी चार गर्भवतींना हा त्रास सतावत असल्‍याचे तज्ज्ञांचे निरीक्षण आहे.
नवमातांच्या बाबतीत मणक्याच्या समस्यांमध्ये ४० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. दर महिन्याला २५ ते ३५ वयोगटातील गर्भधारणेनंतर १० पैकी चार गर्भवती महिलांना पाठदुखीचा त्रास होतो. तो त्यांच्या दिनचर्येत व्यत्यय आणतो. तथापि, गर्भधारणेपूर्वी आणि गर्भधारणेदरम्यान निरोगी जीवनशैली आणि तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नियमित व्यायाम केल्यास पाठीच्या कण्यासंबंधी समस्या कमी करण्यास मदत होते. गर्भधारणेदरम्यान आणि नंतर त्यांच्या शरीरात होणाऱ्या बदलांमुळे अनेक नवमातांना पाठदुखी, पोश्चरसंबंधी समस्या आणि पाठीच्या कण्यासंबंधी अस्वस्थता जाणवते. गर्भधारणेदरम्यान वाढलेले वजन, संप्रेरकांचे बदल आणि बदललेल्या शारीरिक स्थितीमुळे मणक्यावर अतिरिक्त ताण येतो, अशी माहिती मणका शल्‍यविशारद डॉ. शार्दूल सोमण यांनी दिली.
स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. प्रसाद कुलट यांच्‍या मते गर्भधारणेच्या काळात इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या दोन्ही हॉर्मोन्सची तसंच त्‍याची स्रवण्याची पातळी वाढते. हे हार्मोन्स सांधे आणि अस्थिबंध यांना शिथिल करण्यास आणि प्रसूती सुलभरीत्या करण्यास मदत करतात. मात्र, या बदलामुळे महिलांना पाठदुखीसारख्या समस्येला सामोरे जावे लागू शकते. गर्भाच्या वाढत्या वजनामुळे शरीर पुढच्या दिशेने वाढते. त्यामुळे पाठीच्या खालच्या भागाच्या स्नायूंवर ताण येऊ शकतो आणि गर्भधारणेदरम्यान पाठदुखीचा त्रास वाढू शकतो.

काय काळजी घ्याल?
- गर्भारपणात वजन वाढल्याने स्नायू, सांधे, पाठ आणि मान यांच्‍यावर ताण पडतो
- गरोदरपणाच्या सुरुवातीपासून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाठीचे आणि ओटीपोटाचे व्यायाम करावेत
- हे व्‍यायाम स्नायूंना बळकट करण्‍यास मदत करतात
- स्नायू मजबूत करण्याचे व्यायाम आणि फिजिओथेरपी या पाठीच्या कण्याच्या समस्यांवर मात करण्यासाठी आवश्यक
- मातांनी वारंवार पुढे वाकणे टाळावे, बाळाला दूध पाजताना आधार देणाऱ्या खुर्च्यांचा वापर करावा आणि हलके स्ट्रेचिंग करावे
- वजन नियंत्रित ठेवणे, बाळाची काळजी घेताना मधूनमधून थोडी विश्रांती घ्या
- पाठीचा त्रास ‘प्रसूतीनंतरचा सामान्य त्रास’ म्हणून दुर्लक्षित करू नये
- वेदनेचे वेळीच निदान आणि उपचार केल्यास मातांना पुन्हा हालचालींची क्षमता, आत्मविश्‍वास आणि वेदनारहित जीवनमान मिळविण्यास होते मदत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com