विलंब शुल्कासह दहावी परीक्षा अर्जासाठी ११ नोव्हेंबरपर्यंत मुदत
पुणे, ता. ३० : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये होणाऱ्या दहावीच्या परीक्षेसाठी १० नोव्हेंबरपर्यंत विलंब शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत.
राज्य मंडळाची दहावीची परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षेचे अर्ज युडायस प्लसमधील पेन-आयडीवरून ऑनलाइन पद्धतीने त्यांच्या शाळाप्रमुखांमार्फत भरण्यात येत आहेत. तसेच पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेंतर्गत आणि तुरळक विषय, आयटीआयचे विषय घेऊन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळाद्वारे ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार आहेत. विद्यार्थ्यांचे अर्ज विलंब शुल्कासह १० नोव्हेंबरपर्यंत भरता येतील. तर नियमित आणि विलंब शुल्काने अर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क भरण्यासाठी १४ नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी दिला आहे. माध्यमिक शाळांनी शुल्क भरल्याच्या पावतीसह विद्यार्थ्यांच्या याद्या आणि प्रिलिस्ट विभागीय मंडळाकडे १७ नोव्हेंबरपर्यंत जमा करायचे आहेत. माध्यमिक शाळांनी सादर केलेली सर्व अर्ज परीक्षा शुल्क भरल्याशिवाय संबंधितांची प्रवेशपत्रे उपलब्ध करून दिली जाणार नाहीत, असेही राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी स्पष्ट केले आहे.

