पुणे रेल्वे स्थानकावर ‘वॉर रूम’

पुणे रेल्वे स्थानकावर ‘वॉर रूम’

Published on

पुणे, ता. २ ः पुणे स्थानकावरून रोज सुमारे दीड लाखाहून अधिक प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांच्या तक्रारींसाठी रेल्वे प्रशासनाने पुण्याच्या नियंत्रण कक्षात पहिल्यांदाच ‘वॉर रूम’ची स्थापना केली आहे. प्रवाशांनी तक्रार केल्यानंतर अवघ्या काही मिनिटांतच त्याला प्रतिसाद दिला जातो. तर त्या तक्रारीचा निपटारादेखील वीस मिनिटांच्या आत केला जातो. परिणामी स्थानकावर होणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे सोपे होत आहे.
रेल्वे मंत्रालयाने देशात सर्वाधिक प्रवाशांची गर्दी असणारी १७ स्थानके निवडली असून यात पुणे स्थानकाचादेखील समावेश आहे. त्यामुळे सण, उत्सवांच्या काळात रेल्वे गाड्यांना प्रवाशांच्या गर्दीचे नियमन करण्यासाठी पुणे स्थानकावर ‘वॉर रूम’ स्थापन केली आहे. प्रशिक्षित कर्मचाऱ्यांसह येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांचीदेखील नेमणूक करण्यात आली. यामुळे फलाटावरील अथवा रेल्वे गाडीतील गर्दीवर लक्ष ठेवणे, अथवा त्यानुसार निर्णय घेणे सोपे झाले आहे.

२४ तास कार्यरत
‘वॉर रूम’मध्ये १० कर्मचारी २४ तास कार्यरत आहेत. जे प्रवाशांच्या तक्रारींना केवळ तत्काळ प्रतिसाद न देता त्या सोडविण्यासाठी प्रयत्नदेखील कळतात. प्रवाशांची तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्या संबंधित विभागाच्या निदर्शनास आणून त्याचा निपटारा होण्यासाठी काम केले जाते. यात डब्यातील एसी बंद झाल्यापासून ते सहप्रवासी त्रास देत असल्याच्या तक्रारीपर्यंतचा समावेश आहे.

अशा आहेत तक्रारी
सामान्यपणे रेल्वे प्रशासनाला प्राप्त होणाऱ्या तक्रारींमध्ये डब्यांमध्ये अस्वच्छता, बेडरोल खराब असणे, स्वच्छतागृहात पाणी नसणे, मोबाईल चार्जरच्या सॉकेटमध्ये बिघाड, गाडी उशिराने धावणे, सहप्रवाशाचे गैरवर्तन, फलाटमध्ये बदल, फलाटांची सूचना निर्धारित वेळेवर न होणे आदी तक्रारींचा जास्त समावेश आहे. या तक्रारी रेल मदत, रेल्वे विभागाचे एक्स (ट्विटर) खात्यावर अथवा स्थानक व्यवस्थापकांच्या कार्यालयातील तक्रार पुस्तिकेद्वारे प्राप्त होतात.

पुणे स्थानक दृष्टिक्षेपात
एकूण फलाट : ६
दैनंदिन प्रवासी संख्या : सुमारे एक लाख ७० हजार
पुण्याहून धावणाऱ्या प्रवासी गाड्या : १७०
लोकलच्या फेऱ्या : ४१
पुणे स्थानकावरून प्रवास सुरु करणारे रेल्वे : ७२

प्रवाशांच्या सुविधेसाठी व गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे स्थानकावर व नियंत्रण कक्षात स्वतंत्र ‘वॉर रूम’ची स्थापना केली आहे. परिणामी काही मिनिटांतच प्रवाशांच्या अडचणी दूर होण्यास मदत होत आहे. स्थानकावर गर्दीचे नेटके नियोजन करण्यास मदत होते. त्यामुळे संभाव्य धोका टाळला जात आहे.
- पद्मसिंह जाधव, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com