भारतात नेपाळसारख्या अराजकतेची भीती

भारतात नेपाळसारख्या अराजकतेची भीती

Published on

पुणे, ता. ६ : कुंपणाने संस्थेचे हीत जोपासण्याचा उद्देश ठेवला तरच ट्रस्ट किंवा संस्थेचे कल्याण होते. सध्या सरकार, प्रशासन आणि कंत्राटदार असे तिन्ही एकत्र झाले आहे. त्यामुळे कंत्राटदारांची बांडगुळे अधिक मजबूत झाले आहेत. सर्वच संस्थांवरील विश्वास उडून गेल्यामुळे नेपाळमध्ये अराजकता माजली. आता तशीच परिस्थिती अनेक घटनांमुळे भारतात निर्माण होवू शकते, असा सूर ‘जनहित चॅरिटेबल ट्रस्ट’ आयोजित परिसंवादात उमटला.
‘शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट’च्या जमीन विक्रीबाबत झालेल्या प्रकाराच्या पार्श्वभूमीवर ‘कुंपणच शेत खातंय तर करायचं तरी काय’? या विषयावर हा परिसंवाद झाला. माजी महापौर शांतिलाल सुरतवाला, ज्येष्ठ विचारवंत डॉ. विश्वंभर चौधरी, ग्राहक पेठ सहकारी संस्थेचे संस्थापक संचालक सूर्यकांत पाठक, कै. श्रीमंत लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. शिवराज कदम-जहागीरदार आणि सुधारणावादी विचारवंत पैगंबर शेख यात सहभागी झाले होते. ट्रस्टचे संस्थापक प्रकाश ढमढेरे यांनी कार्यक्रमामागील भूमिका मांडली. वसंत खुटवट यांनी आभार मानले.
डॉ. चौधरी म्हणाले, ‘‘राज्यात कायद्याचे राज्य न राहिल्याने विरोधात विचार मांडणाऱ्यांवर हल्ले झाले आहेत. ‘ईडी’ची कारवाई करता येत नाही म्हणून सनद काढून घेतली जातेय. जमिनीचे वाढते मूल्य लक्षात घेता त्या गिळंकृत केल्या जाताय. या सर्व प्रकरणांमुळे देशातील सर्व संस्थांवरील विश्वास उडण्याचे वर्तुळ पूर्ण होत आहे. तसे झाल्यास देशातसुद्धा नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होवू शकते.’’
पाठक म्हणाले, ‘‘जैन ट्रस्टबाबत झालेला प्रकार पूर्वीदेखील घडले आहेत. कारण, आपण ज्यांना निवडून देतो त्यांच्यावर धाक राहिलेला नाही. सरकार, कंत्राटदार, प्रशासन असे तिन्ही एकत्र झाले आहे. त्यामुळे कंत्राटदारांची बांडगुळे अधिक मजबूत झाली आहेत. शासनाला जाग आणायची असेल तर आपण रस्त्यावर उतरले पाहिजे.’’
सुरतवाला म्हणाले, ‘‘जैन समाजाने मोर्चा काढला नसता तर आता ट्रस्टच्या जागेत खड्डे खांडले गेले असते. जमीन विक्रीसाठी दिलेली परवानगी कायदेशीर असेल तर तो व्यवहार रद्द करण्याचे कारण नाही. मात्र हे सर्व बेकायदेशीर असेल तर त्यातील सर्वांना तुरुंगात टाकावे.’’
पैगंबर शेख म्हणाले, ‘‘धार्मिकस्थळांच्या जमीन हडपण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. जैन बांधवांप्रमाणे मुस्लीम समाजाच्या जमिनींचेदेखील संरक्षण व्हायला हवे. मुद्दाम एका समाजाचे राक्षसीकरण करून त्याआधारे पुढे नको ते प्रकार होताय.’’


विश्वस्तांनी माहिती लपविली
ॲड. जहागीरदार यांनी या व्यवहारातील कायदेशीर प्रक्रिया सांगितली. ‘‘अनेक ट्रस्टच्या जागा विकल्या गेल्या असून त्यात बेकायदेशीर काही नाही. मात्र या व्यवहारातील अर्जात विश्वस्तांनी मंदिराची माहितीच दिली नव्हती. त्यामुळे कुंपणाने संस्थेचे हीत जोपासण्याचा उद्देश ठेवला तरच ट्रस्ट किंवा कोणतीही संस्था असेल तर त्याचे कल्याण होते.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com