रस्त्यावर गुंडगिरीचा माज

रस्त्यावर गुंडगिरीचा माज

Published on

अनिल सावळे : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ६ : रस्त्यावर थोडा धक्का लागला, वाहनाला खरचटले किंवा नजरेचा कटाक्ष झाला...अशा किरकोळ कारणांवरून हाणामारी, कोयत्याने वार, ज्येष्ठ आणि महिलांच्या सोनसाखळ्या हिसकावणे, अशा ‘स्ट्रीट क्राइम’च्या घटना वाढत आहेत. पोलिसांनाही मारहाण केली जात असून, तेही सुरक्षित नाहीत. बाजीराव रस्त्यावर भरदिवसा तीन अल्पवयीन तरुणांनी एका सतरावर्षीय तरुणाचा खून केला. गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढला असून, ही बाब अधिक चिंतेची आहे. रस्त्यावर दररोज गुंडगिरी करणाऱ्या टोळक्यांना पोलिस आयुक्त धडा कधी शिकवणार, असा प्रश्‍न नागरिकांकडून विचारला जात आहे.

कोथरूडमध्ये टोळक्याकडून तरुणाला मारहाण
कोथरूडमध्ये स्वरूप संघपाल आवटे या २१ वर्षीय तरुणाला टोळक्याने बेदम मारहाण केली. दोन नोव्हेंबरच्या सायंकाळी कोथरूड बसस्थानक परिसरात तरुणाला अडवून टोळक्याने डोक्यात बाटली फोडून शस्त्राने वार केले. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

मद्यपी टोळक्याकडून पोलिसालाच मारहाण
शिवाजीनगर मेट्रो स्थानक परिसरात मद्यधुंद तरुणांच्या टोळक्याने गोंधळ घालून पोलिस अंमलदार अक्षय डिंडोरे यांना धक्काबुक्की केल्याची घटना घडली. याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे. शहरात मागील काही दिवसांत पोलिस कर्मचाऱ्यांनाही मारहाण केल्याचे प्रकार घडले आहेत.

कात्रजमध्ये तरुणावर कोयत्याने वार
कात्रज परिसरात दोन अल्पवयीन मुलांनी तरुणावर कोयत्याने वार करून खुनाचा प्रयत्न केला. वाहनांच्या किरकोळ धडकेवरून झालेल्या वादातून ही घटना घडली. या प्रकरणात आंबेगाव पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.

तंबाखू न दिल्याने चाकूने वार
तंबाखू न दिल्याने दोघांनी सौरभ चित्तापुरे या २३ वर्षीय तरुणावर चाकूने वार केले. ही घटना आंबेगाव बुद्रुकमधील शंभुराजे चौकात मंगळवारी घडली.

जाब विचारल्याने हत्याराने वार
दारू पितो म्हणून चिडविल्याचा जाब विचारताच तिघांनी मिळून नदीम मदारी या व्यक्तीला मारहाण केली. तसेच, एकाने त्याच्यावर हत्याराने वार करून जखमी केले. कोरेगाव पार्क परिसरात हा प्रकार घडला.

सोनसाखळी हिसकावण्याचे प्रकार सुरूच
वानवडीतील केदारीनगर भागात सोमवारी सकाळी पादचारी महिलेची दीड लाख रुपयांची सोनसाखळी दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेली. ही महिला शाळेत मुलाला सोडून घरी परतत होती. याबाबत वानवडी पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.

पोलिसांची जबाबदारी
मागील काही दिवसांत शहरात रस्त्यांवर वाद, टोळक्यांची दहशत, कोयत्याने वार, मद्यधुंद तरुणांचा गोंधळ, साखळी हिसकावणे अशा ‘स्ट्रीट क्राइम’च्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी धडक मोहीम राबवून सराईत गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई केली. मात्र, रस्त्यांवरील गुंडगिरी सुरूच आहे. शहराच्या सुरक्षिततेसाठी आता निर्णायक कारवाईची गरज आहे. पोलिस ठाण्यातील ‘डीबी’, ‘एलआयबी’, बीट मार्शल आणि गुन्हे शाखेतील पोलिसांनी ही गुंडगिरी नियंत्रणात आणण्याची गरज आहे.

पुणे शहरातील ‘स्ट्रीट क्राइम’च्या घटना
वर्ष- दाखल गुन्हे
२०२१- ९३७
२०२२- ११५२
२०२३- १३९०

२०२४- १५३५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com